बाली डायरी : भाग ३ :–
बालीला भेट देणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या यादीत उलुवाटू मंदिराचं नाव वरच्या क्रमांकावर असतं ! याचं कारण म्हणजे समुद्राच्या भव्य कॅनव्हासवर दिसणारे त्याचे लोभस रुप, जागेच्या उंचीमुळे होणारे समुद्राचे विशाल दर्शन, तिथला अभूतरम्य सूर्यास्त आणि या सगळ्याच्या साथीने तिथे सादर केले जाणारे पारंपरिक आणि अनोखे.. केचक नृत्य !
हे सर्व एकत्र अनुभवायला हवे असेल तर केचक नृत्यासाठी ऑनलाईन आरक्षण करावे लागते. ते झाल्यावर आम्ही संध्याकाळी चारच्या सुमारास तिथे पोहोचलो. गाईडने दिलेल्या माहितीवरून उलुवाटू इथली माकडं चक्क ‘व्यवहार’ करायलाही शिकली आहेत! ही माकडं पर्यटकांचे गॉगल्स, टोप्या, चप्पल किंवा मोबाईल फोन सफाईने हिसकावून घेतात आणि थोड्या अंतरावर जाऊन बसतात. समोरच्याने फळं किंवा खाद्यपदार्थ दिल्याशिवाय (त्यांना पटतील तीच बरं का ! very selective !! माणसाला मोबाईल किती प्रिय आहे हे या माकडांना चांगलेच ठाऊक आहे.) घेतलेली वस्तू ती लगेच परत करत नाहीत. संशोधकांनी या वर्तनाला ‘रॉबिंग अँड बार्टरिंग’ (चोरी आणि व्यापार) असं नाव दिलं आहे आणि उलुवाटू हे जगातील मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे वन्य माकडांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेलं असं वर्तन दिसतं. त्यामुळे आम्ही सर्व वस्तू खिशात घालून मोकळ्या हाताने आणि उत्सुकतेने भरलेल्या मनाने हे मंदिर पाहावयास निघालो !

(Picture Source: Internet)
‘Ulu’ म्हणजे टोक आणि ‘Watu’ म्हणजे दगड. बालीच्या दक्षिण टोकाला हिंदी महासागराकडे तोंड करून उंच कड्यावर हे मंदिर वसले आहे. बालीतील सहा प्रमुख पवित्र मंदिरांपैकी उलुवाटू हे एक मानले जाते. येथे रुद्र (Rudra) या रूपात समुद्राचे व वाऱ्याचे अधिपती म्हणून शंकराची उपासना केली जाते. तुम्ही सॊरोंग परिधान केलेला असला तरीही मंदिराचे सौंदर्य बाहेरूनच बघावे लागते कारण आत पुजाऱ्यांशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नाही. एका बाजूला ज्यावरून नजर ढळत नाही असा अथांग समुद्र, खाली खडकांवर आदळणाऱ्या लाटा आणि दुसऱ्या बाजूला प्राचीन मंदिराची शांत वास्तू !! पहिल्याच नजरेतच हे दृश्य मनाचा ठाव घेते. इथून दिसणारी समुद्राची भव्यता, सौंदर्य आणि आणि लाटांवर हळूहळू सोनेरी वर्ख पसरत होणारा रम्य (मी पाहिलेला सर्वोत्तम) सूर्यास्त !! निसर्ग आणि अध्यात्म यांचे जणू इथे सहज मिलन झाले आहे. ते सर्व आम्ही जमेल तितके डोळ्यात आणि मनात साठवत होतो. ( या मंदिराच्या स्थान वैशिष्ट्यासाठी हा युट्युब शॉर्ट जरूर पहा : https://www.youtube.com/shorts/pGwj_BNUkC4 )
मंदिराच्या परिसरातील उंच कड्यांच्या कडेने जाणाऱ्या पायवाटा आणि चालण्याचे बांधलेले मार्ग हा इथल्या अनुभवाचा एक सुंदर भाग आहे. एका बाजूला हिरवागार कडा आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला अथांग निळा हिंदी महासागर! चालताना प्रत्येक वळणावर एखाद्या चित्रासारखे दृश्य समोर येते. मंदिराचे वेगवेगळ्या कोनांतून दर्शन घडते. खाली खडकांवर आदळणाऱ्या शुभ्र लाटा बघत आणि समुद्राची गाज ऐकत ही पायपीट एक वेगळाच निसर्गानुभव आपल्याला बहाल करते. (तेव्हा वाटते इथे अख्खा एक दिवस वेळ काढून यायला हवे !!) उलुवाटू जगभरातील सर्फिंगप्रेमींचीही पंढरी आहे. येथील ताकदवान, सातत्यपूर्ण लाटा सर्फर्सना विशेष आकर्षित करतात. आम्हालाही बरेच लोक याचा आनंद घेतांना दिसले. कड्यावर उभं राहून सर्फर्सना लाटांशी झुंजताना पाहणं हा एक सुंदर अनुभव होता.

