।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन

कविता

मंजिरी विश्वनाथ भारती

कृष्ण असे माझा सखा

कृष्ण असे माझा सखा
देई मज नित्य साथ ।
धाव घेई सावरण्या
हरी माझा जगन्नाथ।

तारी मज राधावर
कृपा करी कृपाघन।
दावी दया अनाथासी‌
घेई मज स्वीकारून ।

आले आले चरणाशी
माथा पदी झुकवून ।
सुख वाटे माझ्या जीवा
गाता मुखी तुझे गुण ।

नको पसारा मजला
माया , बंधने , आसक्ती ।
मन विटले संसारा
हरी देई मज मुक्ती ।

अश्रू तत्व

अश्रुंच्या तत्वाचे। सांगा विश्लेषण।
वाहती नयन। का म्हणोनी ?

भावनेची सीमा । पार केल्यावरी।
बांधली पदरी । अश्रू-गंगा।।

सुख-दुःख सारे। मनाचेच खेळ ।
नयनाशी मेळ। काय त्याचा?

सुखानुभूतीची । कळे परिसीमा ।
कशाची न तमा । उरे – जीवा ॥

दुःखाचा काळोख| दाटता हृदयी।
नेत्रांची समई | तेल सांडे ||

मनाचे पटल । असे भावनिक।
चक्षु निवेदक। होई त्याचे ॥

नवरस, भाव। मनीषा, आकांक्षा।
कारण समीक्षा। आसवांसी ।

घ्यावे समजून। होऊनी सुजाण।
अश्रुंसी कारण। सुख दुःखे ॥

मंजिरी विश्वनाथ भारती

Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.

2 responses to “कविता”

  1. दुःखाचा काळोख| दाटता हृदयी।

    नेत्रांची समई | तेल सांडे ||”

    या प्रतिमेतील गूढता पुन्हा पुन्हा वाचून उलगडत गेली. ‘समई’ ही ‘नेत्र’ आहे, आणि ‘तेल’ म्हणजे चेतना, अनुभव आणि आंतरिक उष्णता.

    जेव्हा दुःख इतकं दाट होतं की अंतःकरण अंधारून जातं, तेव्हा नेत्र-समई प्रकाश देण्याऐवजी फक्त अश्रूंचं अंधुक तेज झळकवते. हे तेज अनुभूतीचं आहे – भावनेचं नाही.

    संत परंपरेत ‘काळोख’ हे अध्यात्मिक अनास्थेचे प्रतीक आहे आणि प्रकाश, समई, हे ‘ब्रह्मसाक्षात्काराचे’ रूप. पण इथे समई पेटत नाही – ती विझते. हे तात्त्विक खिन्नतेचे चित्रण आहे. ही समई अध्यात्माचा संधिप्रकाश नाही, ही निव्वळ भावनांची अंधारछाया आहे – जिथे अनुभव शब्दांना ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतो.

    अश्रू हे मनाच्या गाभ्याची साक्ष आहे. ते अनुभवतात, पण ते सांगतही असतात. अश्रूंमागे जे अदृश्य आहे, तेच खरे अनुभवाचे तत्त्व आहे. तो ना फक्त करुण रसाचा भाग आहे, ना तो केवळ वेदनेचा परिणाम. तो म्हणजे चित्ताचा निःशब्द अन्वय आहे– अनाहताच्या तालावर उमटलेला एक स्वर.

            या कवितेत  केवळ शब्दसौंदर्य नाही. ही कविता संवेदनेचा, संस्कृतीचा आणि अंतर्मनाचा संगम आहे. संतकवितेच्या आत्मीयतेने तिची प्रेरणा घडते आणि विवेकाच्या तात्त्विक अंगाने तिचं विश्लेषण विस्तारतं.

           ही कविता म्हणजे ‘अश्रू’ या संज्ञेचा संतत्व आणि समीक्षा यांच्या अंगाने घडणारा साक्षात्कार आहे. इथे भावना आणि विचार, भक्ती आणि विवेक, दुःख आणि सौंदर्य अश्रूच्या एकाच थेंबात मिसळतात.

    Like

  2. दुःखाचा काळोख| दाटता हृदयी।

Leave a reply to uday shukla Cancel reply