।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अनुभव : बियास कुंड ट्रेक

मे २०२५ मध्ये आम्ही जवळपास ३५ जणांच्या मित्र मैत्रिणींच्या ग्रुपने, IBEX HIKES च्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांचा, मॉडरेट कॅटेगरीतला बियास कुंड ट्रेक केला. मनालीजवळील हिमाचल प्रदेशातील बियास कुंड सुमारे १२,२०० फूट उंचीवर वसलेलं आहे. हा ट्रेक करण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस चांगले. ट्रेक मार्गावरील हिरवीगार कुरणे, फुलांनी बहरलेली झुडुपे, हिमाच्छादित पर्वत शिखरे, सोबतीला खळाळत वाहणारी बियास नदी आणि क्षणोक्षणी बदलणारे हवामान संपूर्ण वेळ डोळ्यांची पारणे फेडणारे, बेहतरीन नजारे पेश करत रहातात.

फोटोग्राफी: श्री सचिन दीक्षित

१२ मे २०२५ ! या दिवशी बुद्ध पोंर्णिमा असतांना आम्ही बेस कॅम्प मधल्या पहिल्या पडावावर तंबू ठोकून होतो. सोसाट्याच्या शीतवाऱ्यांना झेलत असतांना मध्यरात्री बर्फाच्छादित शिखरांच्यावर संपूर्ण चंद्रबिंबाचे दर्शन झाले ! चंद्र चांदण्यांच्या दुधी प्रकाशात न्हाऊन निघालेली हिम शिखरे आणि परिसर यांचे दृश्य अफलातून होते. त्या दृष्याची जादू आयुष्यभर मनावर कोरलेली राहील यात शंका नाही. १३ मे रोजी सुंदर हवामानात समिटच्या दिशेने सुरु केलेली चढण आम्हा चाळीशी गाठलेल्यांसाठी जरी दमछाक करणारी ठरली तरिही ग्रुप मधील लहान मुले आणि तरुणांनी १२,००० फुटांची उंची गाठली. समिट अगदी जवळ दिसत असतांना झालेल्या खराब हवामानामुळे त्यांनाही परत फिरावे लागले.

पण एकंदरित शारिरीक आणि मानसिक कस पाहणारा हा ट्रेकचा अनुभव अत्यंत संस्मरणीय ठरला. ट्रेक नंतर आम्ही सिसू धबधबा, मॉनेस्ट्रीज, मनाली सिटी टूर हे सर्व अनुभवले. निसर्गाची सुंदर, तरल आणि उग्र रूपेही बघतली. लहान-मोठ्या मित्र मैत्रिणींच्या गप्पा, हास्यकल्लोळ आणि विविध खेळ यामुळेही ट्रेक मध्ये रंगत भरली गेली. IBEX HIKES तर्फे करण्यात आलेले सर्व आयोजन छान होते.

सर्व या ट्रेक मध्ये माझ्या बरोबर माझी कन्या राधाही होती. तिच्या आणि माझ्या मनात ट्रेक करतांना त्या प्रवासाविषयी / हिमालयाविषयी जे विचार उमटले ते पुढील शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

हिमालय से ..

अंजानेमे आ गये हम,
कुदरत के इस नजारे में,
नही जानते थे,क्या कर रहे थे
हम इन पहाडो मे..

ये हवायें ये नदियां,
थंडी झलक ले आ रहे थे,
चांद को सोते देख
हम सब जाग रहे थे..

इन हसीन नजारो को देख,
मन में था सुकून,
इन जागती सुबहोंको देख,
मन मे भर रहा था जुनून..

इन खाली रास्तोंके अंधेरेमे,
हम खुदको नजर आ रहे थे,
क्या कर रहे थे इस जगह में,
यह जान गये थे..

कु. राधा कुलकर्णी


हिमालय ..

भव्य -दिव्य, सुन्दर, दिमाखदार,
भरत भू चा, हा राखणदार,
करता गिरीभ्रमण, इथे सजग मने,
उमगती त्याची रूपे अनेक !

पायथ्याशी विशाल वृक्षांची शोभा,
नीलनभी शुभ्र शिखरांची आभा,
खोल दऱ्या आणि भयचकित कडे,
नितळ नीराची भुरळ पडे !

हिम वर्षावाचा सोहळा अप्रतिम,
शिखरांसमीप शांतता असीम,
जवळ जाता उग्र रूप सादर,
मनात वाढवी भययुक्त आदर !

क्षणात स्वर्ग आणि क्षणात भयप्रद,
निसर्ग बदले कूस अलगद,
जणू सांगतसे बदल हा अटळ,
असो सुख की दुःखाचा तो पळ !

त्या विराट विश्वात शुल्लक आपण,
मग कसली चिंता, कसले मी पण,
हृदयी जपावे हे सत्य आपण,
देई हिमालय ही जीवन-शिकवण !!

सौ. रुपाली कुलकर्णी


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



One response to “अनुभव : बियास कुंड ट्रेक”

  1. Vishram Kulkarni Avatar
    Vishram Kulkarni

    रूपालीताई…… खुपचं सुंदर आणि चपखल शब्दात हिमालयातील बियास कुंड क्षेत्रातील साहसी भटकंतीचे वर्णन केलेत. या व अशा प्रकारच्या निसर्ग भटकंतीमुळे राधाला निसर्गाची निरनिराळी रूपे नुसती पहायला मिळणार नाहीत तर ती अनुभवता येतील.

    तुंम्हा दोघींचा फोटो मस्तच आहे . राधा आता मोठी व सक्षम झाली. हा फोटो पहातांना मला आपण या सर्व लहान मुलांना पांडवलेणीला घेऊन गेलो होतो त्यावेळी काढलेले फोटो आठवले. मी त्यावेळी काढलेले काही फोटो तुंम्हाला पाठवेन ते राधाला नक्की दाखवा.

    मी २०२५ च्या शेवटी दिवाळीनंतर माझ्या व शुभांगीच्या आवडीच्या नाशिक येथे स्थायिक होणार आहे. पाथर्डी क्षेत्रात पांडवलेणीच्या पायथ्याशी (चक्क पोटातच म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण माझा फ्लॅट पाचव्या मजल्यावर आहे व दोन्ही बेडरूम्स् व किचन मधून पांडवलेणीचा डोंगर समोर दिसतो/अंगावर येतो इतका जवळ आहे) मी रॅडीसन ब्लू हाॅटेल समोरील “विठू-माऊली विश्व” अपार्टमेंट मध्ये दोन बेडरूमचा फ्लॅट घेतला आहे व दिवाळीत त्याचा ताबा मिळणार आहे.

    असो, नाशिकला आल्यावर बऱ्याच ॲक्टिव्हिटीच् करता येतील.

    पुनश्च अभिनंदन व शुभेच्छा.

    विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे.

    Like

Leave a reply to Vishram Kulkarni Cancel reply