।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


एका दगडात दोन पक्षी!

‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील २५ गोष्टी बाजूला काढल्या गेल्या. पुढील परीक्षणाचे काम राजीव तांबे आणि शुभदा चौकर यांनी केले. त्यातील विजेत्या / उल्लेखनीय कथा , तुमच्यासाठी !!

प्राजक्ता बागकाम करण्यात गढून गेली होती. तिची आई तिला बघण्यात दंग होती. तिचं मन प्राजक्ताच्या कौतुकाने भरून आलं होतं. ‘एवढीशी धिटुकली! किती टापटिपीने काम करते. कुंडीसुद्धा छान  भरायला शिकली आहे. बागकाम झालं की,  हाताबरोबर साफसफाईही करते. सांगावं लागत नाही.’ ती या विचारात इतकी तल्लीन झाली होती की प्राजक्ता तिला हाका मारत होती, तरी तिला कळलं नाही.

शेवटी प्राजक्ताने आईला हलवलं आणि म्हणाली, ‘‘आई, कुठे लक्ष आहे तुझं? कित्ती हाका  मारल्या तुला…’’

आई म्हणाली, ‘‘तुझ्या… नव्हे तुझ्या बागकामाच्या विचारात गुंतले होते. सोनू… मला सांग, तुझ्या बागकामाला सुरुवात होऊन एक वर्ष झालं ना?’’

‘‘हो, आई. पहिलं रोप मी सदाफुलीचं लावलं. तू म्हणाल्याचं चांगलं आठवतंय, की त्या झाडाची फार काळजी घ्यावी लागत नाही आणि नावाप्रमाणेच सदा फुलं येतात.’’

‘‘हो ग माझी राणी! मामाची बाग बघून किती हरखून गेली होतीस! वर्षभरात किती ग रोपं लावलीस तू?’’

‘‘आई, १५… सगळी फुलझाडं!’’

‘‘व्वा! गुणाची माझी पोर…’’

‘‘आई, आज बाप्पा खूश होईल बघ… कित्ती फुलं आली आहेत आज! गोकर्ण, जास्वंद, सदाफुली… मोगऱ्याला कळ्या यायला लागल्यात.’’

‘‘खरंच की प्राजू!’’

आई पुढे म्हणाली, ‘‘एका आठवड्यात आपण तुझ्या मामाकडे कोकणात जाणार आहोत, ८-१० दिवसांकरिता. आपण नसताना बागेची देखभाल कोण करणार? मोठ्ठा प्रश्न आहे.’’

‘‘का… आपल्या मावशी नाही घालणार पाणी?’’

‘‘अगं, त्याही गावाला चालल्या आहेत. बदलीच्या बाईला कशी द्यायची घराची चावी?,’’ आई काळजीने म्हणाली. 

प्राजक्ताचा चिंतायुक्त चेहरा बघून आई म्हणाली, ‘‘अगं, अशी निराश का होत्येस? ८-१० दिवस आहेत आपल्या हातात. शोधून काढ एखादा उपाय… नक्की सापडेल तुला.’’

झालं… दिवस-रात्र प्राजक्ताचं डोकं या विचाराने शिणून गेलं. २-३ दिवस असेच गेले. ‘‘मला नाही यायचं गावाला…’’ एवढं म्हणण्यापर्यंत तिची मजल गेली. 

आईला तिचं झाडांवरचं प्रेम पाहून बरं वाटलं. पण तिने इतक्यात हार मानली, ते अजिबात आवडलं नाही. 

डोक्याला ताण  देता-देता प्राजक्ताला अचानक गेल्या वर्षी गावाला पाहिलेल्या रॉकेलच्या वातीची आठवण झाली. काम कसं चालतं, हे सारं तिने आजीला विचारलं होतं. आजीनेही कौतुकाने साऱ्या गोष्टी नीट समजावून सांगितल्या होत्या. त्यानंतर काही उदाहरणंही आजीने सांगितली होती. ते सारं अचानक तिला आठवलं. तिने प्रयोग करून बघायचं ठरवलं.  

घरातच तिला दोन लिटर पाण्याची बाटली सापडली. तिने कपाटातून नाडी शोधली. एका कुंडीजवळ छोटं स्टूल ओढून त्यावर पाणी भरलेली बाटली ठेवली. बाटलीमध्ये नाडीचं एक टोक बुडवलं, कुंडीतल्या मातीमध्ये दुसरं टोक खोचलं. प्राजक्ता तिथेच ठाण मांडून निरीक्षण करत बसली. थोड्या वेळाने बाटलीतील पाणी कमी झाल्याचं दिसलं. कुंडीत जिथे नाडी खोचली होती, तिथे माती ओली झाली होती. प्राजक्ता खूश झाली. कधी एकदा आई ऑफिसमधून घरी येते आणि तिला हे सारे दाखवते, असं तिला झालं.  

आई आल्याबरोबर तिने तो प्रयोग दाखवताच आई खूश झाली. तिला शाबासकी देताना म्हणाली, ‘‘हे सारं कशाने घडतं, माहीत आहे का? थांब, तुला थोडक्यात सांगते.  गुरुत्वाकर्षणाविरुद्ध  नाडीमध्ये केशिका क्रियेमुळे पाणी वर चढतं आणि नंतर खाली उतरतं.’’

‘‘आई, रॉकेलच्या दिव्याच्या वातीमध्ये हीच क्रिया होते ना?’’

‘‘अगदी बरोबर! आता मला  सांग, आपल्याकडे एकूण १५ कुंड्या आहेत. मग तू १५ बाटल्या वापरणार की दुसरा काही पर्याय? नवीन नाडी वापरायची की आणखी काही शक्य आहे?’’

प्राजक्ता म्हणाली, ‘‘विचार करून सांगते.’’

थोड्या वेळातच तिच्या लक्षात आलं की, नवीन नाडी वापरून पैसे कशाला फुकट घालवायचे? आईने लादी पुसण्याकरिता जुने फाटके परकर किंवा सुती साड्या बाजूला काढून ठेवल्या आहेत, त्या वापरता येतील. आणि एवढ्या १५ बाटल्या कुठून आणायच्या? त्यापेक्षा घरातल्या  बादल्या किंवा टब वापरता येईल.

प्राजक्ता म्हणाली, ‘‘आई, दोन्ही प्रश्नांची उत्तरं सापडली मला.’’

दुसऱ्या दिवशी आई ऑफिसमधून आली, तर काय…? प्राजक्ता तयार…!

तिने दोन बादल्या तसेच एक टब थोड्या उंचावर ठेवला होता. प्रत्येकातून  ५-६ पट्ट्या एकेक अशा कुंड्यांमध्ये सोडल्या होत्या. या पट्ट्या तिने जुन्या परकरापासून बनवल्या होत्या.  बादली आणि टबावर झाकण टाकले होते. 

आईने मुद्दाम विचारले, ‘‘बादली आणि टब झाकून का ठेवलेस?’’

‘‘म्हणजे पाणी उडून जाणार नाही ना…’’, मोठ्या उत्साहात प्राजक्ता म्हणाली. 

‘‘शाब्बास, प्राजक्ता! अवास्तव खर्च टाळून छान सोय केलीस झाडांच्या पाण्याची. फोटो काढून ठेव हं.’’

कोकणात सुट्टीची मज्जा अनुभवून जेव्हा प्राजक्ता घरी आली, तेव्हा कधी एकदा झाडं बघते, असं तिला झालं होतं. बाल्कनीचं दार उघडलं आणि प्राजक्ता खूश झाली.

‘‘आई, बघ… बाग किती बहरली आहे. सदाफुली आणि मोगऱ्याची फुलं जणू हसताहेत…’’

आई खुश झाली. म्हणाली, ‘‘फोटो काढ बरं. तुलना कर आणि सुट्टीतला हा प्रोजेक्ट लिहून काढ बरं…’’

‘‘हो, आई! नक्की. आमच्या मॅडमना आवडेल माझा प्रोजेक्ट…’’

-प्रा. डॉ. नंदा संतोष हरम


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment