–
लहानपणी आपण सगळ्यांनीच सापशिडीचा खेळ खेळला असेल. शिडी मिळाली की आनंदाने अंतिम घराकडे मजल व्हायची आणि सापाने गिळलं की पुन्हा खालच्या घरात येऊन पडावं लागे. पण मनोरंजन करणाऱ्या या साध्या खेळाच्या जन्माचा मागोवा तुम्ही कधी घेतलाय का ? चला जरा पाहुयात …

सापशिडी किंवा स्नेक अँड लॅडर या खेळाचं मूळ नाव ‘मोक्षपट’ किंवा ‘मोक्षपत’ होतं, अशी एक प्रचलित मान्यता आहे. या खेळाची निर्मिती मध्ययुगीन भारतात १३ व्या शतकात झाली असावी. मोक्षपटाच्या पारंपरिक संकल्पनेत प्रत्येक चौकट एका सद्गुणाचं किंवा दुर्गुणाचं प्रतीक होती. प्रामाणिकपणा, दया, परोपकार आणि चांगली कर्मं माणसाला उन्नतीकडे नेतात तर लोभ, क्रोध, मत्सर आणि अप्रामाणिकपणा त्याला अधोगतीकडे घेऊन जातात या जीवन तत्वांचा आधार घेऊन खेळातील शिडी आणि साप या संकल्पनांची निर्मिती झाली. शिडी म्हणजे सत्कर्मांमुळे मिळणारी प्रगती, तर साप म्हणजे चुकीच्या कृतींचे परिणाम असा सरळ साधा अर्थ देण्यात आला आणि तयार झाला हा खेळ. खेळाचं अंतिम ध्येय होतं मोक्ष गाठणं म्हणजेच आध्यात्मिक मुक्ती मिळवणं !

काही मान्यतांनुसार या खेळाच्या शोधाचं श्रेय संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे जातं. त्या मान्यतांनुसार जीवनातील चांगल्या टप्प्यावर नेणाऱ्या प्रत्येक शिडीला ज्ञानेश्वरांनी वेगवेगळी नांवे दिलेली आहेत जशी की… सत्संग, सत्कर्म, दया, क्षमा, शांती, प्रेम, सद्बुद्धी तर यातील सापांना नांवे आहेत काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. नेहमीच्या साप-शिडी पेक्षा ज्ञानदेवांच्या साप-शिडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही साप-शिडी चित्रांकित आणि शब्दांकितही होती. साप-शिडीच्या पटाला संलग्न असणाऱ्या दुसर्या पटावर आपली कवडी कोणत्या घरात पडली तर नेमक कसं वागावं यासंबंधीच भावपूर्ण मार्गदर्शन अगदी सहज सुंदर ओव्या मधून केलेलं असायचं. उदा. तुम्ही क्रोधाच्या घरात गेलात तर तिथे तुम्हाला संयमाच महत्व सांगणारी ओवी दिसायची आणि जर तुम्ही विद्येच्या घरात गेला तर विद्या विनयेन कशी शोभते या संबंधीचा गुरुमंत्र वाचायला मिळायचा. किती मस्त आहे ना हे सगळं ?
इंग्रजांच्या भारतातील वास्तव्यात त्यांना बुद्धीबळा प्रमाणेच साप-शिडी हा खेळ खूप आवडला. हळू हळू तो इंग्लंड पर्यत पोहचला. मग इंग्लंडच्या राणीने त्यात काही बदल केले. इंग्लंडमध्ये तो Snakes and Ladders या नावाने ओळखला जाऊ लागला तर अमेरिकेत Chutes and Ladders ही आवृत्ती प्रसिद्ध झाली.
आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा खेळ सगळ्यांच्या आवडीचा आहे. मात्र, या खेळातून मिळणाऱ्या सोप्या तत्त्वज्ञानाकडे बरेचदा आपले लक्ष्य जात नाही. तसं पाहिलं तर आयुष्याचा पटही सापशिडीसारखाच आहे नाही का ? चांगली कर्मं आपल्याला उंचीवर नेतात, तर चुकीचे निर्णय आपल्याला खाली खेचतात. या युगात आपल्या प्रत्येक सत्कर्माने आघाडीची शिडी मिळेलच असं नाही आणि आपल्या दुष्कर्माने प्रत्येक वेळी परिस्थितीचा साप आपल्याला गिळेलच असंही नाही. महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्राप्त परिस्थितीत पुन्हा, पुन्हा उभं राहणं आणि योग्य दिशेने वाटचाल करत राहणं !
टीम अल्पारंभ

संदर्भ : https://www.lexology.com/library/detail.aspx?g=dfe9c55b-7ae9-4d05-84b6-5f841434aab1
आणि इंटरनेट

Leave a Reply