–

दिनांक १ मे १९६० रोजी स्थापन झालेल्या नव्या महाराष्ट्र राज्यात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्यासाठी एक विशेष मंच विकसित करावा ही कल्पना श्री. म. ना. गोगटे (१९३२-२०२२) यांना स्फुरली. ते व्यवसायाने स्थापत्य अभियंता असले तरी, त्यांना अनेक विषयांत रस होता. जी भाषा लोकांना सहजपणे समजते त्या भाषेत विज्ञान सांगितले जावे हे धोरण त्यांनी ठरवले. समाजातील काही समविचारी प्रतिष्ठित व्यक्तींची साथ घेऊन त्यांनी राज्यव्यापी मराठी विज्ञान परिषदेची (मविप) स्थापना केल्याचे १९६६ सालच्या २४ एप्रिल रोजी मुंबईत एका सार्वजनिक सभेत जाहीर केले. तिची उद्दिष्टे आणि घटना व नियम तयार करून परिषदेला सार्वजनिक न्यास म्हणून नोंदीकृत करण्यासोबत डिसेंबर १९६६मध्ये परिषदेचे पहिले वार्षिक अधिवेशन आयोजित केले गेले. त्यामुळे जनमानसात मविपची एक स्पष्ट छबी निर्माण होण्यास मदत मिळाली. विशेष म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत कुठलाही खंड पडू न देता परिषद असे विज्ञान अधिवेशन दर वर्षी घेत आलेली आहे.
मविपने त्यानंतर आपल्या प्राथमिकता ठरवल्या आणि घटनेत नमूद केलेली उद्दिष्टे गाठण्याच्या दिशेने योग्य पावले टाकली. त्यात पुढील गोष्टी समाविष्ट होत्या : विविध वैज्ञानिक शाखांतील इंग्रजी शब्दांसाठी मराठी परिभाषा कोश तयार करणे, वार्तापत्र (न्यूजलेटर) सुरु करणे ज्याने पुढे “पत्रिका” या प्रसिद्ध मासिकाचे रूप घेतले, प्रत्येक वयोगटाला अनुरूप असे विज्ञान शिकण्यास आणि शिकवण्यास सोपे जाईल असे उपक्रम हाती घेणे, शास्त्रज्ञ आणि विषयतज्ञांची भाषणे आयोजित करणे आणि विज्ञान तसेच अभियांत्रिकी प्रकल्पांना लोकांच्या सहल-भेटी आयोजित करणे. असे सर्वांसाठी उपयुक्त कार्यक्रम प्रभावीपणे राबवल्याचा परिपाक म्हणजे अनेक व्यक्ती आणि संस्था मविपच्या सभासद झाल्या; हळूहळू देणग्यांचा ओघ परिषदेकडे वळू लागला आणि सुरवातीची आर्थिक कमतरतेची स्थिती दूर होत गेली. अशा लोकाश्रयावर मविपने चुनाभट्टी-सायन या मुंबईच्या भागात स्वत:ची ‘विज्ञान भवन’ ही वास्तू बांधून १९८३पासून तिथून आपले विज्ञान प्रसाराचे कार्य नव्या जोमाने हाती घेतले.

