।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


स्वर्गीय सुंदर, कलाकारांचे , कलात्मक गाव : उबूड (बाली, इंडोनेशिया)

रवी वाळेकरांचे ‘इंडोनेशायन वाचल्यानंतर बाली ट्रीप मध्ये ‘उबूड’ नामक गावाला भेट देण्याचे नक्की केले होते. त्याआधीही तिथे भेट देऊन आलेल्यांकडून ‘बाली म्हणजे ..उबूड मस्ट सी’ असे समीकरण अनेकदा ऐकले होते. आणि जेव्हा प्रत्यक्षात उबूडला भेट दिली तेव्हा हे ठिकाण म्हणजे अप्रतिम हिरवाकंच निसर्ग, स्वच्छ निळाईचे आकाश , जाणवेल इतकी सुंदर, शुद्ध हवा आणि जिथे पाहावे तिथे या ना त्या कलेची मुक्त उधळणअसल्याचे जाणवले.

बालीच्या देनपसार विमानतळापासून आमच्या आरक्षित हॉटेलपर्यंतचा साधारण ३५-४० कि.मी. चा प्रवास म्हणजे नेत्रसुखद अनुभव होता ! एकतर कमालीचे स्वच्छ आणि खड्डेमुक्त सुन्दर रस्ते, अतिशय शिस्तीची वाहतूक आणि ‘अतिथी देवो भव’ वचनाला अक्षरशः जगणारी ड्रायव्हरपासून ते हॉटेल मालकापर्यंतची सर्व हसतमुख बाली जनता !! बाली हे मुस्लिम राष्ट्र इंडोनेशियातील हिंदूप्रधान बेट ! कदाचित भारतात सापडणार नाहीत इतक्या मोठ्या प्रमाणात रामायण-महाभारतातील पात्रांची शिल्पे इथे बघायला मिळतात. विमानतळापासून थोड्या अंतरावरील असलेल्या एका चौकात अभिमन्यू आणि घटत्कोच यांच्यातील समर प्रसंग असेलला एक सुंदर, पांढराशुभ्र पुतळा नजरेस पडला आणि मुखातून ‘अहाहा’ बाहेर पडले. जणू पुढील काही दिवसात वारंवार भेट होणाऱ्या रामायण-महाभारतातील पात्रांची ती एक सुरुवातीची ‘नमनालाच प्रसन्नशी’ झलक होती !

अभिमन्यू आणि घटत्कोच यांच्यातील समर प्रसंग

उबूड तेथील डोंगरउतारावरील विशिष्ट पद्धतीच्या भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे. तसेच नारळी आणि इतर हिरवाईने वेढलेली सुबक, स्वच्छ, नेत्रसुखद मंदिरे, बालीनीज कॉफी, बालीनीज स्विन्ग्स साठीचे निसर्गरम्य फोटोशूट स्पॉट्स, धबधबे आणि याभोवती थाटलेले स्थानिक आणि इतर चविष्ट पदार्थ सर्व्ह कणारे रम्य, मनोहर कॅफेज यांनी उबूड सहल अगदी रंगतदार ठरते. शिवाय येथे टू व्हीलरवरून त्या रम्य, हिरव्या रस्त्यांवर बाईक चालवणे हाही एक सुखद अनुभव असतो. पण मला उबूड भावले ते तिथल्या विविध कलांसाठी आणि कलेला जपणाऱ्या मंडळींसाठी !

देनपसार ते उबूड मार्गावरील सुरुवातीचे ७-८ कि.मी. पार पडल्यानंतर लगेचच रस्त्याच्या दुतर्फा बालीत हरएक ठिकाणी दिसणारी अप्रतिम अशी शिल्पे नजरेस पडायला सुरुवात झाली. जणू काही मैलोंमैल एखादे शिल्पकला प्रदर्शन मांडून ठेवले असावे असे ते दृश्य होते. उंच, बुटके, जाड, बारीक, खास इंडोनेशियन पारंपरिक, मॉडर्न, वास्तुरचनेसाठी, देवालयांसाठी, रिसॉर्ट सजावटीसाठी, रस्त्यांच्या कारंज्यासाठी इ. अनेक ठिकाणी वापरता येतील अशा त्या सुंदर मूर्ती डोळ्यांचे पारणे फेडत होत्या. आपल्या बहुतेक देवतांच्या मूर्ती नजरेस पडत होत्या आणि भारताबाहेरील असे आपल्या देवतांचे दर्शन मनाला सुखावत होते. यात श्री गणेश, महादेव, विष्णू, सरस्वती, गरुड यांच्यासह बुद्धांची विविध शिल्पे मन वेधून घेत होती. आपल्याकडे जसे बहुतेक बैठ्या घरांपुढे तुळशी वृंदावन असते तसे तेथे सर्वच घरांपुढे निर्गुण-निराकार देवाचे ‘पद्मासन’ दिसत होते. त्यांची सुबकता, विविधता आणि त्यावर वाहिलेल्या ‘चनांग सेरी’ (पानाफुलांनी तयार केलेली परडी) मन मोहून घेत होत्या. तिथले कुठलेही सामान्य घर हे जणू एखादे देवालय असावे असे त्याचे प्रवेशद्वार दगडातून घडवलेले, सुबक दिसत होते.

GWK (गरुड विष्णू केंचना) सेंटरमधील भव्य , गरुडारूढ विष्णूचा पुतळा

नंतर पुढील काही अंतरावर काचेचे कारखाने दिसले. तिथे तयार केलेल्या सुन्दर वस्तू रस्त्याच्या बाजूस मांडून ठेवलेल्या दिसल्या. नाजूक, रंगीत किंवा पारदर्शक काचेच्या त्या वस्तू विविध आकाराच्या आणि मोहक होत्या. नंतर लाकडावर कलाकुसर करणारी काही दुकाने दिसली. त्या कोरीव काम केलेल्या वस्तू, मुखवटे अगदी शोभिवंत होत्या. बरे शिल्पकला, काच-कला, लाकडी कोरीव काम हे सर्व कमी म्हणून की काय अजून एक विशेष दिसले ते म्हणजे लाकडाचे लहान मोठे तुकडे जोडून केलेले भव्य पुतळे ! यात मोठमोठे लाकडी घोडे, हत्ती, गरुड, बेडूक, मासे, यांचे आकर्षक पुतळे नजाकतीने सांधलेले दिसत होते. हे सर्व नजारे पहिल्या वीसेक किलोमीटरमध्येच दिसल्याने आता या चिमुकल्या बेटाने अजून कुठल्या कला त्याच्या उदरात जोपासल्या असतील याबद्दल कुतूहल वाढत गेले.

पुढे आठच दिवसांच्या वास्तव्यात दोरीकाम, क्रोशाचे विणकाम, नारळी करवंट्या आणि काथ्याचे काम करणारी, शंख-शिंपल्यांपासून आभूषणे इ. वस्तू बनवणारी कलाकार कुटुंबे दिसली आणि जाणवले की उबूड म्हणजे खरेच कलाकारांचे कलात्मक गाव आहे ! अशा या शिल्पकलेचे माहेरघर असावे अशा उबूड गावाला आणि त्यामागील कारक असणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मी मनोमन नमस्कार केला.

मंकी फॉरेस्ट मधील सुंदर शिल्पे

पुढील काही दिवसांच्या भटकंतीत तेथील मंकी फॉरेस्ट मधील विविध सुंदर शिल्पे, GWK (गरुड विष्णू केंचना) सेंटरमधील विष्णू आणि गरुड यांचे भव्य आणि कलात्मक पुतळे, नुसा दुवा येथील कृष्ण-अर्जुनाचा पुतळा, नुसा पेनिडा येथील टेकडीवरील युवतीचा मोठा मुख-पुतळा, उलुवाटू मंदिर तसेच तीर्थ एम्पल मंदिरातील कलात्मक पुतळे पाहिले.

इंडोनेशिया हा पर्यटन प्रधान देश असल्याने इथे बरचसे पर्यटक येतात, त्या कलाकुसरीच्या वस्तू केवळ पाहतात पण विकत घेत नाहीत. असे असूनही आपली कला तितक्याच जोरकसपणे जोपासणारी ही निरागस चेहेऱ्याची बालीनीज कलाकार मंडळी मनात घर करतात. बालीची भटकंती आठवताना आजही मला उबूडमधील सतत कामात व्यग्र असूनही हसतमुख, प्रसन्न कलाकार मंडळी कायम आठवत असतात. उबूडचे यथार्थ वर्णन शब्दात करणे अवघड आहे तेव्हा कला शिकणाऱ्या किंवा कलेची आवड असणाऱ्या सर्वांनीच निवांत वेळ काढून भेट द्यावे असे हे स्वर्गीय सुंदर, कलाकारांचे कलात्मक गाव .. उबूड !!


डॉ. रुपाली कुलकर्णी
९०११८९६६८१

अधिक शिल्प-फोटो :

गोवा -गजा या श्री गणेश मंदिर प्रवेश गुहेवरील शिल्पकला
मंकी फॉरेस्ट मधील सुंदर शिल्पे
पुरा दालेम मंदिरावरील सुंदर शिल्पे
देवालयांची अनोखी प्रवेशद्वारे


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment