–

“परोपकाराय पुण्याय, पापाय परपीडनम्” — दुसऱ्यांच्या हितासाठी केलेले कार्य हेच खरे पुण्य मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीत दान, सेवा आणि समाजहित ही केवळ धार्मिक संकल्पना नसून जीवनमूल्ये आहेत. या मूल्यांचा अनुभव घेण्याची आणि प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची सर्वोत्तम संधी म्हणजे अधिक मास, अर्थात पुरुषोत्तम मास.
हिंदू पंचांगानुसार साधारणतः प्रत्येक बत्तीस महिन्यांनी येणारा अधिक मास हा भगवान श्रीविष्णूंना समर्पित मानला जातो. जप, तप, व्रत, उपासना यांच्याबरोबरच दानधर्म हा अधिक मासातील सर्वात श्रेष्ठ धर्म मानला गेला आहे. या काळात केलेले दान अनेकपटीने फलदायी ठरते, असे धर्मग्रंथांमध्ये वर्णन आहे.
दान आर्थिक व्यवहाराच्या / वैयक्तिक फायदा-तोट्याच्या पलीकडे जाऊन केलेली अर्थपूर्ण कृती आहे. तुम्ही केलेल्या मदतीच्या / दानाच्या माध्यमातून एखाद्याच्या जीवनात नवीन आशा निर्माण होऊ शकते, एखाद्या विद्यार्थ्याच्या स्वप्नांना पंख मिळू शकतात किंवा एखाद्या दिव्यांग व्यक्तीच्या आयुष्यात आत्मविश्वास जागृत होऊ शकतो.
याच भावनेतून अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन गेली अनेक वर्षे शिक्षण, संस्कार, सांस्कृतिक जतन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवत समाजोपयोगी कार्य करत आहे. “केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे” या समर्थ वचनाला कृतीत उतरवत अल्पारंभ विविध सेवाभावी प्रकल्पांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवत आहे.
या पवित्र अधिक मासात अल्पारंभने खालील महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी निधी संकलनाचे अभियान हाती घेतले आहे.
१. माई लेले श्रवण विकास विद्यालयातील कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी श्रवणयंत्र सहाय्य
श्रवणशक्ती नसल्यामुळे अनेक मुलांना शिक्षण, संवाद आणि सामाजिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. योग्य श्रवणयंत्र मिळाल्यास या मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडू शकतो. ऐकण्याची क्षमता प्राप्त झाल्याने त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होता येते, आत्मविश्वास वाढतो आणि स्वावलंबनाकडे वाटचाल करता येते.
आपल्या दानातून एखाद्या कर्णबधिर मुलाच्या आयुष्यात पहिल्यांदाच आवाजांचे सुंदर विश्व खुलू शकते.
२. नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंड (NAB), सातपूर
दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हे केवळ ज्ञानप्राप्तीचे साधन नसून स्वाभिमानाने जीवन जगण्याचा मार्ग आहे. ब्रेल साहित्य, संगणक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि विविध शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून NAB संस्था अनेक विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहे.
आपल्या योगदानामुळे एखाद्या अंध विद्यार्थ्याला शिक्षणाची नवी संधी मिळू शकते, त्याच्या स्वप्नांना दिशा मिळू शकते आणि त्याचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते.
३. घरकुल – विशेष दिव्यांग मुलींसाठी आधार
समाजातील विशेष गरजा असलेल्या दिव्यांग मुलींसाठी सुरक्षित निवास, शिक्षण, आरोग्य सेवा आणि सन्मानपूर्वक जीवनाची संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य घरकुल संस्था करत आहे.
या मुलींच्या दैनंदिन गरजा, आरोग्य सेवा, पुनर्वसन आणि शिक्षणासाठी सातत्यपूर्ण आर्थिक सहाय्याची आवश्यकता असते. आपल्या मदतीमुळे या मुलींना केवळ सुविधा नव्हे तर प्रेम, आपुलकी आणि सुरक्षित भविष्याचा आधार मिळू शकतो.
४. विवेकानंद शिक्षण व सेवा प्रकल्प, पिंपळद
ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी हा प्रकल्प सातत्याने कार्यरत आहे. अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत त्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा दिली जाते.
आपले दान एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकते, त्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते आणि एका संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीचा पाया बनू शकते.
५. एकल विद्यालय – दुर्गम भारतातील ज्ञानदीप
भारताच्या दुर्गम, वनवासी आणि आदिवासी भागांमध्ये अजूनही अनेक मुले औपचारिक शिक्षणापासून वंचित आहेत. एकल विद्यालय या उपक्रमाच्या माध्यमातून एका शिक्षकाच्या सहाय्याने संपूर्ण गावातील मुलांपर्यंत शिक्षण, संस्कार आणि सामाजिक जागरूकता पोहोचवली जाते.
आपल्या योगदानातून ज्ञानादानाचे हे कार्य अधिकाधिक गावांमध्ये पोहोचेल आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांच्या आयुष्यात नवी पहाट उगवने शक्य होईल. .
मग करता का विचार ?
आपण दिलेली देणगी ही केवळ एक रक्कम नसेल तर ..
ती एखाद्या कर्णबधिर मुलाला ऐकण्याची नवी संधी असेल….
ती एखाद्या अंध विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाचा आधार असेल….
ती एखाद्या दिव्यांग मुलीच्या सन्मानपूर्ण जीवनाची हमी असेल….
ती एखाद्या ग्रामीण विद्यार्थ्याच्या स्वप्नांचा पाया असेल….
किंवा ती दुर्गम भारतातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योत प्रज्वलित ठेवण्याची आशा असेल !!
आपल्या जीवनात समाजाचा, संस्कृतीचा आणि असंख्य ज्ञात-अज्ञात व्यक्तींचा वाटा असतो. त्या समाजाचे ऋण फेडण्याची ही एक सुंदर संधी आहे. अधिक मासातील दान या दानाकडे केवळ धार्मिक कर्तव्य म्हणून नव्हे तर सामाजिक जबाबदारीचेही प्रतीक म्हणून बघुयात.
या पवित्र पुरुषोत्तम मासात आपण आपल्या सामर्थ्यानुसार या प्रकल्पांसाठी उदार हस्ते योगदान द्यावे, ही नम्र विनंती. आपल्या देणगीमुळे अनेकांच्या आयुष्यात आशा, शिक्षण, आत्मविश्वास आणि सन्मानाची नवी ज्योत प्रज्वलित होईल.
संस्थेला दिलेल्या देणगीवर आयकर कायद्यानुसार कलम 80G अंतर्गत करसवलतीचा लाभ उपलब्ध आहे.
चला, या अधिक मासात केवळ पुण्यसंचय न करता समाजपरिवर्तनाच्या या यज्ञात सहभागी होऊया. “आपले एक योगदान… कोणाच्यातरी संपूर्ण आयुष्य बदलू शकते.”
देणगी देण्यासाठी उपयुक्त तपशील पुढीलप्रमाणे:
बँकखाते तपशील पुढीलप्रमाणे:
Bank Details:
Name – Alparambha Education And cultural Foundation
Bank – HDFC Bank
Branch – Thatte nagar, Nashik
A/c No – 50200044895711
A/c Type – Current
IFSC – HDFC0000064
UPI पेमेंट ID: Q83910657@ybl
संपर्क:
श्री. रघुवीर अधिकारी :९८२२०००८८३
डॉ. रुपाली कुलकर्णी: ९०११८९६६८१

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन

Leave a comment