–
‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील २५ गोष्टी बाजूला काढल्या गेल्या. पुढील परीक्षणाचे काम राजीव तांबे आणि शुभदा चौकर यांनी केले. त्यातील विजेत्या / उल्लेखनीय कथा , तुमच्यासाठी !!

दाते गुरुजी आज खूपच कामात होते. मुलांना खेळायला मैदानावर सोडून, काही शासकीय माहिती भरण्याचे काम सुरू होते. बरीच माहिती ऑनलाइन भरावी लागत होती. लिहीत असताना पेनाची शाई संपली. शाळेसमोरच एक छोटे टपरीवजा दुकान होते. शकूमावशी नावाची एक वृद्ध महिला ती टपरी चालवत होती. मुलांचा खाऊ, शालोपयोगी वस्तू अशा किरकोळ विक्रीतून तिचा उदरनिर्वाह कसाबसा चालू होता. तिचा मुलगा रोजगाराच्या कामाला जात होता. शकूमावशीची नजर आताशा कमी झाली होती. मोतीबिंदू वाढला होता. तरी मुलाला थोडासा हातभार लावण्यासाठी या वयातही तिची धडपड सुरू होती.
दाते गुरुजींनी चौथीच्या आर्यनला हाक मारली, तसं खेळणं सोडून तो धावतच आला. त्याच्याबरोबर अजून दोघं-तिघं धावत आले. गुरुजींचं काम करण्यास सर्वच उत्सुक असत. “आर्यन, हे २० रुपये घे आणि छानसं पेन आण बघू मावशीच्या दुकानातून.” गुरुजी म्हणाले. ‘‘गुरुजी, आम्हीपण जातो दुकानात”, असं म्हणून मुलांचं पथक धापा टाकत पेन घेऊन आले.
गुरुजींकडे पेन आणि वीस रुपयांची नोट देत आर्यन हसत म्हणाला, “गुरुजी पेन फुकटच मिळालं. मी १० रुपयाचं पेन घेतलं आणि २०ची नोट दिली, तर म्हातारीने मला पेन दिलं आणि परत २०ची नोट, दहाची समजून दिली. फसली म्हातारी.” सर्व मुलं हसू लागली.
दाते गुरुजींनी डोळ्यांवरचा चष्मा काढला. आर्यनकडे रोखून पाहात म्हणाले, “म्हणजे पेन फुकटच मिळालं तर…”
“हो गुरुजी.” मुलं पुन्हा खिदळली.
तसे गुरुजी म्हणाले, “मग हे तुम्ही जे केलं ते योग्य आहे, असं तुम्हांला वाटतं का?”
तशी मुलं कावरीबावरी झाली. आपली चूक झाली, हे त्यांच्या लक्षात येऊ लागलं. आर्यनची मान खाली गेली. गुरुजी म्हणाले, “अरे बाळांनो, ती आजी या वयात दिवसभर दुकनात बसून असते. त्या पत्र्याच्या टपरीत किती गरम होतं, किती उकाड्यात ती दिवसभर बसलेली असते. आणि असे काय ती कमावते दिवसभर? ती बिचारी गरीब आहे, पण स्वाभिमानाने जगण्याची तिची धडपड चालू आहे…” बोलता बोलता गुरुजींनी डोळ्याला रुमाल लावला. काही क्षणांपूर्वी खिदळणारी मुलं आता मात्र खाली माना घालून उभी होती.
अचानक आर्यन हमसून हमसून रडू लागला, ‘‘गुरुजी, माझं चुकलं, मी त्या आजीला फसवलं, मी वाईट आहे.’’
त्याच्या गालवरून ओघळणारे अश्रू पुसत गुरुजी म्हणाले, “चूक समजली ना? मग हे पैसे परत आजीला नेऊन दे आणि सांग की चुकून तुम्ही परत २० रुपयेच दिलेत, हे तुमचे दहा रुपये घ्या.”
शर्टच्या बाहीने नाकडोळे पुसत आर्यन एकटाच आजीच्या दुकानात गेला. प्रामाणिकपणे पैसे परत दिले, म्हणून आजीने त्याच्या गालावरून मायेने हात फिरवला. त्याला एक चॉकलेट दिले.
दोन-तीन दिवसांनंतर दुपारच्या खेळाच्या सुट्टीत आर्यन आणि कंपनी धावतच गुरुजींकडे आली. गुरुजी काहीतरी लिहीत होते. पाच रुपयांचे नाणे गुरुजींच्या टेबलवर ठेवत आर्यन म्हणाला, “हे पैसे खेळताना सापडले आहेत. कोणाचे असतील त्याला देऊन टाका.” असे म्हणून पुन्हा ती टोळी मैदानावर पळाली.
टेबलवर पडलेल्या त्या पाच रुपयांच्या नाण्याला अंकुर फुटून त्याचा वेल वाढत आहे आणि सारी शाळा त्या वेलीच्या सावलीत मनसोक्त खेळत आहे, असे दृश्य क्षणभर गुरुजींच्या डोळ्यांसमोरून चमकून गेले. गुरुजींनी पेरलेल्या संस्कारांच्या बियांना आता अंकुर फुटत होते.
– संजय सागडे
(शिक्षक- श्रीवाघेश्वरी विद्यालय, निरावागज, ता. बारामती, जि. पुणे)

Leave a comment