।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


|| अथ योगानुशासनम् ||

भारतीय जीवन शैली अतिशय निरामय आहे. फार पूर्वी म्हणजे पाच हजार वर्षांपूर्वी भारतीय ऋषी-मुनींनी हया जीवन शैलीचे वर्णन करून ठेवले आहे. महर्षी पातंजली मुनींनी हे ‘जीवनशैली ज्ञान’ सूत्रबद्ध करून समाजापुढे ठेवले आहे. यात एकूण १९५ सूत्रे आहेत, ज्यांची विभागणी चार पादात ( विभागात) केलेली आहे.

पहिला पाद आहे समाधी पाद. त्यातील पहिले सूत्र आहे. ||अथ योगानुशासनम || हे सूत्र फक्त तीन शब्दांचे पण खुप महत्वाचे आहे. तेच सुत्र आपण समजून घेऊयात.

यात पहिला शब्द आहे ‘अथ’. ज्याचा सामान्य अर्थ आहे ‘आत्ता / इथे’. हा शब्द मंगल चरण म्हणून वापरण्यात आला आहे. प्रत्येक हिंदू धर्माच्या ग्रंथाची सुरुवात नेहमी मंगल चरणाने केली जाते. ‘अथ’ हा शब्द वर्तमान काळ दर्शवतो. मंगल शब्द म्हणजे शुभ शब्द, देवतेचे स्मरण होय. पातंजली मूनी सूचित करतात कि तुम्हाला जर तुमच्या जीवनाचे सार्थक करायचे असेल तर..आत्ताच सुरुवात करा. कशाची ? योग अभ्यासाची ! ‘अथ’ चा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण अनेक वेळा चांगल्या / महत्वपूर्ण गोष्टी / सवयींची सुरुवात उद्यावर ढकलतो, पण हे सूत्र सांगते की चांगल्या गोष्टी करण्यासाठी योग्य वेळ म्हणजे ‘आज , आत्ताच’ आहे.

दुसरा शब्द आहे ‘योग’. हा शब्द ‘युज’ धातू पासून आला आहे. युज म्हणजे मिलन होणे / जोडणे. इथे जीवात्म्याला परमात्म्याशी जोडणे म्हणजे योग असा अर्थ घ्यायचा आहे. योग आपल्याला शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधायला शिकवतो. यामुळे मानसिक शांतता, एकाग्रता आणि आरोग्य सुधारते. मन एकाग्र करणे, विचारांवर नियंत्रण ठेवणे — हे आजच्या युगात सर्वात मोठे आव्हान आहे. ध्यान आणि योगनिद्रेच्या अभ्यासाने मन शांत होते.

‘अनुशासन’ या सूत्रातील तिसरा शब्द. आपले अज्ञान दूर करण्यासाठी एक शिस्तबद्ध नियोजन म्हणजे अनुशासन. स्वतःला शिस्त लावणे, भारतीय प्राचीन ग्रंथांचे, वेद-उपनिषदे यांचे शिस्तबद्ध अध्ययन करणे व अज्ञान दूर करणे म्हणजेच अनुशासन होय. अनुशासन आपल्याला नियमितता, संयम आणि आत्मनियंत्रण शिकवते, जे यशस्वी आणि संतुलित जीवनासाठी अत्यावश्यक आहे. योगानुशासनाचे अंतिम ध्येय आहे — जीवात्म्याचे परमात्म्याशी मिलन ! जो माणूस आपल्या जीवनात शिस्त, नियमितता आणि आत्मनिरीक्षण आणतो, तो हळूहळू जीवनाच्या खऱ्या अर्थाकडे वाटचाल करायला सुरुवात करतो.

दैनंदिन जीवनात योगानुशासनाचे महत्त्व

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस शारीरिक, मानसिक आणि आत्मिक अशा तिन्ही पातळ्यांवर थकलेला दिसतो. अशा वेळी महर्षी पातंजलींनी सांगितलेल्या ‘योगानुशासनाची’ आठवण होणे स्वाभाविक आहे. ‘अथ योगानुशासनम्’ या एकाच सूत्रात जीवन जगण्याचे संपूर्ण तत्त्वज्ञान सामावलेले आहे.


– सौ. रत्ना कुलकर्णी.


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment