।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


नुसा पेनिडा – समुद्राच्या निळाईतले अद्भुत शिल्प!

बाली म्हटलं की डोळ्यांसमोर येतात हिरवीगार भातशेते, अप्रतिम शिल्पकलेने नटलेली मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनारे. बालीतील वास्तव्याच्या पहिल्या तीन दिवसात आम्ही हे सारे डोळ्यात आणि मनात जमले तसे भरून घेतले होते. मग खुणावत होते ते नुसा पेनिडा बेट! बालीच्या मुख्य बेटापासून थोडं दूर गेलं की निसर्गाचं एक अगदी वेगळंच रूप आपल्यासमोर उभं राहतं. नैसर्गिक चमत्काराने युक्त.. नुसा पेनिडा ! चित्तथरारक नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी पर्यटन यासाठी नुसा पेनिडा प्रसिद्ध आहे. निळाशार समुद्र, पांढऱ्या वाळूचे किनारे आणि मनाला भुरळ घालणारे विशाल चुनखडीचे (Limestone) कडे ही इथली वैशिष्ट्ये. व्यावसायिकतेपासून अजूनही तसे दूर असल्यामुळे निसर्गाचे मूलभूत सौंदर्य अजूनही अबाधित आहे.

पर्यटकांची गर्दी टाळण्यासाठी आम्ही नुसा दुवा येथील रिसॉर्टवरून सकाळची पहिली फेरी बोट घेण्याचे ठरवले. ‘सनूर बीच’ (Sanur Beach) येथून स्पीड-फेरी बोटने साधारण ५० मिनिटांच्या रोमांचकारी प्रवासानंतर नारळीच्या किनाऱ्यांनी शोभिवंत अशा बेटावर पाय ठेवले. तिथले रस्ते बऱ्याच चढ-उताराचे असल्याने येथे डे-टूर साठी गाडी भाड्याने घेणे अधिक सुरक्षित ठरते. आमच्या हसतमुख वाहन चालकाने उत्साहाने आमचे स्वागत केले आणि आम्ही तेथील सौंदर्य पाहण्याच्या उत्सुकतेने कूच केले.

आम्ही सर्वप्रथम पोहाचलो ते Broken Beach अर्थात तुटलेला किनारा ( की निसर्गाने बांधलेला पूल? ) या ठिकाणी ! तो पूल नजरेस पडण्याआधी थोडी चाल करावी लागते आणि ते चांगलेच आहे जेणेकरून वाहनाचा गजबजाट थेट त्या सुंदर स्थानापर्यंत पोहोचत नाही. जेव्हा तो अप्रतिम पूल नजरेस पडला तेव्हा निसर्गाच्या भव्यतेमुळे अक्षरशः डोळ्यांचे पारणे फेडले जाणे म्हणजे काय ते उमगले! नावात जरी ‘Broken’ असे असले तरी तो पूल मात्र निसर्गाची परिपूर्ण कलाकृती होता. समुद्रकिनाऱ्यावरील चुनखडीच्या भागावर दीर्घकाळ चाललेल्या नैसर्गिक प्रक्रियांमुळे एक मोठी गोलाकार कमान तयार झाली आहे. तिच्या एका बाजूला खडकाची उंच भिंत आहे. या कमानीखालून समुद्राचे निळेशार पाणी आत येते आणि खालील गोलाकार रचनेत उसळी घेत राहते. जोरदार वारे असले की खालील लाटा जबरदस्त वेगाने पुलावरही येवून धडकतात (उदा. https://www.youtube.com/watch?v=h4pMsxdUjNY ) तेव्हा वाऱ्यांच्या अंदाज घेतच हा पूल पार केलेला बरे असते. पण इथला रांगडा समुद्र आपल्यासमोर लाटांचे जे रौद्र, भव्य रूप सादर करतो ते पहात बसावेसे वाटते. वारे शांत झाल्यावर खालच्या स्वच्छ, फेसाळत्या पाण्यात डोल्फिन्सचा एक समूह स्वछंद विहार करतांना पाहून तेथून पाय काही निघत नव्हता.

