।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कलाभान ४ : रियाज – शारीरिक मानसिक भावनिक प्रवास

रियाजविषयी खूप कल्पना आणि अनुभवातून सिद्ध झालेली मते आहेत. कला म्हटलं की थेअरी, विचार, चिंतन, मनन या सगळ्याबरोबरच जोपर्यंत हे सर्व मनातून गळ्यात किंवा हातात उतरत नाही तोपर्यंत कलाकार घडत नाही. अथक वाचन, चिंतन, श्रवण करून व्यक्ती माहितगार, जाणकार रसिक, समीक्षक होऊच शकतो पण प्रत्यक्षात कलाकार होणे हे या सगळ्यांबरोबर अखंड शारीरिक मेहनत आणि जागृत, अजागृत अवस्थेत संगीतात राहण्यानेच शक्य होते. कारण जेव्हा प्रत्यक्षात करायला बसतो तेव्हाच लक्षात येते की काही तांत्रिक गोष्टी या रियाजानेच साध्य होतात.

(Image Source: pinterest India)

गळ्यात सूर आणण्यासाठी गुरूंनापण शिष्यांच्या विकनेस आणि स्ट्रेंथ या सर्वांचा फार अभ्यास करावा लागतो. त्यानुसार त्यांना शिष्यांचे मनोबल टिकवत त्यांच्यावर काम करावे लागते. शिक्षण आणि रियाजामधील फरक गुरूंजनांनी सांगून ठेवलाच आहे. गुरुजनांनी दिलेली विचारसरणी, गायकीचा पॅटर्न आत्मसात करणे झालेच, परंतु आपल्या आवाजाला कुठे मर्यादा येत आहेत, दमसास म्हणजे मोठे तुकडे गाण्यासाठी श्वासाची तयारी वाढवणे, गळ्यात मींड, गोलाई, गमक, खटका, ताना, मुरकी असे असंख्य लगाव उतरवणे, उच्चारांची सुस्पष्टता, तालाभ्यास, स्वराभ्यास या अनेक बाबींचा काटेकोर विचार करून प्रत्यक्ष रियाजाला बसल्यावरच अंगीकार होतो. वादनात बोटांची ठेवण, तंतुवाद्य वाजवताना बोटांवर योग्य ठिकाणी रियाज करून खुणा पडणे, स्वरस्थाने समजून घेणे, लगावांमधील तंत्र शिकून अवगत करायचे असते. पण हा सगळा शिकण्याचा भाग. या सर्व तंत्रांना रोजच्या जीवनात अमलात आणले जाते तेव्हा कलाकार बनण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू होते.

रियाज ही शारीरिक, बौद्धिक, भावनिक मेहनत आहे. तिन्ही एकमेकांशिवाय अपुरेच. डोक्यात आहे पण गळ्यात हातात उतरत नाही. हात व गळा तयार पण चिंतन नाही. बुद्धी व गळा तयार पण भाव नाही अशी अनेक आव्हाने पार करण्यासाठी सराव लागतो. आपला मेंदू चूक की बरोबर याच्या पलीकडे जाऊन फक्त पॅटर्नवर चालतो. चालणे, बोलणे, खाणे, ब्रश करणे, न बघता वस्तू हातात सापडणे या रोजच्या छोट्या छोट्या कृती सहजपणे व नकळत करायला शिकलाय कारण या सगळ्याचा लहानपणापासून सतत रियाज होऊन ते मसल मेमरीत जाते. अभिजात संगीतातील उपज व न बघता वाजवलेली वाद्ये ही सततच्या रियाजाने मसल मेमरीत शिरलेल्या स्वरांचे व सवयीचेच फलित आहे.

आपण आयुष्यात निवडलेल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये सतत राहिलो, वेगवेगळ्या अभिव्यक्ती मार्गांद्वारे त्याच्याशी जोडले गेलो, ते आपल्या मसल मेमरीत जाऊन कितीतरी सहजतेने आपण कुठल्याही क्षेत्रात वावरू शकतो. सगळ्या विषयांना कला बनवू शकतो. गणित व्यवहारात आले की खरा उपयोग होतो, भाषा बोलती राहिली तर लक्षात राहते, प्रयोग केले तर विज्ञान घडते. आजोबा नेहमी सांगायचे कुठल्याही गोष्टीला तेज येईपर्यंत ती घोटत राहायची. “आपल्याला एखादी चीज समजली आहे, प्रात्यक्षिक रुपात साध्यदेखील झाली आहे परंतु तरीसुद्धा वारंवार तीच चीज पुनरावृत्तीने सराव करून ती आतमध्ये जाऊन सहजतेने करत बसणं हा रियाज!” असे अनेक ज्येष्ठांनी सांगितले आहे. ब्रूस ली त्याच्या एका Quote मध्ये म्हणतो, “मला 10,000 kicks येणाऱ्या माणसाची भीती वाटत नाही पण एकाच kickचा 10,000 वेळेस सराव केलेल्या व्यक्तीची भीती वाटते.”

तसेच रियाजाची अजून एक कला म्हणजे रियाजाला वेळेचे मोजमाप नसते. हार्डवर्क आणि स्मार्टवर्क या दोहोंचा ताळमेळ साधत रियाज करायचा असतो. रियाज म्हणजे आपला कोष मोडून आपल्याला जे येत नाही त्याचा स्वीकार करून, त्याला सामोरे जाऊन आत्मबल ढळू न देता साध्य करण्याची प्रक्रिया. त्यामुळे रियाजी माणसाला शारीरिक मानसिक भावनिक व तांत्रिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी कशी मेहनत लागते याची कल्पना येऊन तो कनवाळू व नॉनजजमेंटल होतो आणि त्याला विद्यार्थीदशेपासून कलाकारांपर्यंत सर्व पातळ्यांवर आपापल्या परीने साधनेचा प्रवास करणाऱ्या, संगीतात राहणाऱ्या संगीतसाधकांविषयी कौतुक, आनंद व अभिमानच वाटतो. तो निखळ आनंद, समाधान व व्यक्तिसापेक्षता शिकतो. रियाजाचा प्रवास शारीरिक मेहनतीपासून सुरू होऊन मानसिक चिंतन व भावनिक प्रकटीकरणापर्यंत घडतच असतो. कलाकाराचा रियाज अव्याहत सुरूच असतो. तो प्रत्यक्षरित्या गाताना वाजवताना दिसतो पण मनात तर अखंड साधना सुरूच असते.


  • ईश्वरी दसककर कदडी

गायिका, संवादिनी वादीका ,संगीतकार, संगीत संयोजक, लेखिका

(लेख: पूर्व प्रकाशित : दैनिक देशदूत)


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment