।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


कहा तुम चले गये..

स्मरण, गझल सम्राट स्व. जगजीत सिंग यांचे !

भारतीय संगीत सृष्टीची श्रीमन्ती आणि त्यातली विविधता आपण सर्व जाणतोच. आपल्याकडे समृद्ध अशा शास्त्रीय संगीताबरोबरच, उपशास्त्रीय श्रेणीत येणारे संगीताचे अनेक प्रकार आहेत ज्यात ठुमरी, दादरा, भजन, नाट्यसंगीत, कव्वाली यांच्याबरोबरच गझल गायन हा अतिशय लोकप्रिय असणारा संगीत प्रकार ! गझल गायन प्रकाराला अनोखी उंची आणि सर्वाधिक लोकप्रियता देण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते नाव म्हणजे “स्व. जगजीत सिंग” !! जगजीत सिंग यांच्या आवाजाची खासियत म्हणजे त्यांचा विशेष खर्जातला पण मखमली आवाज जो थेट श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचतो ! त्यांचे गाणे ऐकताना शब्दासूरांच्या अनोख्या मिलाफात रसिक गुंग होऊन जातो ! अजूनही तरुणाईत जर गझल लोकप्रिय आहे, तर त्याचे श्रेय स्व. जगजीत यांनाच जाते !

जगजीत सिंग यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९४१ रोजी राजस्थानातील श्री गंगानगर या छोट्याशा शहरात झाला. त्यांचे खरे , पहिले नाव होते  जगमोहन सिंग धिमन.  शालेय शिक्षण सुरु असतानाच जगजीत याना चित्रपट बघण्याचे आणि त्यातील संगीताचा आनंद घेण्याचे वेड  होते. हे वेड अशा तऱ्हेचे की शाळेऐवजी ते चित्रपटगृहात जाऊन बसत. बरेचदा वापरली गेलेली, फाडलेली तिकिटे एकत्र चिकटवून, तिकीट चेकरला पटवून किंवा त्याचा डोळा चुकवुन जगजीत सिनेमे बघायला जात असत. अर्थात सिनेमातील अभिनयापेक्षा त्यातील संगीताकडे जगजीत यांचा ओढा रहात असे! एकदा ते असेच सिनेमा बघत असताना, त्यांच्या वडिलांना याची खबर लागली आणि जगजीत यांचा कान धरून वडिलांनी त्यांना हातांचा प्रसाद देत देत घरी नेले होते! संगीतात रममाण होणाऱ्या जगजीत यांनी घर सोडून चित्रपट गृहात जाऊन बसू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी अनिच्छेनेच त्यांना घरीच संगीत शिकण्याची व्यवस्था केली आणि गुरु पंडित छगनलाल शर्मा आणि उस्ताद जमाल खान यांचेकडे जगजीत यांचे संगीत शिक्षण सुरु झाले!  असे हे लहानपणा पासूनच जगजीत यांना लागलेले संगीताचे वेड!

शालेय शिक्षणानंतर जगजीत यांनी जालंधरमधील DV महाविद्यालयातून कला शाखेतील पदवी घेतली. त्याकाळी ऑल इंडिया रेडिओच्या जालंधर स्टेशनवर गाता गाता संगीत क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. जगजीत यांचे संगीतवेड हे त्यांच्या वडिलांना मान्य नव्हतेच! त्यामुळे कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना मार्च १९६५ मध्ये जगजितसिंग यांनी कोणालाही न सांगता घर सोडले आणि ते मुंबईच्या मायानगरीत आले. सुरुवातीच्या संघर्षानंतर सुरुवात त्यांनी जिंगल गायनापासून केली. यथावकाश जगजीत यांच्या आवाजाची जादू त्याकाळातील अग्रेसर म्युजिक कंपनी HMV पर्यन्त पोहोचली. १९६६ मध्ये जगजीत यांना HMV कंपनीचे आमंत्रण मिळाले. HMV ने जगजीत यांच्या दोन गझलांचे रेकॉर्डिंग केले. त्यांना या Extended Play च्या जाहीरतीसाठी जगजीत यांचा एक फोटो हवा होता. पण त्या वेळी जगजीत यांचे रूपडे शुद्ध पंजाबी थाटाचे होते. ‘दाढी, पगडी अशा पेहरावात गायक शोभत नाही’, असे त्यांना सांगितले गेले. त्यामुळे त्यांनी पगडी आणि दाढी काढून टाकली. वडील रागावतील म्हणून त्यांनी मोठ्या भावाला चिठ्ठी लिहून सांगितले, की ‘लोक शीख रूपात गायकाला स्वीकारत नाहीत म्हणून मी आता शीख रूपात तुम्हाला परत दिसणार नाही.’ ..तर असा हा जगजीत यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.

मुंबईमध्ये आल्यानंतर जगजीत यांचे सुरुवातीचे जीवन कठीण होते. ते लहान मैफिलींमध्ये गाऊन उदरनिर्वाह करत होते. चित्रपट सृष्टीत संधी मिळत नसतांनाही, जगजीत यांचा ओढा हा गझल गायनाकडे कायम राहिला! परंतु उदरनिर्वाहासाठी ते जिंगल रेकॉर्डिंगही करत राहिले! अशाच एका जिंगल रेकॉर्डिंगमध्ये त्याची भेट बंगाली गायिका चित्रा दत्ता यांचेसोबत झाली. बंगालच्या चित्रा आणि पंजाबचे जगजीत यांनी एकत्रितपाने साधारण २० भाषांमध्ये जिंगल्स गायलेली आहेत. जगजीत-चित्रा यांचा एकत्रित सांगीतिक प्रवास जो सुरु होता, तेव्हा जगजीत यांचे चित्रावर प्रेम जडले होते! चित्रा यांना जगजीत यांचा खर्जातला आवाज बिलकुल पसंत नव्हता! तेव्हा त्यांना खुश करण्यासाठी जगजीत नेहेमी चित्रा यांच्या आवडत्या गायकाची, तलत मेहमूद यांची गाणी गुणगुणत असत! अखेर जगजीत यांनी आपल्या मनातील भाव चित्रा यांना सांगितले! तेव्हा चित्रा या त्यांच्या लग्नाच्या शेवटच्या टप्प्यावर कन्या मोनिकासह उभ्या होत्या. चित्रा दत्ता आपल्या पहिल्या लग्नातून मुक्त होताच १९७० मध्ये दोघे विवाहबंधनात बांधले गेले! भविष्यात त्यांनी एकत्रितपणे अनेक रेकॉर्डिंग्स केले. अनेक अल्बमसची निर्मिती केली. देशो-विदेशी गायनाचे दौरे केले.  या दोघांनी  एकत्रित गायलेली अनेक अजरामर गीते, आजही  रसिकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत !

१९७५ मध्ये, HMV ने जगजीत  यांना त्यांचा  पहिला LP (लाँग-प्ले) अल्बम तयार करण्यास सांगितले ! संगीतकार खय्याम या अल्बमच्या धून बनविणार होते ! परंतु त्यांच्या व्यस्ततेमुळे ते होऊ शकले नाही आणि अखरेस HMV ने जगजीत यांनाच संगीत देण्यास सांगितले ! जगजीत यांनी मेहनत घेतली आणि तयार झाला जगजीत चित्रा यांचा पहिला वहिला  अल्बम  “द अनफॉरगेटेबल्स” !! या अल्बममध्ये   ज्या गझल रचना होत्या,  त्या, त्याकाळातील  ऑर्थोडॉक्स गझल प्रकारांपेक्षा  पूर्णपणे वेगळ्या होत्या. पारंपारिक गझल गायनातील जी वाद्ये होती म्हणजे अर्थात  सारंगी आणि तबला त्यांना आधुनिक वाद्यांनी उचलून धरले होते. त्यामुळे अतिशय वेगळ्या धाटणीच्या या गझल्स रसिकांनी उचलून धरल्या.  या अल्बमने जगजीत आणि चित्रा सिंग याना खूप यश आणि प्रसिद्धी मिळवून दिली. “सरकती जाये है रुख से नकाब आहिस्ता आहिस्ता”, “बात निकलेगी तो फीर दूर तलक जायेगी “,या सुप्रसिद्ध गझल याच अल्बम मधील ! 

जगजीत आणि चित्रा यांचा अल्बम  “द अनफॉरगेटेबल्स” जेव्हा भारतात अतिशय हिट झाला होता, तेव्हा ते यश पहायला हे दाम्पत्य भारतात नव्हते. दुबईचे शेख यांनी दिलेल्या आमंत्रांवरून त्यांनी दुबई आणि नंतर लंडन मध्ये अनेक मैफिली केल्या. सहा महिन्याच्या दौऱ्यानंतर जेव्हा ते भारतात परतले तेव्हा हा अल्बम रसिकांनी डोक्यावर घेतला होता. लोकप्रियतेचे, अल्बम विक्रीचे  सारे रेकॉर्ड्स तोडले होते. गझल ही श्रीमंतांच्या घरातून उतरून सामान्य माणसाच्या ओठावर आली होती. स्वतः जगजीत हे यश पाहून आश्चर्यचकित झाले. १९७० च्या दशकात HMV कडून ८०,००० रु. ची, तेव्हाच्या काळात इतकी मोठी रॉयल्टी घेणारे हे पहिले गझल गायक!  या अल्बमच्या यशापासून सुरु झालेला प्रवास पुढे अनेक अल्बमसच्या निर्मितीस कारणीभूत झाला ! पुढील १० वर्षात जगजीत यांचे तब्ब्ल १६ म्युझिक अल्बम आले. १९८० मध्ये अनेक बहारदार, लोकप्रिय झालेले अल्बम आले ! त्यात ‘A milestone’ , ‘मे और मेरी तन्हाई’, ‘जगजीत प्रेसेंटस तलत अजीज’, या अल्बमसचा समावेश होता.

गझल संगीत प्रकाराला लोकप्रियता देण्यात जगजीत यांचा मोठा वाटा नेहेमीच राहिला आहे. ते कसे.. हे जाणून घेणे खूपच रोचक आहे. जगजीत यांनी आपल्या गझल संगीतात अनेक प्रयोग केले. त्यांनी गझल संगीतात प्रमाण न मानलीं गेलेली वाद्य जसे व्हायोलिन, सॅक्सोफोन, गिटार इ आधुनिक वाद्यांना गझल संगीतात खूपच मेळ घेणारे स्थान दिले. त्यामुळे नवीन पिढी गझल संगीताकडे आकर्षित झाली. याशिवाय जगजीत यांनी आपल्या अल्बमसच्या कॅसेट कव्हरच्या बाबतीतही अनेक प्रयोग केले. त्यांच्या अल्बमसचे कॅसेट कव्हर अनेक पानी असायचे. ज्यावर पूर्ण गझलचे शब्द, रचनाकार यांची यादी असायची. यामुळे तरुणाईला गझल रचनेच्या पद्धतीची जाण व्हायला लागली आणि गझल घराघरात पोहोचली. बरे जगजीत यांच्या कित्येक गझल अल्बम ची नावेही नवीन पिढीला जवळची वाटणारी असायची. उदाहरणार्थ : The unforgettables, Face To Face, Someone Somewhere, Mirage, Hope, Ecstasies, A Milestone इ. अशा रितीने गझल संगीत प्रकाराला लोकप्रियता देण्यात जगजीत यांचा मोठा वाटा नेहेमीच राहिला आहे !

केवळ गझल रचनांना संगीत देणाऱ्या आणि गाणाऱ्या जगजीत यांची दखल बॉलीवूड इंडस्ट्री ने घेतली ती १९८० साली. सर्वप्रथम ‘साथ साथ’ या चित्रपटासाठी त्यांना गायक म्हणून विचारणा झाली. तेव्हा आर्थिक मिळकतीची तमा न बाळगता जगजीत सिंग यांनी या कमी बजेटच्या चित्रपटासाठी, सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर लिखित गीते गाण्यास तयारी दाखविली. या चित्रपटातील गाणी अतिशय हिट ठरली. चित्रपटातील “तुम को देखा तो ये ख्याल आया ” , “प्यार मुझ से जो किया तूमने तो क्या पायोगी” , “ये तेरा घर ये मेरा घर” अशी एकापेक्षा एक सरस गीते जगजीत यांनी गायली. त्याच वर्षी आलेल्या ‘अर्थ’ या अशाच चित्रपटाने जगजीत आणि चित्रा सिंग यांची लोकप्रियता दिवसेंदिवस उंचावत नेली. “झुकी झुकी सी नजर बेकरार हे के नही “, “तुम इतना जो मुस्कुरा रही हो, क्या गम हे जिसके छुपा रही हो”, ही ‘अर्थ’ या चित्रपटातील काही लोकप्रिय झालेली गीते! आजही, ‘अर्थ’ आणि ‘साथ साथ’  या HMV च्या आतापर्यंतच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कॉम्बिनेशन कॅसेटपैकी एक आहेत.

जीवनात सर्व काही सुरळीत चालू असताना १९९० मध्ये एका रोड एक्सीडेंट मध्ये जगजीत आणि चित्रा यांचा सुपुत्र विवेक याचा अपघाती मृत्यू झाला. दोघांवरही काळाचा हा खूप मोठा आघात होता.  चित्रा यांना त्यानंतर कोणीही गातांना ऐकलेले नाही. त्यांचे गाणेच सुटले. आठ नऊ महिन्यांच्या अंतरानंतर जगजीत स्वतःला सावरू शकले. त्यानंतर त्यांच्या गायनामध्ये जी वेदना उतरली ती आपण अनेक गीतांमध्ये अनुभवली  आहे. कधी कधी लाईव कार्यक्रमांमध्ये स्टेजवर गात असताना देखील जगजीत, विवेकच्या आठवण येऊन कोलमडून पडायचे! मग समोर यायचे, त्यांचे एक वेगळेच रूप. लाइव कॉन्सर्टमध्ये त्यांच्या गीतावरती ठेका धरून नाचणाऱ्या तरुणाईमध्ये जगजीत यांना विवेकचा चेहरा दिसायचा आणि तेही जल्लोष करणाऱ्या रसिकांमध्ये सामील व्हायचे! परंतु कार्यक्रम संपल्यानंतर ग्रीन रूम मध्ये स्वतःला बंद करून घेणारे जगजीत, विवेकच्या आठवणी काढून अगदी हमसाहमसी रडायचे. विवेकच्या जाण्यानंतर जगजीत अध्यात्मिक मार्गाकडेही वळले त्यांच्या भजन अल्बमची संख्या ही वाढलेली दिसते. आपणास माहिती असलेल्या पैकी “कृष्ण भजन” किंवा “हे राम” हे त्यांचे काही प्रसिद्ध भजन अल्बम्स !

१९८०-९० च्या दशकात मनोरंजनाचे एकमेव माध्यम असलेल्या दूरदर्शन या माध्यमावरही जगजीत यांनी आपली अनोखी छाप सोडली होती. जुन्या जाणकार लोकांना दूरदर्शनवरील ‘केहकशा’ आणि ‘मिर्झा गालिब’ या मालिका आजही आठवत असतील. केहकशा एक लोकप्रिय मालिका. सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते फारुक शेख आणि अभिनेत्री दीप्ती नवल यांनी या मालिकेमध्ये अभिनय केलेला आहे. जगजीत सिंग यांनी यातील रचनांना संगीत दिले होते. यातील गीतांचा अल्बम म्हणजे जगजीत यांच्या जीवनातील उत्तम अल्बम्स पैकी एक मानला जातो. या मालिकेत दाखविला गेलेला भारतीय संगीतातील गझलनाम्याचा सफर, अली सरदार जाफरी यांच्या अभ्यासावर आधारित होता आणि प्रसिद्ध कलाकार जलाल आगा यांनी रसिकांसमोर मांडला होता. १९८८ मध्ये दूरदर्शन नॅशनलवर कवी गुलजार लिखित ‘मिर्झा गालिब’ ही ऐतिहासिक मालिका प्रसारित झाली. नसीरुद्दीन शाह यांनी मिर्झा गालिब, जे ब्रिटीश मुघल साम्राज्यातील प्रसिद्ध उर्दू आणि पर्शियन कवी होते, त्यांची भूमिका साकारली होती. या मालिकेत जगजीत आणि चित्रा यांनी गायलेल्या आणि संगीत दिलेल्या गझल होत्या. सुप्रसिद्ध, ज्येष्ठ श्रेष्ठ रचनाकार गुलजार आणि जगजीत यांची गहिरी दोस्ती होती ! दोघांच्याही प्रतिभेचा एकमेकांवर पगडा होता ज्यामुळे संगीत रसिकांना पुढे अमाप आनंद मिळाला !

जनसामान्यांमध्ये गझल संगीत लोकप्रिय करणाऱ्या जगजीत यांच्या आवाजाची मोहिनी अनेक दिग्गजांवरही पडली. त्यातील एक नाव आहे माजी पंतप्रधान मा. अटल बिहारी वाजपेयी ! मा. वाजपेयीजी हे उत्कृष्ट कवीही होते आणि जगजीत यांचे मोठे चाहतेही होते ! ‘राजकारणाच्या धकाधकीच्या प्रवासात, जगजीत यांचा आवाज मला शांतता, सुकून देतो’, असे ते म्हणत असत ! वाजपेयीजींच्या भावनात्मक, आशयघन कवितांना चाल लावण्याचे कार्य जगजीत यांनी केले ! ‘संवेदना’ हा तो अल्बम २००२ मध्ये आला ! “माझ्या भावनांना जगजीत यांनी आवाज देऊन, अधिक लोकांपर्यत नेवून पोहचवले”, असे मत वाजपेयीजींनी नंतर व्यक्त केले! पुढे २००३ मध्ये, जगजीत यांना भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी गुगलने ८ फेब्रुवारी २०१३ रोजी जगजित सिंग यांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त आपल्या होमपेज वरील विशेष डूडलद्वारे जगजीत यांचा गौरव केला होता. खूप कमी जणांना ज्ञात असेल की या महान कलाकाराच्या समरणार्थ, २०१४ मध्ये, भारत सरकारने माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या हस्ते  एकाच वेळी दोन  भिन्न पोस्टल तिकीट जारी केले होते !

१९९८ मध्ये लुधियाना मध्ये आपल्या परममित्राच्या पारिवारिक सोहळ्यात सामील झालेले असताना, जगजीत याना, पहिल्यांदा हृदयविकाराचा त्रास झाला! ही बातमी जेव्हा बाहेर पडली तेव्हा सर्व देशवासीयांना धक्का पोहोचला. यावेळी जीवनाला धोका कमी होता पण नियतीने जगजीत याना इशारा मात्र दिला. या आजारातून ते उठले. मात्र पारिवारिक दुःख त्यांना पदरी आले. स्वतःच्या मुलाचा, विवेकचा तो १८ वर्षांचा असताना पाहिलेला अपघाती मृत्यू कमी होता की काय म्हणून नियतीने २००९ साली कन्या मोनिकालाही, जगजीत आणि चित्रा यांच्या पासून हिरावून नेले! आयुष्याच्या परीक्षांना ते सामोरे जात राहिले. पुढे २०१० साली जेव्हा त्यांचा ७० वा वाढदिवस आला तेव्हा त्यांनी वर्षभरात, देशात ७० ठिकाणी लाईव्ह कॉन्सर्ट करण्याचे ठरविले. परंतु त्यांना तब्येत साथ देत नव्हती. हृदयविकार बळावला होताच. २०११ साली त्यांना ब्रेन हॅमरेजचा सामना करावा लागला. तब्ब्ल १८ दिवस ते कोमात होते! देशवासीय त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत राहिले. परंतु विधात्याने तो मखमली आवाज जणू त्याच्याजवळच नेण्याचे ठरविले होते. अखेरीस १० ऑक्टोबर २०११ रोजी आपल्या आवाजाने शब्दशः जग जिंकणाऱ्या जगजीत यांना काळाने हरविले, त्यांना हिरावून नेले. ‘चिट्ठी न कोई संदेस’ देताना जगजीत काळाच्या पडद्याआड गेले.

असा हा  जगजीत सिंग यांचा  सुरमयी प्रवास! या कलाकाराने आमच्या पिढीला आपल्या संगीताने, आवाजाने  भरपूर आनंद तर दिलाच पण येणाऱ्या अनेक पिढ्यांवरही जगजीत यांच्या आवाजाची जादू कायम राहील ही खात्री त्यांच्या सर्व चाहत्यांना आहे ! आजच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन !

माहिती संकलन आणि शब्दांकन
डॉ. रुपाली कुलकर्णी,
Head: IT & Content,
SWS Financial Solutions Pvt. Ltd.


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



3 responses to “कहा तुम चले गये..”

  1. खुप छान व माहितीपूर्ण लेखन आहे..माझा आवडता गजलगायक…
    .👍🙏🏻🙏🏻

    • सुनील बोकील, लातुर

    Like

  2. सुरेख

    Like

  3. खूप छान लिहिले आहे, जगजीत सिंग यांची लाईव्ह मैफल मी जवळून अनुभवली आहे.
    कहा तुम चले गये
    ही ओळ जगजीत सिंग यांच्यासाठी चपखलपणे लागू होते. 🙏

    Like

Leave a reply to gholapsat Cancel reply

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१