काही वेळ ते दृश्य मनात भरून घेतल्यावर आम्ही पुढे Kelingking Beach या ठिकाणी निघालो. तेथील View Point वर पोहोचून समोर पाहिलं तर पुनः निसर्गाच्या विराट रूपाने भारावल्यासारखी गत झाली ! समोर अथांग निळा समुद्र, त्यात उतरलेला हिरवागार प्रचंड कडा, खाली शुभ्र वाळूचा छोटासा किनारा आणि त्यावर आदळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र लाटा! Kelingking च्या या वैशिष्ट्यपूर्ण कड्याचा आकार T-Rex डायनासोर सारखा भासत असल्याने या ठिकाणास T-Rex पॉंईंट असेही म्हणतात. वरून प्रत्यक्ष समुद्रकिनाऱ्यापर्यंत खाली जाण्याचा मार्ग थोडा आव्हानात्मक असला तरिही उत्साही तरुणाई तो उतरून खाली पाण्यापर्यंत जाताना दिसत होती. फोटोमध्ये Kelingking Beach सुंदर दिसतोच पण प्रत्यक्षात त्याच्यासमोर उभं राहिल्यावर जाणवणारी त्याची भव्यता कॅमेऱ्यात मावणारी नाही. त्या उंच कड्यावर उभं राहून खाली पसरलेल्या समुद्राकडे पाहताना एकच विचार मनात आला, आपण निसर्गापुढे किती लहानआहोत ! कुठे समुद्रात सरळ उभे ठाक उंच कडे, कुठे त्यांना कवेत घेणारी हिरवाई, कुठे पांढऱ्या वाळूची किनारपट्टी तर कुठे खडक फोडून आत आलेला निळाशार समुद्र! सारेच अचंबित करणारे होते.

Broken Beach आणि Kelingking Beach सारखी ठिकाणे.. पृथ्वीचा भूभाग, समुद्र आणि काळ हे तिघे एकत्र आले की किती विलक्षण कलाकृती निर्माण होऊ शकतात, याची जिवंत उदाहरणे आहेत. बेटावरील काही जागा पुढेही बघितल्या. मग एका किनाऱ्यावर शांत बसून मी पाहिलेले सर्व काही मनात Soak / Absorb करत बसले. ते सर्व बघून असे वाटले की काळाच्या कसोटीवर आपल्या क्षमता, आपल्यातले आपण कितीही घासलो/त्रासलो गेलो तरिही येथील कड्यांप्रमाणे आपण आपले ‘स्व’त्व जपत सन्मानाने उभे राहू शकतो. काळाच्या लाटांनी मनावरचे घाव पुसले जातात आणि पुन्हा लाटांसारखे उत्साहाने फेसाळत जीवनात पुढे धाव घ्यायची असते. हा तेव्हा सुचलेला विचार मनाला सुखावून गेला.

त्या शांत किनारी कित्येक वेळ बसून दिवसभरातील रम्य नजाऱ्यांच्या उजळणीत दिवस सरला !


डॉ. रुपाली कुलकर्णी
९०११८९६६८१


काही क्षणचित्रे

Broken Beach चा वरील भागातून घेतलेला आंतरजालावरील फोटो

केलिंगकिंग बीचच्या उंच कड्यावरून समुद्रकिनाऱ्यापर्यंत सहज पोहोचण्यासाठी सुमारे १८२ मीटर उंच काचेची लिफ्ट उभारण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र या बांधकामामुळे परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याला व पर्यावरणाला धोका निर्माण होईल, असा मोठा विरोध झाला. त्यामुळे बाली प्रशासनाने या प्रकल्पाचे काम थांबवले. सध्या ही लिफ्ट पर्यटकांसाठी सुरू झालेली नाही आणि प्रकल्पाचे भवितव्य कायदेशीर प्रक्रियेत अडकले आहे.

Angel’s Billabong इन्फिनिटी पूल

समुद्राच्या लाटांनी आणि खडकांच्या नैसर्गिक झिजेतून तयार झालेला सुंदर नैसर्गिक इन्फिनिटी पूल. ओहोटीच्या वेळी येथील स्वच्छ, निळसर-हिरवे पाणी आणि खडकांची रचना अतिशय मनमोहक दिसते. मात्र भरतीच्या वेळी अचानक मोठ्या लाटा येऊ शकतात, त्यामुळे पाण्यात उतरण्यापेक्षा सुरक्षित अंतरावरून या निसर्गसौंदर्याचा आनंद घेणे योग्य.



Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment