।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


प्रवास – आत्मभानापासून ते आत्ममग्नेतेपर्यंतचा

विज्ञान, मानसशास्त्र, व समाजशास्त्र क्षेत्रात आत्मभान असणे हे चांगले लक्षण मानले आहे.. कारण आत्मभानाची व्याप्ती व्यक्ती पुरती सिमीत न राहाता ती कुटुंब, समाज आणि देशावर प्रभाव टाकते. आत्मभान, माणसाला एक डोळस आणि सकारात्मक दृष्टीकोन देतो. त्यात बेरजेचे किंबहुना गुणाकाराचे सामर्थ्य असते. त्यात जबाबदारीही असते. हे बाळकडू जर लहानपणापासून कुटुंबात आणि शाळेत मिळत गेले तर एक सशक्त समाज घडतो. फार नाही पण साधारण ३०-४० वर्षापूर्वी आत्मभान जगण्याचा पाया होता. आदर्शवाद, सेवा, सहकार्य,संस्कार हे जगण्याचे मुल्य होते. समाज शांत व एकसंघ होता. कुटुंब एकत्रीत होते. भोगवादाकडे मनुष्याचा कल नव्हता. राजकारण, समाजकारणाला एक दर्जा होता. नविन पिढ्या मनाने सशक्त आणि शरीराने बलदंड उपजत होत्या. एक सुरक्षित समाज आपल्या पिढीने बघितला होता.

कालांतराने शिक्षणाचे दरवाजे मोकळे झाले. देशात यांत्रिकीकरण आले. अर्थकारणाला गती मिळाली. लोकांचे जीवन जगण्याची पद्धत बदलली आणि ह्यात सगळ्यात हळूहळू एक स्पर्धा तयार झाली. स्पर्धा ही काही अंशी चांगलीच असते. पण ज्यावेळी तिचे रूपांतर जीवघेण्या स्पर्धेत होते,तेंव्हा माणूस आत्मकेंद्री बनतो. तो फक्त स्वतः पुरता विचार करू लागतो. ह्यात माझे हित कशात आहे, मी कोणाला मदत केली तर मला काय मिळणार ? असला स्वार्थ असतो.

देशात जगतीकीकरणाचे वारे वाहू लागले. नविन उद्योग, जागतिक कर्जाची उपलब्धता, भांडवलशाहीला पुष्टी, ह्या सकारात्मक घटना घडत गेल्या आणि माणसाच्या हातात पैसा खेळू लागला. २०१०-२०१५ पर्यंत समाजाची पोत चांगली होती. समाजात माणुसकी होती. भारतासारख्या देशातील मोठी बाजारपेठ, युवापिढीचे स्वप्न जेंव्हा विकसित देशाने बघितली, त्यावेळी भोगवादाची पिल्ले विकसित देशातून विकसनशील देशात सोली गेली आणि समाजाचा समतोल बिघडायला सुरवात झाली. पैसा जेंव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त मिळायला लागतो, त्यावेळी माणसाची वृत्ती भोगवादी बनते. अश्या बिघडलेल्या समाजात मग इर्शा, चढाओढ आणि त्याचे रूपांतर मग माणसा माणसाच्या द्वेषात होते. हेच घडले आणि माणूस स्वतःपुरता बघायला लागला आणि तो आत्मकेंद्रित झाला.

ह्याला आणखी एक कारण म्हणजे, जेंव्हा मागणी आणि पुरवठा ह्याचा असमतोल समाजात बोकाळतो, त्यावेळी माणूस साशंक होतो. थोड्यावेळात जास्त पैसा मिळविणे हे त्याचे ध्येय बनते. अशावेळी माणूस आपले आणि समाजाचे आत्मभान गमावतो आणि स्वतःपुरता जगू लागतो. मग तो कुटुंबात राहून, कुटुंबात नसल्यासारखा असतो. समाजात राहून, समाजात नसल्यासारखा असतो. आज समाजाची स्थिती अशीच झाली आहे. देशाची प्रगती जरी होत असली तरी प्रचंड लोकसंख्या, नोकरीत नसलेले स्थैर्य, वाढत्या गरजा, विखुरलेले कुटुंब आणि त्यात भर म्हणजे देशातील राजकीय परिस्थिती. देशात तंत्रज्ञान विकसित झाले आहे. डिजीटलायझेशनने देशाच्या सीमा आणि जागेच्या मर्यादा केंव्हाच पार केल्या आहेत. ह्यात भर म्हणजे जागतिक स्थिती अत्यंत नाजूक आणि दोलायमान झाली आहे. ह्या स्थितीत आज तरूण वर्ग कात्रीत सापडला आहे. शिक्षण असून बेरोजगारी, शिक्षण नसल्याने दिशाहीनता, बेभरवशाची शेती, सरकारचे सगळीकडे ठिगळं लावण्याची आगतिकता, हतबल समाज ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर, प्रत्येक युवकाने आज intelligent gadget (मोबाईल आदि ), मद्य, अमली पदार्थ जवळ केले आहे. १३ वर्षाची लहान लहान मुले अमली पदार्थांच्या कचाट्यात सापडली आहेत. युवा वर्ग स्वतःला ह्यात बुडवू पहात आहे कारण सगळीकडे आग लागली आहे.

सोशल मिडीयावर मग्न रहाणे हीच जगण्याची रित बनली आहे. कुटुंबात भावनेचा निचरा करायला कोणी जवळ नाही, समाजात पसरलेली हिंसा-द्वेष, गलिच्छ आणि हीन राजकारण, सोशल मीडियाचा अतिशयोक्ती वापर ह्यामुळे युवापिढी आत्ममग्न होत चाललेली आहे. आपल्या भवताली असलेले त्यांचे सामाजिक भान सुटत चाललेले आहे. आत्मभान, आत्मकेंद्रीतपणा आणि आत्ममग्नता हा त्रिकोण आज उलटा भासतो आहे. कोणे एकेकाळी समाजाचा, आत्मभान हा भक्कम पाया होता. त्यावरती थोडे प्रमाणात आत्मकेंद्री लोक होते आणि सगळ्यात वर अगदी शुल्लक प्रमाणात आत्ममग्न लोक होते. त्याच्या उलट आज समाजात भरभरून आत्ममग्न लोक जास्त प्रमाणात पायथ्याशी आहेत, त्यावर आत्मकेंद्री लोकांचा थर आहे आणि सगळ्यात वर अगदी मोजक्या प्रमाणात आत्मभान असलेले लोक आहेत.

समाजाची मूल्य बदलली आहेत. ज्यावेळी रेज बेट – Rage Bait (anger-provoking / उत्तेजक/चिथावणी देणारे ) हा शब्द डिजिटल युगात प्रचलित होतो, त्यावेळी फेक नरेटिव्ह सेट करणे, फेक advertisement करणे, negative publicity करणे, उत्तेजित वक्तव्य देणे , extreme opinion देणे, हिणकस राजकारण करणे, महिलांच्या बाबतीत खालच्या दर्जाचे मतप्रदर्शन करणे असे सोशल मीडियावर चित्र दिसते आहे. हेच कारण आहे आत्ममग्नतेचे. २०२५ मधे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने ‘रेज बेट’ हा सगळ्यात जास्त वापरलेला शब्द म्हणून घोषणा केली. ही मोठी शोकांतिका आहे.

एक देश, एक समाज, एक कुटुंब आणि एक व्यक्ती म्हणून आपल्याला आत्मभान असायलाच हवे. अन्यथा कृत्रिम प्रज्ञा माणसाला जीव असलेले पण मृत शिरीर बनवेल. ह्या वर्षाच्या सुरवातीला हेच एक मागणे आहे की नवीन वर्षात लोकांना आत्मभान येवो आणि नवीन आशा, आकांक्षा ह्याने समाज चारित्र्य संपन्न बनो.


डाॅ.सौ. मृणालिनी दोडके


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



One response to “प्रवास – आत्मभानापासून ते आत्ममग्नेतेपर्यंतचा”

  1. DNYANDEV GAWADE Avatar
    DNYANDEV GAWADE

    Very Very Good Article.

    Thanking You,

    CA Dnyandev S. Gawade Contact : +91 90 2873 4691 +91 70 2808 6121

    Like

Leave a reply to DNYANDEV GAWADE Cancel reply

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१