मविपचे मुंबईतील विज्ञान भवन
मागील सहा दशकांत मविपने विज्ञानाशी संबंधित ७०हून अधिक उपक्रम विकसित केले आहेत. त्यांची नियमित समीक्षा केली जाते आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) क्षेत्रात होत असलेले बदल विचारात घेऊन नवे उपक्रम रचले जातात आणि कालबाह्य उपक्रम गाळले किंवा सुधारित केले जातात. काही प्रमुख उपक्रम परिषदेची वेगळी ओळख दाखवणारे असून ते न चुकता घेतले जातात (उदा., शहरी शेती), तर इतर चक्रीय पध्दतीने किंवा मागणी अनुसार आयोजित केले जातात. मूलभूत विज्ञानावर भर असला तरी मविप कृषी, वैद्यकीय आणि पर्यावरण अशा महत्त्वाच्या विषयांवरही लक्ष देते. ती विविध स्पर्धा भरवते, होतकरू विद्यार्थ्यांना विज्ञानात स्नातकोत्तर अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देते आणि स्नातक स्तरावरील विज्ञान संशोधन प्रकल्प करणारे विद्यार्थी आणि त्यांचे मार्गदर्शक यांना पुरस्कार व प्रमाणपत्र प्रदान करते. त्याशिवाय दर तीन वर्षांनी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन तसेच विज्ञान आणि गणित शिक्षकांसाठी मधूनमधून परिषदा ती भरवते. ‘वयात येताना’ या संवेदनशील विषयावर परिषदेने साहित्य तयार केले आणि त्यायोगे व स्थानिक वैद्यकीय तज्ञांची मदत घेऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी गेली कित्येक दशके शेकडो विद्यार्थी-विद्यार्थिनींना मौलिक माहिती व मार्गदर्शन दिले आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे विज्ञानाचे विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ब्रेल लिपीत बरेचसे विज्ञानविषक साहित्य परिषद तयार करत आलेली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मविपने प्रयत्नपूर्वक मराठीतून विज्ञान काल्पनिका (सायन्स फिक्शन) निर्माण करण्यासाठी वेळोवेळी शिबिरे व कार्यशाळा भरवून अशा लेखकांची फळी सातत्याने तयार केली. त्यामुळे मराठी साहित्यविश्वात वेगळे दालन सुरु झाले आणि त्याचे श्रेय मविपला जाहीरपणे दिले गेले आहे.
समाजात वैज्ञानिक साक्षरता वृद्धींगत करण्यासाठी चर्चा, प्रबोधन आणि प्रकाशन ही माध्यमे वापरण्याचा मार्ग मविपने नेहमी अनुसरला; त्यासाठी चळवळ किंवा विरोधात्मक प्रदर्शने असे उपाय टाळले. इथे नमूद करावेसे वाटते की जरी लोकांना वैज्ञानिक विकासाची माहिती व महती मराठी भाषेतून देणे हे मुख्य उद्दिष्ट असले तरी, आवश्यक असेल तेव्हा इतर भारतीय भाषा किंवा इंग्रजीचा वापर त्या कामासाठी परिषद करते. सहकार्याने काम करण्यावर ती भर देते, त्यामुळे अनेक शासकीय संस्था (आकाशवाणी आणि दूरदर्शन वाहिन्या), शैक्षणिक संस्था (शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे) आणि विशिष्ट विषयाला वाहिलेल्या संस्था (जशा की जलवृष्टी संचयन आणि घन कचरा व्यवस्थापन) तसेच समविचारी स्वयंसेवाभावी संस्था (एनजीओ) यांच्यासह परिषद अनेकदा संयुक्त कार्यक्रम किंवा प्रकल्प राबवते.
मविपशी संलग्न ६०हून अधिक विभाग आहेत मात्र ते स्वायत्त असून स्वतंत्रपणे कार्यक्रम आखून परिषदेची उद्दिष्टे पुढे नेणारे कार्यक्रम करतात. मागील सहा दशके नामांकित शास्त्रज्ञ हे परिषदेचे विश्वस्त, पदाधिकारी आणि उपक्रम मार्गदर्शक किंवा कार्यकर्ते अशा नात्यांनी जोडले गेले याचा परिषदेला अभिमान आहे. मविपला त्यांचे ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शनाचा भरीव फायदा मिळत आलेला आहे यात वाद नाही. विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांना त्यांचा प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्षपणे मिळालेला सल्ला आणि प्रोत्साहन याला तोड नाही.
हीरक महोत्सव साजरा करत असताना आगामी युगात आपले महत्त्व टिकून राहाण्यासाठी मविप नवे मार्ग आखत आहे. त्यासाठी परिषदेची बलस्थाने, मर्मस्थाने तसेच उभारून येणाऱ्या संधी आणि आव्हाने यांचे मंथन (एस-डब्लू-ओ-टी (स्वोट) विश्लेषण) चालू झालेले आहे. मोठ्या प्रमाणात शैक्षणिक आणि व्यावसायिक तज्ञांची मान्यता, विभागांचे राज्यभर असलेले जाळे आणि समाजात असलेली उजळ प्रतिमा व पत यामुळे समाजाकडून मिळणारा आधार ही परिषदेची बलस्थाने आहेत; मर्यादित कर्मचारी, अपुरी पडत असलेली जागा आणि विभागांचा अनेकदा अनिश्चित सहभाग ही परिषदेची काही मर्मस्थाने आहेत. तर दुसरीकडे, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० राबवण्यात सहभाग, कृत्रिम बुध्दिमत्तेसह अंकीय तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून विस्तृत समाजापर्यंत उपक्रम नेणे आणि नवनिर्मितीला पोषक कार्यक्रम हाती घेता येणे या संधी आहेत. तथापि, वाढती स्पर्धा, मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत जाणे आणि सामाजिक माध्यमांवरील माहितीवर शास्त्रीयदृष्ट्या विचार न करता लोकांनी विश्वास ठेवणे, अशी आव्हाने नव्या योजना आखताना विचारात घेतली जात आहेत.
गेल्या सहा दशकांत केलेल्या कामांचा वरील आढावा असा विश्वास देतो की मराठी विज्ञान परिषद ही समाजाच्या सर्व स्तरावरील लोकांसाठी विज्ञान प्रसाराला वाहिलेली जबाबदार संस्था असून ती भूमिका पुढेही त्याच नेटाने पार पाडत राहील.

डॉ. विवेक पाटकर
(डॉ. विवेक पाटकर हे मविपच्या गणितसंबंधी उपक्रमांना मार्गदर्शन करतात; ते तिच्या स्थायी समिती आणि मासिक पत्रिकेच्या संपादक मंडळाचे सभासद आहेत.)

Leave a comment