केचक नृत्य : उलुवाटूच्या भेटीचा कळसाध्याय म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी होणारे प्रसिद्ध केचक नृत्य / Kecak Dance सादरीकरण. खुल्या आकाशाखाली, एका बाजूला समुद्रात मावळणारा लाल-केशरी सूर्य बघत आपण ओपन अँम्फी थिएटरच्या पायऱ्यांवर बसलेलो असताना योग्य वेळ झाली कि अनेक पुरुष कलाकार एकाच लयीत “चक…चक…चक…” असे शब्द उच्चारत आपल्या समोर यऊन गोलाकारात बसतात आणि पुढील नाट्यासाठी वातावरण निर्मिती करतात. केचक नृत्यातून प्रामुख्याने रामायणातील राम, सीता, रावण आणि हनुमानाची कथा साकारली जाते. सूर्य क्षितिजाआड जात असताना, समोर रामायणातील प्रसंग जिवंत होत असतात. आमच्या समोर सुंदर वेशभूषा केलेले कलाकार अवतीर्ण झाले. सीतेचा कांचनमृग हट्ट, रामाचे त्यामागे जाणे, रावणाकडून सीताहरण (सीता: बालीनीज उच्चार देवी शिंता), हनुमान लीला सादर झाल्या. अंधार झाल्यावर समोर अग्नीही प्रज्वलित केला गेला. हनुमान वेषात असणाऱ्या कलाकाराने बऱ्याच प्रेक्षकांशी संवाद साधत, त्यांच्या वस्तुंना हात लावत, अग्नीशी खेळत सर्वांचे मनोरंजन केले.

तिथून बाहेर पडताना आम्ही बार्टर मंकी नाट्य अनुभवले. एका परदेशी ललनेच्या हातातुन तिचा किंमती मोबाईल एका माकडाने पळवला आणि पोहोचायला अशक्य अशा जागी जाऊन मर्कट महाराज विराजमान झाले. बिचारी प्रवासी स्त्री अगदी रडकुंडीला आली होती. शेवटी एका पुजाऱ्याने विविध फळे दाखविल्यानंतर मर्कट महाशयांना त्यातील एखादे पसंतीस पडले असावे. बऱ्याच विनवण्या झाल्यावर मांडवली झाली आणि तेवढ्या वेळात महाशयांनी कित्येक वेळा आपटलेला मोबाईल तिला परत मिळाला. ते पाहून सगळ्यांनी आपापले खिसे तपासून आपले हे प्राणप्रिय गॅजेट आपण नीट पॅकबंद ठेवले आहे ना याची खात्री करून घेतली.
अशी ही आमची उलुवाटूची भेट ! बालीची संस्कृती, निसर्ग, अध्यात्म आणि माकडांचे ‘व्यवहारज्ञान’ ही अनुभवायला देणारी ती एक अविस्मरणीय संध्याकाळ होती. गाईडने दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यात इथल्या समुद्राच्या लाटा रौद्र स्वरूप दाखवतात. ते पाहायला पुन्हा येऊ, असे बेत मनात घोळवत जड पावलांनी त्या रम्य स्थळाचा निरोप घेतला.

डॉ. रुपाली कुलकर्णी
९०११८९६६८१
काही क्षणचित्रे

केचक नृत्य : बालीनीज पारंपरिक वेशातील राम, सीता

अग्नी आणि हनुमान ! (लंकादहन ??)

आंतरजालावरून घेतलेले ओपन अँम्फी थिएटरचे छायाचित्र

समुद्राच्या भव्य कॅनव्हासवर दिसणारे चिमुकले उलुवाटू मंदिर
तुम्हीही बाली ट्रिप प्लॅन करताय का ? किंवा भविष्यात करणार असाल तर..
आमच्या अनुभवी, बोलक्या, उत्साही गाईड आणि वेहिकल सर्व्हिस Agunk बरोबर जरूर संपर्क करा !!
Whatsapp Agunk : +62 877-6153-7543

Leave a Reply