।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कलाभान ७: संगीत आणि आनंद.

–

“आपण आयुष्यात जे काही करत असू त्या कार्यात आपल्याला आनंदाची अनुभूती झाली पाहिजे”, – हा डायलॉग आपण नेहमी ऐकतो पण म्हणजे नक्की काय असावे? आनंद मानू तसा, कुठलीही कला जोपासली की आनंद मिळतो अशी अनेक वचनेसुद्धा आपल्याला आनंद देतात. कारण ती बरीच काल्पनिक ओझी हलकी करतात. आत्मिक आनंद वगैरे नक्की काय असतं याबद्दल सखोल ज्ञान अजूनही प्राप्त होत आहे आणि ते होतच राहणार आहे हीच त्याची खरी मज्जा आहे. पण जे करून शरीर, ज्ञानेंद्रिये, मन अतिशय सहजावस्थेत जातात, प्रसन्न वाटते ते करावे. लोक तणाव घालवण्यासाठी संगीत ऐकतात परंतु चोवीस तास संगीतात असणाऱ्या संगीतकारांना जेव्हा तणाव जाणवत असेल तेव्हा ते काय करत असतील, असा नेहमी प्रश्न पडतो.

(picture source: pintrest)

आनंदाकडे वाटचाल करायचे प्राथमिक पाऊल म्हणजे स्वीकार आहे. कुठलेही शिकण्या-शिकवण्याचे प्रेशर, कार्यक्रम चांगला होईल की नाही हा सकारात्मक तणाव, आवाज बसणे, हातापायाला जखम होणे, नवीन काहीतरी सुचतच नाहीए, मानसिक ब्लॉक होणे, आर्थिक तणाव अशा अनेक तणावांमधून संगीत साधक जात असतात. परंतु या सगळ्याला न डगमगता, आपली वाट तीच ठेऊन, सर्व आव्हानांचा स्वीकार करून ते संगीताला प्राधान्य देतात. कलाकार म्हणून संगीतजगतात टिकून राहणे हे कलाकार होण्यापेक्षा सोपे आहे असे ऐकले आहे पण संगीत जगतात म्हणजे नक्की कुठे? तर हा कुठे प्रत्येकाचा वेगवेगळा असतो.

काहींचे संगीत जग म्हणजे कार्यक्रम, काहींचे अवकाश म्हणजे शिकवणे व शिकत राहणे, काहींचे जग हे स्वतःचा रियाज व सतत स्वतःच्या नजरेत पुढे जाण्यासाठीची धडपड, काहींचे जग म्हणजे यापैकी कशाचेही प्रेशर न घेता संगीतात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ऑर्गनिकली सक्रिय राहणे आणि या प्रोसेसला सरेंडर होणे. अतिमहत्वकांक्षी आणि अल्पसंतुष्ट मधला फरक बॅलन्स साधून मध्यमार्गात राहणे. प्रत्येकाचे जग वेगळे, प्राधान्य वेगळी, आनंद घ्यायची पद्धत वेगळी.

जे संगीतसाधक दुसऱ्याला आनंद द्यायचा प्रयत्न करतात तेही आनंदी आणि जे स्वतः आनंद घेतात आणि त्यांच्या या वृत्तीमुळे रसिक आनंद घेतात तेही आनंदी. सगळ्या विविधतेचे निरीक्षण करून पाहिले तर ‘आनंदाची व्याख्या न करण्यातला आनंद काही औरच’ हे लक्षात येते. रागसंगीतात रमणारा कधी गझलेत रमतो, रॉक गिटार वाजवणारा कधी इसराज वाद्याच्या आर्त मींडेचा आनंद घेतो. सगळ्या संगीतप्रकारांत प्रोफेशनली सक्रिय राहो न राहो पण आपापल्या रियाजात, श्रवणात त्यांचा समावेश नक्की करावा त्यामुळे शब्द, भाव, स्वरलगाव याचे अमर्याद विश्व कळते, कालानुरूप प्रगल्भ होण्यासाठी भरपूर मदतही मिळते आणि सर्वात महत्वाचे आनंद मिळतो. आपल्याला व इतरांना स्वतःच्या किंवा इतरांच्या सादरीकरणातून जर हसावंस, रडावंस, चिडावंस, प्रेरणादायी overwhelmed, वाटत असेल तर याहून दुसरा आनंद तो काय!

संगीतात जादू आहेच म्हणा! ते आनंद म्हणजेच सर्व pleasnt unpleasnt भावनांशी(जी लेबलं आपणच देतो कधीकधी) तुमची ओळख व स्वीकार करून देण्याचे कार्य करते. तबला वाजवताना बोट फुटतेय पण नाद ते सर्व विसरायला लावून आनंद देतोय, गाताना खराश येतेय पण त्यानंतर आपण मौन पाळून थोड्या वेळात परत आवाज तापेल या कल्पनेने वाट बघण्यातला आनंद, मला हे जमू शकेल मधला आनंद, नाही जमले तरी जमेपर्यंत करण्यातला आनंद, कार्यक्रमाची ठरलेली रक्कम न मिळूनसुद्धा कसलाही विचार न करता दिलेला शब्द पाळण्यातला व उत्तम सादरीकरण देण्याचा आनंद, प्रत्येकाची शैली वेगळी असते व आपल्या ठराविक चष्म्यातून न बघता एक निर्मळ रसिक बनून समोरच्याचे सादरीकरण ‘तो एक स्वतंत्र वेगळ्या विचारांचा व्यक्ती आहे.’ हे स्वीकारून, तटस्थपणे ऐकून त्या सादरीकरणातील आवडलेल्या गोष्टींना भरभरून दाद देण्यातला आनंद. एखाद्या वेळेला चुकतं, कधी नाही सुचत, वयानुरूप आवाज, दमसास, शरीराला मर्यादा येऊ शकतात तरीही हे स्वीकारून प्रत्येक टप्प्यावर आपले बेस्ट देण्यातला आनंद, कला पुढच्या पिढ्यांना देण्याचा आनंद, श्रवणानंद, चिंतनानंद सर्वच आनंद. संगीतात राहणे हे ठरलेले आहे. तर अशा आवडीच्या नावडीच्या गोष्टींमधून शिकून आपली सृजनशीलता बहरत ठेवणे, आनंद जागृत ठेवणे यासाठीदेखील संगीतच मदत करते. या संगीतानंदातच राहुयात.



  • ईश्वरी दसककर कदडी

गायिका, संवादिनी वादीका ,संगीतकार, संगीत संयोजक, लेखिका

(लेख: पूर्व प्रकाशित : दैनिक देशदूत)


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a Reply