–

समाज घडविणारे प्रतिभावंत जेंव्हा ह्या जगाचा निरोप घेतात तेंव्हा एक मोठी पोकळी निर्माण होते. डाॅ.आनंद नाडकर्णी यांच्या जाण्याने ती पोकळी आज फार प्रकर्षाने जाणवत आहे.
डॉ. आनंद नाडकर्णी यांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे असेल, तर त्यांच्या वैद्यकीय कार्याइतकेच त्यांच्या संवादकलेचाही विचार करावा लागेल. कारण ते फक्त मानसोपचारतज्ज्ञ नव्हते. ते समाजमनाशी सतत संवाद साधणारे, माणसाच्या भावविश्वाला शब्द देणारे आणि जीवन समजावून सांगणारे एक विलक्षण कथनकार होते.
त्यांची व्याख्याने, मुलाखती आणि संवाद हे केवळ माहितीपर कार्यक्रम नसत. तो सर्व एक अनुभव असायचा. टीव्हीवरील मुलाखत असो, ‘चतुरंग’ मधील लेख असोत किंवा एखाद्या सभागृहातील मुक्तसंवाद — ते बोलायला लागले की श्रोता नकळत स्वतःच्या मनाच्या प्रवासाला निघायचा. त्यांच्या बोलण्यात विद्वत्ता होती. पण ती कधीही दडपण आणणारी नव्हती. ते कठीण मानसशास्त्रीय संकल्पनाही इतक्या सहज, विनोदी आणि सोप्या उदाहरणांतून सांगत की सामान्य माणसालाही त्या स्वतःच्या आयुष्याशी जोडता येत. त्यांच्यातील आणखीन एक गुण म्हणजे ते अस्खलित मराठीत बोलत. मराठीत क्वचित वापरले जाणारे शब्द ते इतके सहज बोलत की, त्या शब्दांचा अर्थ त्या वेळेस कळत असे.
त्यांच्या मुलाखतींची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्या ‘उपदेश’ वाटत नसत. ते प्रश्नांना उत्तर देताना एखादी ज्ञानेश्वरीतील ओवी सांगत, त्यातून एखादा मानसशास्त्रीय अर्थ उलगडत आणि मग अचानक एखाद्या साध्या घरगुती प्रसंगातून त्या विचाराला जीवनाचा स्पर्श देत. विज्ञान जिथे संपते, तिथे अध्यात्म सुरू होते. डॉ. आनंद नाडकर्णीनी देखील हे जाणले आणि संत साहित्य त्यांनी त्यांच्या संवादात अत्यंत सहजतेने आणले. त्यामुळे त्यांच्या संवादात शास्त्र होते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जिव्हाळा होता.
डॉ. नाडकर्णी अनेकदा सांगत की माणसाचे आयुष्य हे “भावना, विचार आणि कृती” या त्रिसूत्रीवर उभे असते. ते याला मानवी जीवनाची “तिपाई” म्हणत. या तीन पायांपैकी एक जरी डळमळीत झाला, तरी व्यक्तिमत्त्वाचा समतोल बिघडतो, असे ते स्पष्ट करत.
‘भावना’ या माणसाच्या उर्जेचा स्रोत आहेत. त्या नाकारायच्या नसतात, तर समजून घ्यायच्या असतात — हे त्यांनी समाजाला शिकवले. राग, भीती, दुःख, मत्सर किंवा प्रेम या भावना चुकीच्या नसतात. त्या आपल्या आतल्या गरजा आणि जखमांचे संकेत असतात, असे ते सांगत.
‘विचार’ म्हणजे त्या भावनांना दिशा देणारी प्रक्रिया. भावना जर अनियंत्रित वाहणारी नदी असेल, तर विचार हा तिचा किनारा आहे, असे सुंदर उदाहरण ते देत. चुकीचे, नकारात्मक किंवा भीतीवर आधारलेले विचार माणसाला आतून कमकुवत करतात. पण समतोल आणि सजग विचार भावनांना अर्थ देतात.
आणि ‘कृती’ — हा त्या दोघांचा परिणाम. फक्त चांगले विचार किंवा संवेदनशील भावना पुरेशा नसतात. त्यातून कृती घडली पाहिजे, हे ते नेहमी अधोरेखित करत. करुणा वाटत असेल तर ती वागण्यात दिसली पाहिजे. आत्मभान असेल तर निर्णयांत प्रतिबिंबित झाले पाहिजे — हा त्यांचा आग्रह असे.
त्यांच्या अनेक व्याख्यानांत ते सांगत असत कि आधुनिक जीवनात माणूस विचारांमध्ये अडकतो, भावना दडपतो आणि त्यामुळे कृतीत विसंगती निर्माण होते. त्यामुळे तणाव, एकटेपणा आणि आतला रिकामेपणा वाढतो. या तिन्ही गोष्टींचा समतोल राखणे म्हणजेच मानसिक आरोग्य — ही त्यांनी दिलेली अत्यंत सोपी पण गहन व्याख्या होती.
लोकसत्ताच्या ‘चतुरंग’ पुरवणीतून त्यांनी हेच विचार सातत्याने मांडले. मानसशास्त्र, संत साहित्य, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, नाती, समाज आणि दैनंदिन जीवन यांचा त्यांनी इतका सुंदर मेळ घातला की त्यांच्या लेखांनी अनेक पिढ्यांच्या विचारविश्वाला आकार दिला.
ज्ञानेश्वरीतील ‘अमानित्व’, ‘अदंभित्व’, गीतेतील ‘स्थितप्रज्ञता’ किंवा ‘कर्मयोग’ या संकल्पना त्यांनी आधुनिक जीवनाशी जोडून समजावल्या. अर्जुनाच्या संभ्रमात त्यांनी आधुनिक माणसाचा ताण पाहिला; तर ज्ञानेश्वरांच्या ओव्यांत त्यांनी भावनिक परिपक्वतेचा मार्ग शोधला.
त्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे मन समजून घेण्याचा, माणसाला माणूस म्हणून स्वीकारण्याचा आणि जीवनाकडे अधिक सजगतेने पाहण्याचा एक अखंड प्रयत्न होता.
आज ते आपल्यात नाहीत. पण त्यांच्या मुलाखतींमधून उमटलेला तो शांत, विचारशील आवाज, त्यांच्या लेखांतून जाणवणारी ती समजूतदार नजर आणि भावना, विचार, कृती यांच्या समतोलातून जगण्याची त्यांनी दिलेली शिकवण — हे सर्व समाजाच्या स्मरणात दीर्घकाळ जिवंत राहील. सतत प्रयोगशील, सतत कार्यमग्न आणि सतत संवाद साधणारा हा आधुनिक ऋषी आज काळाच्या पडद्याआड गेला. तिथे देखील ते अनंताचा प्रवास उलगडून बघणार ह्यात शंकाच नाही.
डॉ. आनंद नाडकर्णी यांना विनम्र श्रद्धांजली.

डाॅ.सौ.मृणालिनी दोडके

Leave a comment