–

मांडव परतुनी शिशिर सोहळा,
रंगित गंधित वसंत आला,
वसंतासवे शिरीष दारी,
कळ्या कळ्यांनी बहरून आला.
थंड हवा ही सांजसकाळी,
गोड गुदगुली स्पर्शुन गाली,
भर माध्यान्ही झळा उन्हाळी,
तप्त धरा अन् नभी काहिली.
पर्ण फुले अन् पक्षी प्राणी,
सुकते जळते अवघी अवनी,
अतीव अंगारातुन बहरी,
शिरीष दारी वटवृक्षापरि.
हिरव्या पानी मोरपिसारा,
फुलवुनी बसला झेली दिनकरा,
शीतल छाया शीतल वारा,
तप्त धरेला मिळे किनारा.
पानापानातुनी हासरा,
गुलाब रंगी फुले फुलोरा,
उत्सव करिती तुरे साजरा,
प्रीतीची ही रीत दिलवरा.
—

सौ. स्मिता देशपांडे

Leave a comment