–
मला एक रसिक भेटला होता त्याने सहजरित्या सांगितलं, “मला काही कळत नाही क्लासिकल, बॉलिवूड संगीत वगैरे. पण मला ऐकायला फार मजा येते. गाणं गाणं असतं ना कानाला मनाला जे शांतता देत उत्साह देत, थोडक्यात, भावना जागृत करत ते सर्व आवडत.” खरंच किती सोपं आहे. आणि खऱ्या निरागस संगीतप्रेमींच हे लक्षण आहे. ज्याला संगीत ऐकण्यापुरतं कळतं, त्यामागचं शास्त्र फारस कळत नाही, त्यांना ही निरागसता जपणं सोपं असतं.

परंतु आपल्याला शास्त्र, संगीतप्रकारांची माहिती आहे असे ज्यांना वाटते त्यांना बऱ्याच वेळेस निर्मळ मनाने सर्व संगीतप्रकारांचा आनंद घेण अवघड होऊन बसतं. कारण त्यांच्याकडे अनेक चष्मे येतात पण त्यातल्या एकाच चष्म्यातून ते सगळं संगीत बघायला लागतात. कधी आपण शिकलो त्या पद्धतीचा चष्मा, तर कधी आजूबाजूच्या इंफ्लूअन्स मधून जबरदस्ती घातला गेलेला चष्मा. पण यातून होतं असं की, ‘जगातील सगळ्या संगीत प्रकरांमध्ये बाराच स्वर आहेत, जे आपले वेगवेगळे रंग दाखवून आपल्याला वेळोवेळी चकित, आनंदित करत असतात.’ याचा विसर पडू लागतो की काय आणि आपण साधना करत असलेला किंवा ऐकायला अवडणाराच संगीतप्रकार श्रेष्ठ याचा अट्टाहास किंवा दुसरे संगीतप्रकार आनंद घेण्याचं, शिकण्याचं, ट्राय करून बघायचं तर सोडाच, ते ऐकण्यासाठीदेखील मनकर्णाची कवाडे बंद होतात. पण यातून संगीत, विचार, आनंद आणि सर्वात महत्वाचे रसिक म्हणून होणारे नुकसान याचे काय करणार? हे लेखमालिकेच्या सुरुवातीला सांगण्याचे कारण आपण आपल्यातल्या रसिकाला आनंद घेण्यापासून वंचित न ठेवता त्याला हसू ,गाऊ, नाचू, रडू सर्व भावनांचा आनंद घेऊ दिला पाहिजे अशी माझा प्रांजळ विनंती आणि ते करता येण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न म्हणून हा प्रपंच.
या लेखमालिकेत आपण संगीताशी निगडित अनेक विचार एक्सप्लोअर करणार आहोत. मीदेखील विद्यार्थीच आहे, शोधत आहे. जगात कधीच कुठल्याच शोधाला विराम नसतो. आपण एखादे विधान निश्चित करण्याच्या आतच आधी लागलेल्या शोधातून नवीन गरजा निर्माण होऊन त्या पूर्ण करण्यासाठी नवीन शोधही लागलेला असतो आणि हे चक्र सुरू ठेवण्यातच कलेची गंमत, जिवंतता आहे. त्यामुळे आत्ताच्या काळातील माझ्या बुद्धीला, मनाला भावलेल्या गोष्टींविषयी मी लेखन करण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रत्येकाला उमगणार सत्य हे वेगळं असतं आणि कुठल्याही कलेची हीच कला आहे. कलेचे व्यक्तिसापेक्षत्व हीच मोठी मजा मला वाटते कारण त्यातून शोध, नव्या शक्यता, आनंद याच्या मर्यादा वाढतातच आणि कलेच्या या प्रवाहीपणाचे भान ठेऊन बेभान होत कलेचा प्रवास करायचा असतो. रसग्रहणविषयी माझ्या पूर्वीच्या काही लेखांमध्ये नोंद आहेच की माहिती, मग्नता, आनंद, लवचिकता, प्रामाणिकपणा, प्रयोगशीलता असे अनेक पैलू आहेत ज्यामुळे आपण कुठल्याही कलेचा आनंद घेऊ शकतो. ऐकणारा श्रोता, बघणारा प्रेक्षक आणि रसग्रहण करणारा रसिक. चला तर मग, रसिक होऊयात. या लेखनमालिकेत आपण सांगीतिक रसग्रहण वेगवेगळ्या मार्गांनी करता येतंय का, ज्यातून आपल्याला संगीत सादर करता येवो न येवो पण त्याचा आनंद घेता येईल हे बघूया.

- ईश्वरी दसककर कदडी
गायिका, संवादिनी वादीका ,संगीतकार, संगीत संयोजक, लेखिका
(लेख: पूर्व प्रकाशित : दैनिक देशदूत)

Leave a comment