।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम

श्री. रघुवीर अधिकारी

अल्पारंभ फाउंडेशन संचलित कापरेकर संशोधन प्रसार उपक्रम

कै. दत्तात्रय रामचंद्र कापरेकर हे जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले प्रतिष्ठित रॅंग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळील देवळाली येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांनी शालेय स्तरावर संशोधनपर लेखन केले, जी अत्यंत दुर्मिळपणे आढळणारी बाब आहे.

कापरेकर सरांचे अद्वितीय योगदान:
द. रा. कापरेकर यांचे संशोधन मुख्यतः अंकशास्त्रावर आधारित होते. त्यांच्या संशोधनातील मुख्य योगदान म्हणजे:

  • कापरेकर संख्या
  • स्वयंभू संख्या
  • हर्षद संख्या
  • कापरेकर स्थिरांक
  • दत्तात्रेय संख्या
  • डेम्लो संख्या

१९७५ साली प्रा. मार्टिन गार्डिनर यांनी कापरेकर सरांच्या संशोधनाची दखल घेतली आणि Scientific American या मासिकात त्यांच्या कार्यावर आधारित लेख प्रकाशित केला. त्यामुळे कापरेकर सर जगभरात प्रसिद्ध झाले. त्यांचे नाव World Dictionary of Mathematics मध्ये नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, लेखक स्टेफानू एलियास अलॉइसियस यांनी ‘D.R. Kaprekar’ हे त्यांचे चरित्र लिहिले आहे.

अल्पारंभ फाउंडेशनचे उपक्रम:
अशा थोर गणितज्ञाचे योगदान आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अल्पारंभ फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविले जातात.

  • शाळा व महाविद्यालयांमध्ये कापरेकर सरांच्या कार्यावर व्याख्याने आयोजित केली जातात.
  • के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय, सी. एच. एम. ई. सोसायटीच्या बालक मंदिर, गोखले एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांसारख्या ठिकाणी नियमितपणे कार्यक्रम राबवले जातात.

या अतंर्गत होणाऱ्या काही उपक्रमांचा उल्लेख करावासा वाटतो.

१७ जानेवारी २०२५: कापरेकर दिन साजरा
कापरेकर सरांचा जन्मदिवस, १७ जानेवारी, सी. एच. एम. ई. सोसायटीच्या बालक मंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेत ‘कापरेकर कॉर्नर’ तयार करण्यात आला.

YouTube व्हिडीओ लिंक :https://www.youtube.com/watch?v=zsRf7JogAoA

  • या कॉर्नरमध्ये कापरेकर सरांच्या कार्याची हस्तलिखित तक्त्यांद्वारे मांडणी केली होती.
  • कापरेकर स्थिरांक, हर्षद संख्या यांसारख्या संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
  • विद्यार्थ्यांनी कपरेकर सरांच्या कार्याविषयी माहिती सादर केली.

गणित दिनदर्शिका:
विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करण्यासाठी व कल्पकता वृद्धिंगत करण्यासाठी गणित दिनदर्शिका तयार करण्यात आली. डिसेंबर महिन्याची ही खास दिनदर्शिका विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने बनवली.

छायाचित्रे:

के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालय येथील कापरेकर कॉर्नर ! या महाविद्यालयात याअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

दि. २८ जाने. २०२५ रोजी ‘कापरेकर कॉर्नर’ या उपक्रमाची सुरुवात आर. एच. सपट अभियांत्रिकी महाविद्यालय, नाशिक येथे करण्यात आली आहे.

जु. स. रुंगठा हायस्कुल येथे, विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा गणितावर आधारित पुस्तकांचे वितरण.

अशा पद्धतीने अल्पारंभ फाउंडेशन कापरेकर सरांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या कार्याचा भाग होतांना मला अतीव समाधान मिळते आहे.

——————————

श्री. रघुवीर अधिकारी, संस्थापक सदस्य, अल्पारंभ फाउंडेशन


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment