।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कलाभान ६: पार्श्वसंगीत

–

आपल्याला निसर्गतःच संगीत लाभलेले आहे. गळ्याच्या रुपात स्वर, हृदयाच्या ठोक्याच्या रुपात ताल या देणग्या आपल्याला मिळाल्या आहेत. निसर्गात आपण शोधले तर संगीतच संगीत सापडेल. आपल्या प्रत्येकाच्या रुटीनमध्ये पार्श्वसंगीत सुरू असते. आपण अचानक खाता खाता खाऊचा डबाच वाजवत बसतो, रस्त्यावर वरात बघितली की मान, खांदे आपसूकच डोलावले जातात, अचानक रेडिओवर किंवा आजूबाजूला ऐकलेले गाणे आपल्या मनात नकळत सुरू होऊन घरातल्या घरात नानाना – लालाला करत आपण गुणगुणतो, कधीकधी रियाज करत असताना खिडकीखाली भाजीवाल्या काकांचा भाजी ssss हा स्वर आणि माझ्या तानपुऱ्याचा षड्ज एकसारखा असल्याचा गंमतशीर आनंद मी घेतला आहे अनेकवेळा. ड्रिलमशीन अथवा मिक्सरची मींड असो किंवा तालात भाकरी थापणे असो, आजूबाजूला चालू असलेल्या गाण्यावर चालता चालता पाऊले तालात टाकणे असो, सगळीकडे संगीत आहे. कधीकधी असे वाटते, ट्रक व गाड्यांच्या हॉर्नच्या पट्ट्या C E G (सागप) अशा ठरवून घ्याव्यात. म्हणजे ट्रॅफिक जॅम मध्ये एकत्र वाजल्यावर गोंगाटाच्याऐवजी chords सिम्फनी ऐकू येईल आणि आपल्याला रोजच्या आयुष्यातील हे पार्श्वसंगीत सुसह्य होईल.

आजूबाजूला पार्श्वसंगीत शोधत राहिले पाहिजे. आपल्या जवळच्या माणसांचे स्वर आपल्याला माहीत असतात. “ऐकलंस का?” च्या टोनवरून आपल्याला कळते की मामला खरोखरच श्रवणीय आहे की समोरच्याला काहीतरी ऐकवायचे (सुनवायचे) आहे. संगीत हे ध्वनिला संगीतपयोगी बनवून म्हणजेच नादामध्ये रूपांतरित करून मग स्वर, स्वरसंगती असा सर्व प्रवास सुरू असतो. संगीत ही रंजनाची गोष्ट नव्हतीच कधी! ती गरज आहे मनाची! जे स्वर आपल्यातील सर्वच भावनांना वाट करून देतात ते सतत आपल्याला आजूबाजूला असले की आपल्यातील संवेदनशीलता किती जपली जाईल.

(Source: Pintrest)

एखादी टीव्ही मालिका, चित्रपट आपण म्युट करून बघा म्हणजे पार्श्वसंगीताच्या ताकदीचा अंदाज येईल. स्वयंपाकघरात काम करताना हॉलमध्ये टीव्हीवर मालिकेतील कुठले पात्र आले आहे, आणि डायलॉगशिवाय आपण उत्सुकतेने बाहेर बघायला जातो तर यासाठी ‘त्या पात्रासाठी स्ट्रॉंग इस्टेबलिश केलेले पार्श्वसंगीतच’ आपल्याला आकर्षित करते. आपल्याला एखाद्या शिट्टीवर वाजवलेल्या धूनवरून चित्रपट कळतो तर ती कमाल पार्श्वसंगीताची आहे. हॉरर, थरारक, वीररसयुक्त चित्रपटात समर्थ पार्श्वसंगीतच वातावरणनिर्मिती करत असते. DDLJ मधील मेंडोलीन, गब्बरसिंग पात्राचे पार्श्वसंगीत, KGF चे पार्श्वसंगीत अशी अनेक उत्तम उदाहरणे आहेत. चित्रपटाचे नाव घेतले की ते संगीत आठवते किंवा संगीत ऐकले की चित्रपट आठवतो. इतकी एकजीवता.

चित्रपटातील परिस्थितीनुसार आनंदी, दुःखी, गूढ अशा सर्व situations संगीताद्वारे रंगवल्या जातात. सारंगीचा एखादा पिळवटून टाकणारा रडवणारा स्वर, रोमांचित करणारे हॉर्नस, मंत्रमुग्ध करणारी बासरी, आनंदित करणारे संतूर आणि स्वरांवर, गळ्यावर आणि वाद्यांवर असंख्य प्रयोग करत दर्जेदार, असरदार संगीत देणारे दिगदर्शक संगीताला लाभले आहेत. चित्रपटात किंवा मालिकांमध्ये एक थीम स्वरावली ठरवली जाते व ती आनंदी, दुःखी, कोप या मुडनुसार वेगवेगळ्या लयीत, वाद्यांवर, आलापात सादर होते. जेणेकरून प्रेक्षकांच्या मनात त्या चित्रपटाचे, मालिकेचे सर्व सीन ठसतात. हे खूप मोठे काम आहे. पार्श्वसंगीत हे वाद्य व स्वराशिवाय देखील असते बर का! तुम्ही बाहेरून येताय आणि घरात टीव्ही वर विशिष्ट गर्दीचा आवाज तुम्हाला ऐकू येतो आणि तुम्हाला कळते की मॅच चालू आहे. पार्श्वसंगीत चालू असताना एखाद्या महत्वाच्या डायलॉग आधी ते संगीत थांबवले जाते, आणि कुठल्याही संगीताशिवाय तो डायलॉग सादर होतो आणि पॉवरफुल ठरतो. Silence between the notes ही देखील सच्चा पार्श्वसंगीत दिगदर्शकाची ओळख असते. वादळी वारा, पाऊसाचे थेंब, पाण्याची खळखळ, लाटा, पक्ष्यांचा किलबिलाट, लतादीदी आशाताईंची गाणी, तानपुऱ्याचा नाद, तबल्याचे आवर्तन, छंद सब संगीत है. थोडा वेळ काढून आपण याची दखल घेऊन जागरूकतेने या पार्श्वसंगीताचा आनंद घेऊया.


  • ईश्वरी दसककर कदडी

गायिका, संवादिनी वादीका ,संगीतकार, संगीत संयोजक, लेखिका

(लेख: पूर्व प्रकाशित : दैनिक देशदूत)


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a Reply