।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कलाभान ५ : रागदारीतील नियमबद्ध अनंतता

बारा स्वर, त्यांचे असंख्य कॉम्बिनेशन्स, धून, थाट, या सगळ्यामधून निसर्गाच्या अदृश्य सदृश्य संदेशांमधून स्फुरलेल्या स्वरावलींना नियमांमध्ये, स्वरसंगतींमध्ये गुंफत राग तयार झाले असावेत. वेगवेगळ्या संगीतप्रकारात, बारा स्वर ‘धुन’ स्वरूपात वास करतात. परंतु जेव्हा ही स्वरप्रधानता आणखी बारकाव्यांसकट थोडी पुढे जाऊन स्वरसंगतींमध्ये रचनाबद्ध होते तेव्हा राग तयार होतो.

(Image Source: pinterest India)

माझ्या गुरू प्रख्यात गायिका विदुषी डॉ अलका देव मारुलकर या नेहमी एक कानमंत्र सांगतात की,”राग स्वरसंगतीप्रधान असतात.” आणि अगदी खरंय. थाट म्हणजे जणू ‘आडनाव’ किंवा ‘प्रजाती’ त्यामध्ये सातही स्वर असतात. या सात स्वरांमधून वेगवेगळ्या स्वरसंगतींमध्ये, स्वर कोमल, तीव्र किंवा वर्ज्य करून अनेक राग उमलतात.

भैरव थाट म्हणून दाखवायचा असेल तर, सा रे ग म प ध नि सां । सां नि ध प म ग रे सा ।। असे सरळ सरळ होईल. पण जेव्हा ग म ध प असा निषादावरून गोलाईने येणारा धैवत आणि ग (म) रे सा या चलनाने स्वरसंगती गायल्यावरच त्याचा ‘राग भैरव’ होतो. भैरव थाटातून विभास, गुणकली, भैरवचे बरेच प्रकार, जोगीया, रामकलीसारखे राग निर्माण होतात. रागाचे स्वरूप नियमबद्ध असूनसुध्दा किंवा असल्यामुळेच व्यापक आहे. आपल्याला नियमांमधील बांधीलपणा दिसतो पण रागसंगीतात ‘नियमांमधील सुरक्षिततेचा’ आनंद घेतला जातो. आपल्याला चौकट आखून दिली आहे त्यात आपल्याला बागडायचं आहे. हे चॅलेंजिंग आहेच पण सुखावहदेखील आहे कारण हरवण्याची भीतीच राहत नाही. ‘निषाद व मध्यमावर न्यास करायचा आहे व रिषभ धैवत अल्प गायचाय’ हे एकदा कळल्यावर पुरियाचा कधी मारवा होऊच शकत नाही आणि ‘रिषभ, धैवतावर बहुत्व आणि निषाद, मध्यमावर अल्पत्व’ दिले की मारव्याचा पुरिया होत नाही.

मुद्दा हा की स्वरसंगती, अल्पत्व-बहुत्व, वादी-संवादी, न्यास स्वर, लगावांमधील विविधता, यांसारख्या नियमांमुळेच आपल्याला अगदी एकसारखे स्वर असणारे, पण चलनाने यत्किंचितही एकसारखे नसणारे राग ऐकायला मिळतात. यामुळे एकाग्रता व जागरूकता वाढते. आऊट ऑफ द बॉक्स ही विचारसरणी आहेच पण ताई नेहमी सांगतात की “रागाच्या चौकटीत राहून खोल गेल्यानंतर त्याच रागात रिपिटेशन्स न करता असंख्य नाविन्यपूर्ण रत्ने म्हणजे बुद्धी व भावप्रधान स्वरावली सापडतात.” एकच राग अनेक वेळेला आळवल्यावर वेगवेगळा सापडतो. ‘गंधार प्राबल्य असलेला, म नि वर्ज्य असलेला, राजसी चलनाचा, गजगती ते मृगगती अशा सर्व लयीत, तिन्ही सप्तकात लीलया फिरणारा, रागदारी, भक्तिसंगीत, भावसंगीत, नाट्यसंगीत, सिनेसंगीत, भूपाळी अशा सर्व संगीतप्रकारांवर अधिराज्य करणारा, रात्रीच्या पहिल्या प्रहराचा राजा राग ‘भूप’.’ तीव्र मध्यम असलेल्या कल्याण थाटाचा हा राग परंतु भूप मध्ये मध्यम नाहीच. असे कसे? याचे उत्तर म्हणजे स्वरसंगती. सा रे ग प ध हे पाच स्वर रसिकांना तासनतास खिळवून ठेवतात. मग ते आदरणीय किशोरीताईंचे अजरामर ‘सहेला रे’ असो, खळेकाकांचे ‘कुश लव रामायण गाती’ असो, किंवा ‘सिलसिला’ चित्रपटाचे गीत!

याबरोबरच; ‘अगदी तसेच सा रे ग प ध हे पाच स्वरच असलेला पण सर्व स्वर शुद्ध असणाऱ्या बिलावल थाटातून येणारा, सकाळी गायला जाणारा, मध्य व तार सप्तकात खुलणारा, धैवतापासून चंचल निकास असणारा राग ‘देसकार.!’ आहे की नाही गंमत! जर रागांना नियम नसते तर एकसारखे स्वर असणारे पण स्वरसंगतींमुळे वेगळे होणारे ‘भूप – देसकार – शुद्ध कल्याण’, ‘देस – तिलक कामोद’, ‘भैरव – कालिंगडा’, ‘दरबारी – अडाणा’ ‘मारवा – पुरीया – सोहोनी’ अशा असंख्य जोड्या मिळाल्या असत्या का? किती बारीक, बुद्धिवादी कलाकुसर आहे आपल्या संगीतात! माणसाच्या मेंदूला वस्तू, वाक्य, शब्द, व्यक्ती अशा सर्वांशी अर्थ व भाव जोडण्याची सवय लागते. तसेच निसर्गाच्या अवस्थांमधून येणाऱ्या भावविभोरतेमधून रचयित्यांना स्वरसंगती सुचून त्या त्या समयानुसार राग निर्माण झाले असावेत. सूर्यास्ताची करुणा दाखवणारा पुरियाकल्याण, प्रातःकालीन प्रसन्नता व गंभीरता दर्शवणारा तोडी, पावसाचा मल्हार, उष्णतेचा दीप, वसंत ऋतूमध्ये गायला जाणारा दोन रागांचे मिश्रण असणारा बसंतबहार हा जोड राग, अनेक मिश्र, समांतर जोडराग अशी सर्जनशीलतेने कलाकारांनी निर्मिती केली.

रागदारीबद्दल थोडीशी जरी माहिती व जिज्ञासा रसिकाकांकडे असली तर त्यांचा अनुभव आणखी सुखद होऊ शकतो. राग समजण्यासाठी माझ्या गुरू प्रख्यात गायिका पं मंजिरीताईं असनारे केळकर यांचे एक वाक्य नेहमी आठवते की “रागाचे नियम, कंगोरे सखोल जाणून घ्यायचे असतील तर भरपूर बंदीशींचा अभ्यास करायचा.” बंदिश रागाचा आत्मा असतो. एखाद्या रागाच्या भरपूर बंदिशी, गाणी ऐकली की त्या रागाशी मैत्री व्हायला खूप मदत होते. एकाच रागातील असंख्य स्वरावली, पलटे, आलाप, लगाव यामधून ‘एवढ्याश्या दिसणाऱ्या स्वरांच्या किती अफाट शक्यता आहेत, तेही नियमबद्धतेतून!’ या रागदारीच्या नियमबद्ध अनंततेची प्रचिती येते. हा लेख वाचल्यानंतर संगीतप्रेमींनो, आपण सर्वजण उपलब्ध असलेल्या चिकार माध्यमांद्वारे आपल्या आवडत्या रागाचे स्वरूप जाणून घ्यायचा, त्यातील गाणी ऐकायचा, रसग्रहणाचा प्रयत्न करूया.


  • ईश्वरी दसककर कदडी

गायिका, संवादिनी वादीका ,संगीतकार, संगीत संयोजक, लेखिका

(लेख: पूर्व प्रकाशित : दैनिक देशदूत)


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment