।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कलाभान २ : संगीताचे डोळे म्हणजे कान !

माझे आजोबा नाशिक क्षेत्रातील नामवंत संगीततज्ञ व गुरू पं प्रभाकर गोविंदशास्त्री दसककर. घरात नेहमीच त्यांच्या शिकवण्यांचे आवाज कानावर पडता पडता अनेक बंदिशी प्रत्यक्ष न बसता शिकायला मिळायच्या. ते त्यांच्या विद्यार्थ्यांना नेहमी “संगीत कानाने बघायला शिका.” असे सांगत असत. शिकण्याच्या पायऱ्यांमध्ये निरीक्षण, संस्कार, अनुभव, सराव असे अनेक पैलू आहेत. संगीत शिकण्याची पहिली पायरी म्हणजे ‘श्रवण’ होय. आजोबा तर त्याला श्रवणविद्याच म्हणायचे. श्रवणकला ही किती सुंदर संकल्पना आहे. तुम्ही कुठेतरी स्वर ऐकले, मगच तुमच्या मनाला ते भावून तुम्हाला त्याच्याविषयी जाणून घेण्याची, त्यांच्या सहवासात राहण्याची इच्छा झाली ना! जेव्हा पालक क्लास लावायला येतात तेंव्हा “मुलांना लवकर संगीत येण्यासाठी काय करावे?’ असे विचारल्यावर माझे बाबा व गुरू पं. सुभाष दसककर यांना मी नेहमी हेच सांगताना ऐकलंय की, “आधी तुम्ही त्यांना भरपूर संगीत ऐकवा.” आणि अगदी खरंय आपण लहान बाळाशी जे बोलतो, ते त्याच्या कानावर पडून जशी तो भाषा, बोलचाली शिकतो अगदी तसंच.

पूर्वीच्या काळी शिकायला आल्यावर अनेक काळासाठी शिष्याला फक्त संगीत ऐकण्यासाठी बसवले जायचे. संगीत कानावर पडून जेव्हा मनात जायचं ना, तेव्हा पुढील गोष्टी खूप सोप्या व्हायच्या. तुम्ही अनुभवत असाल की काही लोकांजवळ आपण फार मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो. आपल्याला त्यांच्या सहवासात आनंदी कसे बरे वाटते? कारण त्यांना लेबलं न लावता फक्त शुद्ध श्रवणकला अवगत असते. शांतपणे ऐकणारा असला की व्यक्ता घडतोच. आत्ताच्या काळातदेखील शिक्षणाच्या वाढत्या वेगाबरोबर श्रवणाला शक्य तितके प्राधान्य दिले पाहिजे मग ते अगदी शाब्दिक संभाषण असो किंवा स्वरेल संभाषण म्हणजेच संगीत. ‘उत्तम श्रोता उत्तम वक्ता’ होतो. हे अनुभवाचे बोल अनेक थोरामोठ्यांनी उगाच नाही लिहिलेत. नवविधा भक्तीमध्येदेखील सर्वात पहिले प्राधान्य श्रवण या भक्तीमार्गाला दिले आहे. अतिशय सुलभ, जाता येता होणारी गोष्ट आहे ही. फक्त लक्ष द्यायला हवे. कान तयार असले की स्वर ओळखता येणे, सूक्ष्म स्वरज्ञान म्हणजेच श्रुती कमी आहे की जास्त हे कळणे, तालाच्या मात्रा कळणे, वाद्यांचे ट्युनिंग करणे असे अनेक संगीतासाठी आवश्यक स्किल्स डेव्हलप होतात.

संगीतकारांचे करियर तर श्रवणावरच घडते. बारकाईनं जेव्हा मध्य कलाकाराचे स्वर ऐकून ते संवादिनीवर जसेच्या तसे उतरवतात, बंदीशीतील अक्षरांचे वजन चपळाईने हेरून, योग्य ताल ओळखून तबल्यावर समर्पक लय देतात तेव्हा संगतकार किती सावधरित्या व कानात तेल घालून मैफिलीसाठी बसतात याचा अंदाज आपण बांधू शकता. नाद संयोजक(sound engineers) जेव्हा हेडफोन्स वर गाण्यांचे मिक्सिंग मास्टरिंग करताना तंत्रज्ञानाचा वापर करून रसिकांच्या डाव्या कानात कुठल्या वाद्याचा नाद, उजव्या कानात किती प्रमाणात नाद, डावीकडून उजवीकडे फिरता आवाज अशा सर्व पैलूंवर काम करतात. त्यामुळे आपल्याला ते गाणं जसं काही आपण प्रत्यक्षच ऐकतोय असा भास निर्माण करून परमोच्च अनुभूती देतं. या तंत्रज्ञानाला स्टिरीओ पॅनिंग म्हणतात. यासाठी त्यांचे कान तयार असावे लागतात. गुरूंना तर फार धैर्य ठेऊन ऐकावे लागते तेव्हाच त्यांना सुधारणा सांगून शिष्य घडवता येतात आणि इतरांच्या चुका ऐकूनदेखील आपण किती शिकतो नाही का?

ऐकण्याची काय मजा आहे ना. श्रवणाने ज्ञान मिळते. संगीत प्रत्यक्षात गात वाजवत नसलेला व्यक्तीदेखील सततच्या श्रवणाने समीक्षण, रसग्रहण करू शकतो. अनेक कलाकार ऐकून व मेहनत करून घडलेले आपण पाहतो. हे खूप मोठे वरदान आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आधी ऐकावे, भरपूर ऐकत राहिल्यानंतर काय ऐकावे, कसे ऐकावे, किती ऐकावे याची आपापली वेगळी उत्तरं प्रत्येकाला मिळतात. श्रवण हा सुद्धा एक संस्कार आहे. एकाच रागाची, बंदीशीची मांडणी वेगवेगळ्या कलाकारांकडून ऐकल्यानंतर त्या बंदीशीचे, रागाचे असंख्य कंगोरे कळतात. श्रवण हे स्वीकारक्षम, पूर्वग्रहवीरहित, तुलनाविरहीत असायला हवे. तरच त्यातून आनंद व साधनेकडे वाटचाल होते. कोणत्या श्रवणातून आपल्याला काय पटते आहे, किती व कसे घ्यायचे आहे हे कळण्यासाठी आधी non judgemental श्रवणच करावे लागते आणि त्यातूनच गोष्टी उलगडतात. श्रवणाचा गाभा कल्पनेपलीकडे मोठा आहे. कला व्यक्तिसापेक्ष आहे हे कायम ध्यानात ठेऊन ऐकावे. गाणाऱ्याचे म्हणणे प्रत्येक ऐकणाऱ्याला वेगवेगळे ऐकू येऊ शकते आणि एकच रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा ऐकले तर त्यातूनदेखील प्रत्येक वेळी नवा अर्थ, नवे विचार, नवे भाव, नवीन लगाव, नवीन कल्पना पदरी पडतात. श्रवणातून मनातील व्यक्ताव्यक्त भाव जागृत होतात. श्रवणाला भावबुद्धीची जोड मिळाली की संगीत शिकण्याचा, रियाजाचा वेग वाढायला मदत होऊन साधना फार आनंददायी होऊ शकते. तर मग संगीतप्रेमींनो, कानाडोळा न करता कानाचेच डोळे करूया आणि संगीताचा आनंद लुटुया.


  • ईश्वरी दसककर कदडी

गायिका, संवादिनी वादीका ,संगीतकार, संगीत संयोजक, लेखिका

(लेख: पूर्व प्रकाशित : दैनिक देशदूत)


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment