डॉ. मृणालिनी दोडके व श्री. दिपक दोडके,

कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) हा आजकाल सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शास्त्रज्ञ, उद्योगपती, समाजशास्त्रज्ञ सर्वच जीवनाच्या प्रत्येक पैलूत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभावीपणा अनुभवत आहेत. मानवाच्या वर्तनातील सर्वात मोठा बदल AI आणू शकते, असे मानले जात आहे. उद्योग, शिक्षण आणि समाज यांचे कार्यपद्धती येत्या काही वर्षांत पूर्णपणे बदलणार आहेत. हे बदल रोबोट्स, चॅटबॉट्स, ऑटोमेशन टूल्स आणि संवादक्षम व बुद्धिमान मानवीय (Humanoids) रूपात, विकसित मोठ्या भाषा मॉडेल्सच्या (Large Language Models) वापरातून दिसून येतील.
AI च्या मदतीने आज आपण भाषण समजू शकतो, डेटा विश्लेषण करू शकतो आणि प्रतिमा ओळखू शकतो. AI युक्तिवाद, निर्णय घेणे आणि काही प्रमाणात मानवांसारखे संवाद साधणे यामध्येही कुशल आहे. विद्यार्थी वर्ग आज जनरेटिव AI चा मोठ्या प्रमाणावर उपयोग करत आहे. ओपन AI प्रणालीमुळे माहितीचा प्रवेश सुलभ झाला आहे आणि विद्यार्थ्यांचा शिकण्याचा कालावधी कमी झाला आहे. मात्र, ही माहिती कोणत्या प्रमाणात आणि कशी हाताळावी, हा अजूनही अनभिज्ञ विषय आहे. आज AI केवळ माहिती गोळा करण्याचे साधन म्हणून वापरले जात आहे. त्याला ह्यापुढे नेण्याचा विचार अजूनही कमी प्रमाणात दिसतो आहे. नवीन तत्त्वे, नवीन नैतिकता, नवीन संरचना आणि नवीन साधने जेंव्हा प्रगल्भ होतील तेंव्हा AI केंद्रस्थानी येईल आणि GEN Z सोबत सुसंगत बनेल.
आज जर समाजाकडे एकूण पाहिले तर डिजिटल दरी (Digital Divide) स्पष्टपणे दिसून येते — त्यात शहरी आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, हार्डवेअर, सॉफ्टवेअर यामध्ये तफावत प्रकर्षाने जाणवते. इतकेच नाही तर, विविध देशांमध्ये पुरुष आणि महिला यांच्यातील डिजिटल जागरूकतेमध्येही मोठा फरक आहे. उत्पन्नातील असमानता देखील AI जागरूकतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे.
शिक्षण क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे की AI चे उद्दिष्ट खूप व्यापक आणि महत्त्वाचे आहे. AI वैयक्तिकृत शिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या संधी, नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधने प्रदान करेल.
AI मुळे नवनवीन रोजगार संधी निर्माण होत आहेत. मात्र, संधी निर्माण होत असतानाच, एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो — AI च्या गाभ्यात असलेली बरीचशी मोठी भाषा मॉडेल्स (Large Language Models) काही विशिष्ट देश किंवा लोकसंख्येच्या आधारावर पूर्वग्रहदूषित आहेत. एखाद्या देशाने तयार केलेले मॉडेल दुसऱ्या देशासाठी केवळ ५०% – ६०% सुसंगत असू शकतात, अशी सद्य परिस्थिती आहे. याचा अर्थ, LLM ला अजून परिपक्व होण्याची गरज आहे. सध्या व्यवसायांसाठी वेगवेगळी AI साधने उपलब्ध आहेत. म्हणून AI फ्रेमवर्क, कॉर्पोरेट नीतिमत्तेचा भाग म्हणून अंमलात आणणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या विशिष्ट गरजांसाठी मॉडेल ट्यूनिंग करणे हे एक आव्हानात्मक काम ठरते. संस्थेमध्ये AI साधने स्वीकारताना सातत्याने विचारमंथन करावे लागेल कारण हाच भविष्यातील जीवनशैलीचा भाग बनणार आहे.

आज AI केवळ जनरेटिव AI पुरते मर्यादित राहिलेले नाही. तंत्रज्ञान Agentic AI कडे वेगाने वाटचाल करत आहे. ही AI आधारित साधने रिअल-टाइम डेटा सोबत जुळवून घेतात. डेटा स्रोत जरी तोच राहिला तरी, योग्य निर्णय मिळण्यास, अंतिम परिणामावर प्रभाव टाकणारे वेगवेगळे घटक विविध हे स्त्रोतांकडून त्या त्या वेळी नविन संकेत पुरवतील. Agentic AI साधने जलद आहेत. ती विविध स्त्रोतांकडून त्वरित माहिती घेतात आणि कार्यप्रवाह पद्धतीने व्यवसायातील समस्यांचे निराकरण करतात. AI च्या सामाजिक पैलूंमध्ये अनेक आयाम आहेत. आज AI आरोग्यसेवा, शेती, ई-कॉमर्स, वित्त, आणि आदरातिथ्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे.
अनेक तंत्रज्ञान कंपन्या आता व्यावसायिक AI साधने बाजारात आणत आहेत. मात्र, यातून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो —तो म्हणजे AI साधनांचे संवर्धन (Sustainability). AI साधने मोठ्या प्रमाणावर डेटा वापरतात, आणि हा डेटा, डेटा सेंटर्समध्ये संग्रहित केला जातो. त्यामुळे डेटा सेंटर्सचे व्यवस्थापन ही प्राथमिक गरज ठरते. हे डेटा सेंटर्स प्रचंड प्रमाणात पाणी, ऊर्जा, बॅटरी पॉवर वापरतात आणि त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, ही AI मॉडेल्स तग धरतील का? याचे उत्तर आहे —नवनवीन उपाय शोधणे. जसे की ड्राय कूलिंग सिस्टम्स, पावसाचे पाणी संकलन, संसाधनांचे पुनर्वापर. असे उपाय स्वीकारल्यास या समस्यांवर मात करता येईल.
AI स्वीकारण्याच्या प्रक्रियेमध्ये जरी काही आव्हाने असली, तरी समाजातील AI चा उपयोग कालांतराने नक्कीच जीवनमान उंचावेल. मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचे सुंदर संगमातून सर्व समाज घटकांचा फायदा होऊ शकेल हे मात्र निश्चित आहे.

डॉ. मृणालिनी दोडके व श्री. दिपक दोडके,
सल्लागार (IT व तंत्रज्ञान)

Leave a comment