–
“या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”
आपल्या सर्वांमध्ये, यत्र-तत्र-सर्वत्र, संपूर्ण सृष्टीत शक्तीच्या रूपाने वसणाऱ्या आदि शक्तीला माझा शतशः प्रणाम.
आपण बनलो कशापासून आहोत? आपल्या आजूबाजूला दिसणारे हे विश्व नेमके कशाने तयार झाले आहे? असे प्रश्न मानवाला खूप पूर्वीपासून पडत आले आहेत. साध्या भाषेत उत्तर द्यायचे झाले तर आपण म्हणतो—आपण पदार्थांपासून बनलो आहोत.
पाणी, हवा, माती, दगड, झाडे, प्राणी, माणूस—हे सर्व पदार्थच आहेत. आपण स्वतःही अनेक जैविक घटकांनी बनलेलो आहोत. या प्रत्येक गोष्टीमध्ये एक समान गोष्ट असते—ती म्हणजे “वस्तुमान”, म्हणजेच त्या गोष्टीचे अस्तित्व आणि वजन जाणवण्यामागची मूलभूत गोष्ट.
शाळेत आपण शिकलो आहोत की सर्व पदार्थ अणूंनी बनलेले असतात. उदाहरणार्थ, हायड्रोजन हा सर्वात साधा अणू आहे. त्याच्या मध्यभागी एक प्रोटॉन असतो आणि त्याभोवती एक इलेक्ट्रॉन फिरत असतो.

वैज्ञानिकांनी अभ्यास केला असता असे दिसून आले की प्रोटॉनचे वस्तुमान इलेक्ट्रॉनपेक्षा जवळजवळ २००० पट जास्त असते. त्यामुळे एका हायड्रोजन अणूचे बहुतांश वस्तुमान हे प्रोटॉनमुळेच असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, एका प्रोटॉनचे वस्तुमान म्हणजे जवळपास पूर्ण अणूचे वस्तुमान.
पण इथेच एक आश्चर्यकारक गोष्ट समोर येते.
पूर्वी असे वाटत होते की प्रोटॉन हा पदार्थाचा सर्वात छोटा आणि अंतिम भाग आहे. पण पुढील संशोधनात समजले की प्रोटॉनसुद्धा आणखी लहान घटकांनी बनलेला आहे. त्यामध्ये दोन “अप क्वार्क”, एक “डाउन क्वार्क” आणि त्यांना एकत्र बांधून ठेवणारे “ग्लुऑन” असतात.
वैज्ञानिकांनी या छोट्या घटकांचे वस्तुमान मोजण्याचा प्रयत्न केला. तेव्हा असे आढळले की या तिन्ही क्वार्कचे एकत्रित वस्तुमान हे प्रोटॉनच्या एकूण वस्तुमानाच्या फक्त १% आहे!
मग उरलेले ९९% वस्तुमान कुठून येते?
हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
आपण ज्या गोष्टींना “पदार्थ” म्हणतो, ज्या पदार्थांपासून आपले शरीर, पृथ्वी, तारे, ग्रह आणि संपूर्ण विश्व बनले आहे—त्यातील फक्त १% वस्तुमान प्रत्यक्ष दिसणाऱ्या घटकांमधून येते, आणि उरलेले ९९% दुसऱ्याच कारणामुळे तयार होते.
हे उरलेले ९९% वस्तुमान त्या शक्तीतून निर्माण होते जी या क्वार्कना एकत्र बांधून ठेवते. क्वार्क्स अतिशय वेगने gluons ची देवाण-घेवाण करतात. ह्या प्रक्रियेमुळे निर्माण होणारी ऊर्जा प्रोटॉनला स्थिर ठेवते आणि हीच ऊर्जा पदार्थाच्या बहुतांश वस्तुमानाला कारणीभूत ठरते.
इथे आपल्याला E = mc^2 हे प्रसिद्ध समीकरण आठवते.
याचा साधा अर्थ असा—वस्तुमान आणि ऊर्जा या वेगळ्या गोष्टी नाहीत; त्या एकाच सत्याची दोन रूपे आहेत. म्हणजेच, आपण ज्याला “वस्तुमान” समजतो, त्यातील मोठा भाग हा प्रत्यक्षात ऊर्जेचेच रूप आहे.
याचा अर्थ खूप सुंदर आहे.
आपले शरीर, आपले विचार, भावना, आणि हे संपूर्ण विश्व—हे फक्त घन पदार्थ नाहीत. त्यामागे एक मूलभूत शक्ती कार्यरत आहे. आपण सर्वजण त्या एकाच शक्तीची वेगवेगळी रूपे आहोत.

ज्याला आपण “आदि शक्ती” म्हणतो, ती केवळ आध्यात्मिक कल्पना नाही. ती आपल्या अस्तित्वामागील एक गहन सत्य आहे. हे ऐकताना एखाद्या विज्ञानकथेप्रमाणे वाटू शकते, पण हेच वास्तव आहे.
आणि अजून एक आश्चर्य—
आजच्या नव्या संशोधनानुसार, आपण जे १% वस्तुमान मोजले आहे, तेही पूर्णपणे खरे वस्तुमान नाही, असे दिसून येत आहे!
ते कसे, हे आपण पुढील लेखात पाहूया.

श्री. हर्षद बोकील
Harshad is that engineer who gets bored with easy problems. Build lithium-ion batteries? Sure. But he wanted spaceships too—which is why he worked with Sony and a spacetech startup in Japan. After about 5 years there, he came back and started his own company. An IIT Bombay alumnus with a genuine love for physics and astronomy, he’s made a career tackling the hardest stuff in energy, mobility, and space. Now, as Head of R&D at Futran Podcar, he’s still doing exactly that—solving problems everyone else thinks are impossible.

Leave a comment