–मंजिरी विश्वनाथ भारती
कृष्ण असे माझा सखा

कृष्ण असे माझा सखा
देई मज नित्य साथ ।
धाव घेई सावरण्या
हरी माझा जगन्नाथ।
तारी मज राधावर
कृपा करी कृपाघन।
दावी दया अनाथासी
घेई मज स्वीकारून ।
आले आले चरणाशी
माथा पदी झुकवून ।
सुख वाटे माझ्या जीवा
गाता मुखी तुझे गुण ।
नको पसारा मजला
माया , बंधने , आसक्ती ।
मन विटले संसारा
हरी देई मज मुक्ती ।
अश्रू तत्व

अश्रुंच्या तत्वाचे। सांगा विश्लेषण।
वाहती नयन। का म्हणोनी ?
भावनेची सीमा । पार केल्यावरी।
बांधली पदरी । अश्रू-गंगा।।
सुख-दुःख सारे। मनाचेच खेळ ।
नयनाशी मेळ। काय त्याचा?
सुखानुभूतीची । कळे परिसीमा ।
कशाची न तमा । उरे – जीवा ॥
दुःखाचा काळोख| दाटता हृदयी।
नेत्रांची समई | तेल सांडे ||
मनाचे पटल । असे भावनिक।
चक्षु निवेदक। होई त्याचे ॥
नवरस, भाव। मनीषा, आकांक्षा।
कारण समीक्षा। आसवांसी ।
घ्यावे समजून। होऊनी सुजाण।
अश्रुंसी कारण। सुख दुःखे ॥
–मंजिरी विश्वनाथ भारती


Leave a comment