।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी असावीच

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार

आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेच्या (OECD) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम २०२२ च्या अहवालात असे आढळून आले की शाळेतील विद्यार्थ्यांजवळील स्मार्टफोन वर्गातील लक्ष विचलित करण्यात एक प्रभावी कारण आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो. मोबाईल फोनवर येणाऱ्या सूचना पण विद्यार्थांचे लक्ष विचलित करू शकतात. अजून एका अभ्यासात असे पण आढळून आले की शैक्षणिक नसलेल्या क्रियाकलापात, जसे स्मार्टफोनचा वापर,यात सहभागी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते जे शिकत होते त्यावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्यासाठी २० मिनिटे लागू शकतात.स्मार्टफोन वरून येणाऱ्या संदेशांचा आणि माहितीचा सतत प्रवाह मेंदूला व्यापून टाकू शकतो आणि काही मिनिटांपेक्षा जास्त काळ कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे अशक्य बनवू शकतो. वर्गात विद्यार्थांजवळील स्मार्टफोनची उपस्थिती कार्यशील स्मृती आणि समस्या सोडवण्याची कौशल्य पण कमी करू शकतात.लक्ष केंद्रित करण्याची आणि सखोल किंवा सर्जनशीलपणे विचार करण्याची क्षमता कमी करू शकतात. स्मार्टफोन तार्किक विचार आणि संज्ञानात्मक क्षमता कमी करू शकतात. एकंदरीत स्मार्टफोनमुळे शिकणे, तार्किक विचार करणे व समस्या सोडवणे यासारख्या महत्त्वाच्या मानसिक कौशल्यांमध्ये घट होऊ शकते.

स्मार्टफोनमध्ये असलेल्या कॅल्क्युलेटरमुळे विद्यार्थी बेरीज,वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ,ज्या अंकगणिताच्या मुलभूत क्रिया आहेत, त्या पण कॅल्क्युलेटर व्दारे करतील, त्यामुळे या‌ मुलभूत संकल्पना पण त्यांना कितपत समजतील याबाबत शंका निश्चितच निर्माण होते.पाढे (टेबल) पाठ करण्याची गरज पण विद्यार्थांना भासणार नाही, त्यामुळे सोप्या व तोंडी करू शकणाऱ्या अंक गणिताच्या मूलभूत क्रिया करण्यासाठी विद्यार्थ्यांना स्मार्टफोन मधील कॅल्क्युलेटरवर अवलंबून रहावे लागेल.

शाळांमध्ये स्मार्टफोनचा वापर विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून विचलित करणारा व शैक्षणिक दृष्ट्या हानिकारक असू शकतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर, मानसिक आरोग्यावर आणि शारीरिक हालचालींवर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थी परीक्षांमध्ये गैरप्रकार /फसवणूक करण्यासाठी स्मार्टफोनचा वापर करू शकतात.विद्यार्थाला सोशल मीडिया व व्हिडिओ गेम यात रुची निर्माण झाली किंवा त्याची लत लागली तर तो शैक्षणिक जबाबदाऱ्यांपासून दूर जाण्याची शक्यता बळकावते.दीर्घकाळ स्मार्टफोन वापरामुळे डोळ्यांवर ताण येणे आणि झोप न लागणे यासारख्या आरोग्यविषयक समस्या देखील उद्भवू शकतात.

विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणावरील परिणाम बद्दलच्या चिंतेमुळे वर्गखोल्या आणि शाळांमध्ये स्मार्टफोन वर बंदी घातली जावी असा विचार मोठ्या प्रमाणात सुरू झालाय. वर्ष २०२३ मध्ये युनेस्कोने जगभरातील शाळांना वर्गात स्मार्टफोन वापरावर बंदी घालण्याचे आवाहन केले.

फ्रान्समध्ये सन‌ २०१८ पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी आणली आहे. इटलीमध्ये प्री- स्कूल आणि माध्यमिक शाळेतील शैक्षणिक उद्देशासाठी देखील वर्गात स्मार्टफोन वापरण्याची बंदी आहे. हंगेरीत सप्टेंबर २०२४ पासून शाळांमध्ये फोनवर बंदी लागू केली आहे. ग्रीसमध्ये या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना शाळेत त्यांचे मोबाईल फोन बॅगमध्ये ठेवणे बंधनकारक केले आहे. डेन्मार्क, सायप्रस,बल्गेरिया आणि पोर्तुगाल सह अनेक युरोपियन देशांमधील शाळेंमध्ये स्मार्टफोनवर काही निर्बंध आणण्याचे ठरत आहे. अमेरिकेच्या काही राज्यांनी शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घातली आहे, आणखी अनेक राज्ये असे करण्याचा विचार करत आहे. चीनमधील पण मुलांना शाळेत फोन वापरण्यास बंदी घालण्यात येणार आहे असा निर्णय त्यांच्या शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे.

वर्ष २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या जागतिक शिक्षणावरील युनेस्कोच्या अहवालात फक्त शिक्षणाला उपयुक्त कामासाठी वर्गात स्मार्टफोन वापरण्याचे आव्हान करण्यात आले होते. याचे मुख्य कारण विद्यार्थी शिकत असताना स्मार्टफोनमुळे अभ्यासातून त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते असे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. स्मार्टफोनमुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग होते व त्यांची शैक्षणिक कामगिरी खराब होऊ शकते.

तसे बघितले तर स्मार्टफोनवर निर्बंध लावणे किंवा त्याबद्दल नियमावली बनवून ती अंमलात आणणे नक्कीच कठीण आहे. बहुतेक किशोरवयीन विद्यार्थांना वाटते की त्यांचे स्मार्टफोन त्यांना शाळेत चांगली कामगिरी करण्यात मदत करतात. त्यांना असेच वाटते की माहिती मिळवणे आणि संपर्कात राहण्यासाठी स्मार्टफोन अत्यावश्यक आहे.त्यांच्या वयात त्यांना यामधील धोके कळत नाही, हे पण तेवढेच खरे आहे.

त्यामुळे शासनाने एकतर युनेस्कोने शाळेत स्मार्टफोनची बंदी घालण्याच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठी वैयक्तिकृत शिक्षण, स्वयंचलित ग्रेडिंग, परस्परसंवादी अनुभव आणि डेटा-चालित अंतर्दृष्टी प्रदान करून, अध्यापनाचा दर्जा वाढविण्यासाठी,शाळांमधील वर्गात शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित शैक्षणिक साधने वापरण्याची मुभा द्यावी, त्याचबरोबर शाळेमधील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पण स्मार्टफोन वापरण्याची बंदी करावी, जेणेकरून शिक्षक व विद्यार्थी दोघांचेही शैक्षणिक बाबीपासून लक्ष विचलित होणार नाही.

पण नुसते शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालून चालणार नाही,तर घरी पण पालकांनी मुलांना स्मार्टफोन वापरण्यावर निर्बंध घातले पाहिजे.अगदी दीड दोन वर्षांच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन देणे कितपत योग्य? येथे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे की स्टीव्ह जॉब्स,(ॲपलचे सह संस्थापक) आणि बिल गेट्स (मायक्रोसॉफ्टचे संस्थापक) यांनी त्यांच्या मुलांना आयपॅड आणि लॅपटॉप वापरण्यापासून प्रतिबंधित केले. मुलांना योग्य वेळी झोपण्यास मदत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, बिल गेट्स यांनी त्यांच्या मुलांना १४ वर्षांचे होईपर्यंत स्मार्टफोन फोन देण्याचे टाळले.आतातरी आपण १० वी पर्यंत मुलांना स्मार्टफोन देणे टाळू शकतो?

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य,
विदर्भ वैधानिक विकास मंडळ.


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment