।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


भारतातील “तरूण” लोकसंखेचे “रुपेरी” आव्हान…

भारत आज जगातील सर्वात मोठ्या तरूण लोकसंखेचा देश म्हणून ओळखला जातो. हीच तरूण लोकसंख्या देशाची सर्वात मोठी ताकद मानली जाते. मात्र, या ताकदीसोबत एक दीर्घकालीन वास्तव जोडलेले आहे—आजचा हा तरुण वर्ग पुढील दोन दशकांत मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिकांमध्ये रूपांतरित होणार आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभे राहणारे आव्हान हे केवळ व्यवस्थापनाचे नसून, ते सामाजिक, आर्थिक आणि धोरणात्मक स्वरूपाचे आहे.

एकूण पाहता, आजमितीस भारतात १६ कोटी ज्येष्ठ नागरिक आहे. आणि हीच संख्या २०३५ पर्यंत २४ कोटींवर पोहोचणार आहेत. ही वाढ केवळ लोकसंख्येतील बदल नसून, आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेची खरी परीक्षा आहे. जर सध्याच्या पायाभूत सुविधा, डॉक्टरांची उपलब्धता, विमा व्यवस्था आणि जनजागृती यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली नाही, तर २०३५ पर्यंत भारताला “healthcare stress” चा गंभीर सामना करावा लागू शकतो.

पण याच परिस्थितीत एक संधीही दडलेली आहे—योग्य नियोजन केल्यास भारत “silver economy” मध्ये जागतिक नेतृत्व करू शकतो. २०३५ पर्यंत हे भारतासाठी केवळ लोकसंख्येतील बदलाचे वर्ष नसून, आरोग्य व्यवस्थेच्या भवितव्याचा निर्णायक टप्पा ठरणार आहे. याचा अर्थ असा की, आजच्या तुलनेत अनेक पटींनी अधिक लोकांना दीर्घकालीन डाॅक्टर्स ,रुग्णालये, आरोग्यसेवा, औषधे, आणि विमा इ. संसाधनांची गरज भासणार आहे. आधीच डॉक्टरांची कमतरता, हॉस्पिटल बेड्सची अपुरी संख्या आणि ग्रामीण-शहरी दरी या समस्या अस्तित्वात असताना, या वाढत्या मागणीचा सामना करणे ही मोठी कसोटी ठरणार आहे. तथापि, भारताचे चित्र केवळ आव्हानांचे नाही. उलटपक्षी, या बदलत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर भारताकडे काही अद्वितीय ताकदीही आहेत. भारत हा जगातील सर्वात मोठे generic औषध उत्पादक देशांपैकी एक आहे, ज्यामुळे औषधांची किंमत तुलनेने कमी राहते. तसेच, इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा स्वस्त आहेत. यामुळे “medical tourism” साठी भारत एक महत्त्वाचे केंद्र बनत आहे. कुशल डॉक्टर, वाढते खासगी रुग्णालयांचे जाळे आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सर्व गोष्टी भारताला जागतिक आरोग्य क्षेत्रात महत्त्वाची भूमिका देऊ शकतात.

मात्र, या ताकदीचा योग्य उपयोग करण्यासाठी नियोजनबद्ध पावले उचलणे अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम, सरकारने आरोग्य क्षेत्रातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढवणे गरजेचे आहे. सध्या भारताचा सार्वजनिक आरोग्य खर्च GDP च्या सुमारे 2 टक्क्यांच्या आसपास आहे, जो विकसित देशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. ही गुंतवणूक वाढवून प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, डॉक्टर, नर्सेस आणि इतर सहाय्यक वैयक्तिक सेवा तयार करण्यासाठी वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार आणि गुणवत्ता सुधारणा हीदेखील महत्त्वाची बाब आहे. आरोग्य विम्याच्या क्षेत्रात, सर्व जेष्ठ नागरिकांना विमा कवच देण्याची गरज आहे. आजही मोठा वर्ग विम्याच्या कक्षेबाहेर आहे आणि वृद्धावस्थेत विमा मिळवणे अधिक कठीण होते आहे. त्यामुळे तरूण वयातच विमा सुलभ आणि परवडणारा बनवणे, तसेच सार्वजनिक आणि खाजगी विमा योजनांमध्ये समन्वय साधणे आवश्यक आहे.

परंतु या सर्व उपाययोजनांसोबत एक अत्यंत महत्त्वाचा घटक दुर्लक्षित करता येत नाही—तो म्हणजे जनजागृती. भारतात अजूनही आरोग्य विमा, preventive healthcare आणि नियमित तपासणी याबाबत पुरेशी जागरूकता नाही. विशेषतः असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये आरोग्य सुरक्षेबाबतची जाणीव कमी आहे. या पार्श्वभूमीवर सरकार, स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्र यांनी एकत्रितपणे व्यापक जनजागृती मोहीम राबवणे आवश्यक आहे. जसे बँकिंग क्षेत्रात ‘जनधन योजना’मुळे आर्थिक समाशन वाढले, तसेच आरोग्य क्षेत्रातही “health inclusion” घडवून आणणे गरजेचे आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगार—जसे की शेतमजूर, बांधकाम कामगार, छोटे व्यावसायिक—हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहेत. त्यांच्यासाठी कमी प्रीमियमच्या ‘micro-insurance’ योजना, सहकारी संस्थांद्वारे सामूहिक विमा, आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने सहज नोंदणी या उपाययोजना प्रभावी ठरू शकतात. उदाहरणार्थ, दररोज अगदी अल्प रक्कम (जसे 10–20 रुपये) बचत करून मोठ्या प्रमाणावर आरोग्य विमा कव्हरेज निर्माण करता येऊ शकते, जर योग्य रचना आणि विश्वासार्ह अंमलबजावणी असेल तरच. ह्याला हेल्थ क्रेडीट स्कीम असे म्हणतात.. या संदर्भात नारायण हृदयालयाचे संस्थापक यांचे कार्य आणि त्यांचा दृष्टीकोन अत्यंत प्रेरणादायी ठरतात. या रुग्णालय साखळीने “कमी खर्चात उत्तम दर्जाची आरोग्य सेवा” ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांनी ५ ते १० लाख रुपयाचा आरोग्य विमा अत्यंत कमी पैशात उपलब्ध करून दिलेला आहे जेणे करून कुटुंबाची आरोग्य जोखीम घेण्याची क्षमता वाढेल… तसेच त्यांच्या रूग्णालयात हृदय रोगाच्या शस्त्रक्रिया ७५ हजार रूपयात होतात. भारतात आरोग्य सेवा महाग असण्याचे कारण तंत्रज्ञान नाही, तर व्यवस्थापन आणि स्केलचा अभाव आहे. ‘economies of scale’ चा वापर करून हृदय शस्त्रक्रिया अत्यंत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिल्या जावू शकतात. आणखी एक महत्त्वाची कल्पना म्हणजे “mass health insurance”. जर मोठ्या लोकसंख्येने अल्प प्रीमियम भरून विमा घेतला, तर संपूर्ण देशासाठी अत्याधुनिक आरोग्य सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊ शकतात.

मोठ्या हॉस्पिटल चेनसमोरही काही स्पष्ट जबाबदाऱ्या उभ्या राहतात. केवळ महानगरांमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारण्यापेक्षा, टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये विस्तार करणे ही काळाची गरज आहे. ‘value-based healthcare’ या संकल्पनेनुसार, कमी खर्चात दर्जेदार सेवा देणे हे ध्येय असले पाहिजे. याशिवाय, वृद्धांसाठी विशेष ‘geriatrics care’, घरपोच आरोग्य सेवा आणि दीर्घकालीन उपचारांसाठी स्वतंत्र सुविधा उभारणे आवश्यक ठरणार आहे.

या सर्व आव्हानांमध्येच भारतासाठी एक मोठी आर्थिक संधीही दडलेली आहे. वाढती जेष्ठांची लोकसंख्या, वाढणारी आरोग्य जाणीव आणि विम्याचा विस्तार यामुळे आरोग्य क्षेत्र हे पुढील दशकात सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक ठरणार आहे. हॉस्पिटल्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, औषधनिर्मिती, वैद्यकीय उपकरणे, होम हेल्थकेअर, आणि वृद्ध सेवा—या सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होणार आहेत.

आजच्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग, फार्मसी, हेल्थ टेक, बायोटेक्नॉलॉजी, आणि हेल्थ मॅनेजमेंट या क्षेत्रांमध्ये करिअरच्या असंख्य वाटा खुल्या होत आहेत. तसेच, स्टार्टअप्सच्या माध्यमातून डिजिटल हेल्थ, remote diagnostics, आणि elderly care यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्याची मोठी संधी आहे. लवकरच रुग्णांना ICU मधे न ठेवता, घरच्या घरी, remote control medical surveillance monitoring ही सुविधा, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपचार देण्यास सक्षम होणार आहे.. भारताच्या किफायतशीर आरोग्य सेवांचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी तरुण उद्योजक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

शेवटी, भारताचे वैद्यकीय भविष्य अशा वळणावर उभे आहे की हे आव्हाने संधी म्हणून स्वीकारले तर भारत जागतिक आरोग्य क्षेत्रात अग्रणी स्थान मिळवू शकतो. आजच योग्य निर्णय घेतले तर उद्याचा भारतीय जेष्ठ नागरिक सुरक्षिततेत, सन्मानाने आणि निरोगी आयुष्य जगेल. या निर्णयांमध्ये सरकार, उद्योगक्षेत्र आणि समाज जितके महत्त्वाचे आहेत, तितकाच महत्त्वाचा आहे —जागरूक, जबाबदार आणि दूरदृष्टी असलेला आजचा तरुण वर्ग.

इंजि.दिपक दोडके, समाज बदलाचे अभ्यासक


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment