–
संगीत रसिक होण्यासाठी श्रवणाचे महत्व तर आपण जाणलेच, आता श्रवण म्हणजे नेमके काय आणि कसे करायचे यावर चिंतन करूया. अष्टपैलू गायक, वादक, संगीतकार हे आपण अनुभवलंय. मग चतुरस्त्र रसिक का नाही ?

आपल्याला ही म्हण माहिती आहे, ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन’ म्हणजे अनेक गोष्टींमध्ये पारंगत असणारी व्यक्ती कुठल्यातरी एका विषयातील सखोल ज्ञान, निपुणता प्राप्त करतेच असे नाही. पण पूर्ण म्हण अशी आहे, ‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स मास्टर ऑफ नन, ऑफनटाइम्स बेटर दॅन मास्टर ऑफ वन!’ जेव्हा आपण कलांमधील बारीकसारीक कंगोऱ्यांचे एक्स्पोजर शुद्ध मनाने, चौफेर दृष्टीने व नवीन काहीतरी शिकायचंय या भावनेने घेतो त्यानंतरच आपली नेमकी आवड, त्यादृष्टीने काय व कसे ऐकायचे हे कळते.
अर्थात यावर मतमतांतरे असायलाच हवी कारण व्यक्तिपरत्वे बदलणाऱ्या कलेची कला आपण जाणतोच. तर रसिक घडण्यासाठी बारा स्वरांची वेगळी रूपे अनुभवणे आवश्यक आहे. रागदारीतील नियमबद्ध अनंतता, ललित संगीतातील शिथिल पण तरीही चौकटीतील भावविभोर स्वरावली, भक्तिसंगीतातील आर्तता, वाद्यसंगीतातील तंत्रकारी, तालवाद्यांवरील लयकारी, सिनेसंगीत, रॉक, जॅझ, ब्लूज, देशभक्तीपर गीते, बालगीते, गझल, लोकगीते, सिम्फनी, ऑपेरा, अकापेला असे असंख्य संगीतप्रकार ज्यामध्ये शब्दसौंदर्याची, नादसौंदर्याची, स्वरलगावांची विविधता असते पण जगातल्या सगळ्या संगीतप्रकारांमध्ये १२ स्वरांचे अस्तित्व मात्र निर्विवाद आहे.
सर्व संगीतप्रकारांचा उगम हा लोकसंगीतातूनच झाला असे सर्वज्ञात आहेच. कारण पिढ्यानपिढ्या अनेक रचना मुखोद्गत जिवंत राहिल्या, समृद्ध झाल्या. मग त्यामधून हळूहळू काही बदल, नियम, कंठसंगीतात व वाद्यसंगीतात स्वरलगावांमधील, शब्दांमधील, तालांमधील इम्प्रेवाईझेशन्स, काळानुरूप होणारे बदल असे अनेक साज चढवून वेगवेगळे संगीतप्रकार घडत गेले. रसिकांमध्येही व्यक्तिसापेक्ष श्रवणकला असते बरं का. कुठल्याही संगीतप्रकाराचा आस्वाद कोण कसा घेईल हे सांगता येत नाही. काही रसिकांना थेअरीमध्ये फारशी रुची नसते. ते त्या स्वरावलीचा, भावाचा आनंद घेत असतात. काही रसिक स्वरांच्या बरोबरीने शब्दातील, साहित्यातील वैशिष्ट्यांमध्ये उत्सुकता दाखवतात. काही रसिकांना रागदारीचे नियम, गायकी नेमकी कशा मार्गाने पुढे सुरू आहे, मग वेगवेगळ्या घराण्यातील हीच बंदिश, रागविस्तार कसा असेल अशा सर्व काटेकोर बाबींमध्ये रस असतो, काहीजणांना तालवाद्यांवरील हिशोबावर बोलांवर, स्वरवाद्यांवरील तंत्रकारीवर खूप प्रेम असते, काहींना आवडते शांततापूर्ण आलाप, मींड तर काहींना आवडतो वैविध्यपूर्ण ‘झाला’ व तानांचा स्पीड. कधी “आहा क्या बात है” असे व्यक्त होणे, कधी शांततेत डोळे मिटून आनंद घेणे अशी दाद देण्याचीही कला प्रत्येकाची निराळीच.
कलाकारांचा स्वभाव जसा सादरीकरणात उतरतो तसाच रसिकांचाही स्वभाव त्यांच्या श्रवणसाधनेत नक्कीच उतरतो. आपल्या मनस्थितीनुसार आपल्याला ऐकायला आवडते किंवा आपण जे ऐकतो त्यानुसार आपली मनस्थिती घडते. उफ!! या कलेला किती त्या कला. या सगळ्याचा सारांश एकच की श्रवण, वाचन, कलाकारांच्या संपर्कात राहणे, प्रश्न विचारणे, तालीम घेणे, अशासारख्या बाह्य साधनांमधून रसिक स्वतःला जितके शिक्षित, माहितीपूर्ण करून घेऊन व संगीतकलेत चिंतन मनन करून आत्मिकआनंद, शोधायचा प्रयत्न करत राहतो तेव्हा त्याला चतुरस्त्रपण साधता येते. त्या कलाकृतीचे नेमके अस्तित्व समजून घेण्याची तळमळ, पडणाऱ्या असंख्य प्रश्नांपासून निष्कर्ष काढेपर्यंत स्वतःशी दिलेली झुंज आणि अर्थातच या सगळ्या वैचारिक गाळण्यांच्या पलीकडे जाऊन शुद्ध श्रवण करणे, विचारांना जसे विचार म्हणूनच बघतो तसेच कलाकृती एक व्यक्तिसापेक्ष आविष्कार म्हणून फक्त ऐकणे, अनुभवणे ही रसग्रहणाची अवघड प्रक्रिया. परंतु ही पार केल्यावर रसिकांचे आयुष्य सहज आहे. ‘लर्न टू अनलर्न टू रिलर्न’, या मार्गावर चालणाऱ्या रसिकाच्या आयुष्यात आनंदच आनंद आहे कारण सगळ्या कला प्रत्येक वेळेस अगदी निरागसतेने नव्याने ऐकणे, बघणे हे वेगळे सुख त्याला मिळून त्याच्यासाठी ज्ञानाची दारे सदैव उघडी राहतात. आधी असा सर्वांगसुंदर रसिक आणि मगच त्यातून कलाकार घडतो.

- ईश्वरी दसककर कदडी
गायिका, संवादिनी वादीका ,संगीतकार, संगीत संयोजक, लेखिका
(लेख: पूर्व प्रकाशित : दैनिक देशदूत)

Leave a comment