।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


जीव झाडाले टांगला

‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील २५ गोष्टी बाजूला काढल्या गेल्या. पुढील परीक्षणाचे काम राजीव तांबे आणि शुभदा चौकर यांनी केले. त्यातील विजेत्या / उल्लेखनीय कथा , तुमच्यासाठी !!

आज कृष्णा खूप खूश होता. आज शाळेत शिक्षक-पालकसभा होती. आज आई त्याच्यासोबत शाळेत येणार होती. शाळेतून बाहेर पडल्यावर आईला तो एक गम्माडीगंमत दाखवणार होता.

दोघेही आईच्या गाडीवर बसून शाळेकडे निघाले. शाळेच्या परिसरात वेगवेगळी झाडं होती. कधी एकदा पालकसभा संपतेय आणि आपली गंमत आईला दाखवतोय असं कृष्णाला झालं होतं. पालकसभा संपल्यावर दोघे शाळेबाहेर पडले. शाळेसमोरच चिंचेचं झाड होतं. त्या झाडाखाली त्याने गाडी थांबवायला सांगितलं. आईला कृष्णाने तर्जनीने झाडाच्या फांदीवर असलेली त्यांची गम्माडीजंमत दाखवली. ते होतं एका पक्ष्यानं विणलेलं सुबक घरटं.

आईलाही ते घरटं आवडलं. तो म्हणाला, “आई, या घरट्यात ना छोटी छोटी पिल्लं आहेत ती खूप चिवचिवाट करतात. आम्ही रोज बघतो. सर म्हणतात, दंगा करू नका. नाहीतर ती पिल्लं घाबरतील. म्हणून आम्ही लांबूनच त्यांना बघतो.”

कृष्णाला किती अन् काय बोलू असं झालेलं. त्याच्या डोळ्यांतली चमक, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आईला खूप आनंद झाला. तिने मनातल्या मनात प्रार्थना केली की, देवा, माझ्या बाळाची निरागसता अशीच टिकून राहो!

तेवढ्यात कृष्णा म्हणाला, “पिल्लं आता घरट्यात नाहीयेत. आईबाबा त्यांच्यासाठी खाऊ घेऊन येतात आणि त्यांच्या चोचीत भरवतात. इतकी छोटी पिल्लं कुठं गं गेली असतील?”

आई म्हणाली, ‘‘इथंच कुठंतरी जवळपास असतील.”

कृष्णा म्हणाला, “आई, आपल्या घराच्या आवारात मला हे घरटं लावायचंय. कित्ती गोड दिसेल ना?”

आई म्हणाली, ”अरे बाळा, पण ते त्या पिल्लांचं घर आहे ना. मग ते आपण कसं घ्यायचं?”

“आई, तू मोठ्ठी आहेस. तुझा हात पोचेल की. नुसता हात वर कर आणि न मोडता काढ घरटं.” कृष्णा जरा जोरातच बोलला.

आईने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णा अडून बसला. “मला हवं म्हणजे हवंच घरटं.”

आईने विचारले, “मग नवीन घर बांधून होईपर्यंत ती पिल्लं कुठं राहतील बरं?”

“त्यांचं ते बघून घेतील ना गं आई, तू आत्ता मला घरटं काढून दे म्हणजे देच.” तो ठाम.

शेवटी नाईलाजाने आई तयार झाली. तिने हलकेच ते घरटे काढले आणि त्याच्या हातात दिले. आनंदाच्या भरात तो उड्या मारू लागला.

दोघे निघाले. आई गप्प होती, पण तो सतत बडबडत होता. “बाबा आले की मी स्वतःच शिडीवर चढून ते घरटं हुकाला अडकवणार. मग चिनूला बोलावून आणणार. तिला माझं घरटं दाखवणार.”

आई काहीतरी विचार करत होती. तेवढ्यात कृष्णाला सायकलवर फिरणारी काही मुलं दिसली. त्याचा मूड बदलला. तो म्हणाला, “आई, ती बघ मुलं रस्त्यावर सायकल चालवतायत. तू मात्र मला कधीच सोडत नाहीस असं.”

आई म्हणाली, “अरे, ती मुलं तुझ्यापेक्षा मोठी आहेत. एकटी घरी येऊ शकतात. तू रस्ता चुकलास तर रडत बसशील. तू जर कुठं हरवलास तर मी काय करायचं? मला खूप रडू येईल, बाबासुद्धा घाबरून जातील. आजी तर जेवणारही नाही आणि औषधही खायची नाही बघ तू हरवलास तर. आणि आजोबा तर आजारीच पडतील.”

कृष्णा विचारात पडला. “आई, आजीआजोबा गावी गेल्यावर मला करमत नाही, मी घरात नसलो की तुम्ही माझी वाट बघता.” ओठांचा चंबू करून कृष्णा म्हणाला.

“यालाच तर प्रेम म्हणतात. आपल्या कुटुंबात सगळेच एकमेकांवर प्रेम करतात,” आई म्हणाली.

“चिनूच्या घरात पण?” उत्सुकतेने त्याने विचारले.

“हो रे, सगळ्या घरांमध्ये असंच असतं.”

थोडावेळ तो काहीच बोलला नाही. थोडा वेळाने कृष्णा म्हणाला, “आई गाडी मागे वळव प्लीज.”

त्याच्या मनात काय चाललेय, हे आईने लगेचच ओळखलं. तिने फार काही न बोलता गाडी पुन्हा शाळेकडे वळवली आणि चिंचेच्या झाडाखाली थांबवली. तो म्हणाला, “आई आपल्याला नको हे घरटं. तू होतं तिथं अडकव ना!”

आई म्हणाली, “का रे, काय झालं?”

तो डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, “मी बाहेर पडलो की तुम्हांला माझी काळजी वाटते, आजीआजोबांना करमत नाही. आपण हे घरटं काढून घेतलं तेव्हा पिल्लं, त्यांचे आईबाबा कुणीच नव्हते इथं. आईबाबा घरी यायच्याआधी पिल्लं घरी आली आणि त्यांना त्यांचं घर दिसलंच नाही तर?” त्याने रडकुंडीला येत विचारलं.

आई म्हणाली, “बघतील की त्यांचं ते. आपण कशाला विचार करायचा?”

“नको आई, त्यांना घर सापडलं नाही तर ते आणखी लांब कुठंतरी जातील. मग त्यांची आणि त्यांच्या घरच्यांची चुकामूक होईल. त्यापेक्षा आपण नको नेऊया घरटं. होतं तिथं ठेवू.”

आईनं मनोमन हात जोडले. “देवा, माझ्या कृष्णाचं मन असंच संवेदनशील राहू दे.” झाडावर होतं तसं घरटं लटकवून ते दोघे घरी परतले. आजी वाट बघतच होती कृष्णाची. तिने त्याच्या आवडीची गरमागरम मुगाची खिचडी करून ठेवली होती आणि आजोबांनी त्याच्या आवडीची द्राक्षं धुऊन ठेवली होती.

आज एका उबदार घरट्याने एक उबदार घरटं उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं होतं.

– सविता सुनील कारंजकर (सातारा आकाशवाणी उद्घोषक, व्यावसायिक सूत्रसंचालक)


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment