।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..

डाॅ. सौ. मृणालिनी दोडके

‘विचारांची दिशा जेंव्हा खिशातून जाते तेंव्हा..’, काल वर्तमान पत्रातील एका लेखात हे वाक्य वाचले आणि ते आजच्या युगात किती तंतोतंत लागू पडते ह्याची जाणीव झाली. त्याची पार्श्वभूमी म्हणजे IIT मधील विद्यार्थी, सरकारच्या खर्चाने पदवी घेतात आणि नंतर स्वतःच्या खिशाचा विचार करत बाहेरच्या देशात निघून जातात. किती खरी परिस्थिती आहे !

फार पुर्वी नव्हे पण मायभूमी म्हणजे सर्वस्व मानणारे लोक ह्या देशात होते. आणि त्याचे प्रत्यंतर आपल्याला १८५७ च्या जुलूमशाहीच्या विरोधात केलेल्या उठावात दिसून येते. ‘जे जे उत्तम,उदात्त, उन्मत्त महन् मधूर ते ते‘, असे स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या मातृभूमीला म्हणूनच म्हणत. कुशाग्र बुद्धी, परखड विचार,उच्च शिक्षण ह्या भरवशावर त्यांना सुद्धा खिशाचा विचार करता आला असता. पण ‘तुज साठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण‘, असे मानणारे खूप लोक त्यावेळी होते.

काळ बराच पुढे गेला आणि आता आपण ऐकविसाव्या शतकात आहोत.पण आजही आपला देश विकसनशील देशात मोडतो. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालून चाललेल्या ह्या प्रवासात आता गरज आहे ती बुद्धिमान लोकांनी राष्ट्रासाठी आपल्या देशात रहाण्याची! २०४७ पर्यत प्रगत राष्ट्राच्या यादीत बसायचे असेल तर हा खिशातून जाणारा विचार काढून टाकून आपल्या देशातच आपण काय योगदान देवू शकतो, हे आज नवीन पिढीने ठरवायला हवे. देशात नवीन उद्योगांसाठी असलेल्या वेगवेगळ्या योजना, Make in India चे ध्येय, STEM (SCIENCE, TECHNOLOGY, ENGG, MATHS) मधे चाललेली प्रगती, हे बघता दुसऱ्या देशात जावून चाकरी करण्यापेक्षा आपल्या देशात राहून आपण किती जणांना रोजगार देवू शकतो हा विचार रुजायला हवा.

आजचे जग हे स्पर्धेचे आहे, गुणवत्तेचे आहे, गतीचे आहे पण फक्त पैसाच कमाविणे हे जेंव्हा डोळ्यासमोर लक्ष असते, तेव्हा पालक देखील त्यात अग्रगण्य असतात. पाल्याला लागतील त्या सुविधा, मदत, वेळप्रसंगी कर्ज काढून पैसा देणे ह्यातच इतिकर्तव्य मानतात. आपला मुलगा हुशार व्हावा, पण त्यासोबत तो सुसंस्कृत व्हावा, देशातच राहून प्रगती करावी ह्यासाठी मात्र पालक आज कमी पडत आहे. मुलगा ५ वी इयत्तेत गेल्यापासून त्याच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे देणारे पालक आज कमी नाहीत. खेड्यातून गावात, गावातून शहरात आणि शहरातून परदेशात हा असा मार्ग प्रत्येक जण अवलंबितो आहे. ‘खेड्यात काय ठेवले आहे?’,असे सारेच म्हणतात, पण सगळेच लोक शहरात जायला लागले तर आपल्या शेतजमीनींचे काय? पारंपरिक शेतीला आज खूप महत्व आहे. पण पैसा हे एक असे स्वप्न आहे की, कमी वेळात जास्त मिळकत, कमी वेळात जास्त नफा, कमी वेळात जास्त शिक्षण हे जणू काही समीकरण झाले आहे. खेड्यातील लोक जमिनी विकून शहरात येतात पण शहरातील वाढती लोकसंख्या, अपुरी यंत्रणा, अपूऱ्या नोकऱ्या ह्याचा ताळमेळ बघता,आपली सक्षमता न बघता, आपला कल न बघता प्रत्येक जणाला सनदी अधिकारी बनायचं असते. पोलिसात भरती व्हायचे असते किंवा कमीतकमी तलाठी तरी व्हायचे असते. ह्याला कारण प्रत्येकाचा विचार हा खिशातून जाताना दिसतो. भारतात राहून पैसा कमावता येत नाही हे म्हणणाऱ्यांसाठी, खालील उदाहरण मात्र डोळे उघडणारे ठरेल.

श्रीधर वेंबू, मध्यमवर्गीय तामिळ घराण्यात जन्मलेले. बुद्धी कुशाग्र. त्या जोरावर ते IIT मद्रास येथून इलेक्ट्रीकल इंजिनीयर झाले. अभ्यासात गती आणि उच्च शिक्षणाची ओढ, हयामुळे ते अमेरिकेला Princeton University मधे गेले आणि MS, PhD ही डिग्री घेतली. काही वर्षे तेथे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी काढली. अत्यंत सोप्या पद्धतीने ते साॅफ्टवेयअर बनवत असत आणि लोकांना काही दिवसासाठी विनामूल्य वापरायला देत असत. त्यात त्यांना काही सुधारणा हव्यात का हे विचारत असत. त्याप्रमाणे त्यात बदल करत आणि पुन्हा काही दिवसासाठी माफक दरात वापरायला देत असत. निरनिराळ्या साॅफ्टवेअरमधे बदल करण्यास त्यांना माणसांची गरज भासू लागली. अमेरिकेत राहून हे शक्य नाही हे त्यांनी ताडले आणि ठरविले की आपण भारतात कंपनी काढायची. आपल्या लोकांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून द्यायच्या. त्यांनी Zoho Corporation नावाची कंपनी उघडली. त्याचवेळी त्यांनी ठरविले की उद्योग खेड्यात न्यायचे. किती तो धाडसी निर्णय! मोठ्या शहरात राहून खर्च वाढविण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या आसपासच्या गावातील तरूण जमविले. त्यांना ट्रेनिंग दिले आणि त्यांना नोकरीच्या संधी दिल्या. इतकेच काय तर त्यांनी ग्रामीण भागात Zoho Schools निर्माण केल्या. शाळेचे काम एकच, की तरूणांना व्यवसायाभिमुख ट्रेनिंग देणे आणि आपल्या कंपनीत नोकरीवर ठेवणे!

एकीकडे त्यांचे साॅफ्टवेअर दिवसेंदिवस वापरण्यास योग्य आणि जागोजागी वापरण्यात येवू लागले. कमी खर्चात बनविलेले साॅफ्टवेअर परफेक्ट झाले आणि त्याचा उपयोग अपरिहार्य होवू लागला. श्रीधर वेंबू त्याच्या वापरासाठी मोबदला घेवू लागले. जगभरात वापरण्यात येणारे कितीतरी निरनिराळे साॅफ्टवेअर आज त्यांची कंपनी बनवते आहे. परिणामी ते आज जगातील ३९वे अब्जाधीश आहे. करोना काळात ज्यावेळी कितीतरी साॅफ्टवेअर कंपन्या नोकरदारांना, नोकरीवरून काढत होत्या, त्यावेळी वेंबू ह्यांनी आपले बुद्धी, पैसा, व्यवस्थापन, कौशल्य वापरून, जास्त प्रमाणात नोकर भरती करून, काळाची गरज ओळखून असे काही प्रॉडक्ट्स बनविले की जे आज प्रत्येक साॅफ्टवेअर कंपनीत वापरले जात आहेत. २०१९ मधे वेंबू अमेरीका सोडून भारतात आलेत. आज ते टेनकसी, तमिळनाडू ह्या त्यांच्या गावात ते रहातात, सायकल चालवितात, मोकळ्या हवेत त्यांच्या शेतात असलेल्या झाडाखाली बसून हातात एक लॅपटॉप घेवून काम करतात.

मित्रांनो, स्वप्न बघावीत पण ते पुर्ण करण्यात ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे त्यांचे ऋण नेहमी लक्षात ठेवावे. विचारांची, प्रयत्नांची दिशा नेहमीच खिशातून जाणारी नसावी. पैसा हे कधीही साधन म्हणून वापरायचे असते आणि ‘देहाकडून देवाकडे जाताना, मधे देश लागतो‘, हे आपण सगळ्यांनी ध्यानात ठेवायला हवे.


डाॅ. सौ. मृणालिनी दोडके, 

IT Consultant,
mrunalinidodkey@gmail.com


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment