डॉ. रुपाली कुलकर्णी
सध्याचे युग हे डिजीटलयुग आहे. कोणत्याही दुकानातील UPI पेमेंटपासून ते बॅकिंग व्यवहारापर्यंत, ऑनलाईन शॉपिंग पासून ते गुंतवणूकीपर्यंत , ‘वर्क फ्रॉम होम’ संस्कृतीमुळे ऑनलाईन ऑफिसचे कामकाज करण्यापासून ते मनोरंजनही OTT प्लॅटफॉर्म मार्फत होण्यापर्यंत सर्वच आयुष्य डिजीटल झालं आहे. त्यामुळेच डिजीटल क्षेत्रात गुन्हेगारीचा प्रवेश होऊन सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही कमालीचं वाढलं आहे. सर्वत्र ऑनलाईन घोटाळे होताना दिसून येतात.

इंटरनेट, स्वतंत्र नेटवर्क किंवा कॉम्प्युटरच्या टेक्नॉलॉजीतील कच्चे दुवे शोधून, त्यातून सिस्टिम मध्ये शिरकाव करून, होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना ‘हॅकिंग’ असे म्हणतात ! तर समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेला भेदून (जसे लालच किंवा भीती दाखवून, घाई किंवा आळस यांचा वापर करून इ. ) होणाऱ्या सायबर गुन्ह्यांना ‘फिशिंग’ (हो, फसवुणकीसाठी गुन्हेगाराच्या गळाला मासा लागणे) असे म्हणतात !! एकवेळ तंत्रज्ञानाचा , सॉफ्टवेअरचा, टूल्सचा, प्रोटोकॉल्सचा वापर करून हॅकिंगला आळा घालता येणे शक्य आहे ! पण प्रत्त्येक व्यक्तीची असणारी वेगवगेळी मानसिकता बदलणे आणि त्याद्वारे फिशिंगचा मुकाबला करणे तसे कठीणच ! म्हणूनच फिशिंगच्या सायबर गुन्ह्यांचं प्रमाणही हॅकिंगच्या सायबर गुन्ह्यांपेक्षा अधिक दिसते !
सायबर गुन्ह्यांच्या घटनांमुळे आर्थिक तसेच संस्था किंवा व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे नुकसान होऊ शकते आणि ते रोखण्यासाठी मजबूत नियंत्रण व्यवस्था असणे आवश्यक आहे ! https://cybercrime.gov.in/ हे पोर्टल सायबर गुन्ह्यांना बळी पडणाऱ्या पीडित/तक्रारदारांना सुविधा देण्यासाठी सुरु केलेला भारत सरकारचा एक उपक्रम आहे. या पोर्टलवर पीडित लेखी ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात, संबंधित पुरावे अपलोड करू शकतात आणि त्यांच्या खटल्यांच्या प्रगतीचा मागोवा घेऊ शकतात. तसेच १९३० हा चोवीस तास उपलब्ध असणारा सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे. येथेही तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. पोर्टलवर नोंदवलेल्या तक्रारींवर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी/पोलिसांकडून तक्रारींमध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे कारवाई केली जाते. त्वरित कारवाईसाठी तक्रार दाखल करताना योग्य आणि अचूक तपशील देणे अत्यावश्यक आहे. हे पोर्टल सायबर सुरक्षा मार्गदर्शक म्हणूनही वापरता येते. इथे सायबर सुरक्षा या विषयाला अनुसरून अनेक व्हिडिओ तसेच शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे.
अल्पारंभा फाऊंडेशन मार्फतही फेसबुक, युट्युब, ब्लॉग इ. मार्गांचा वापर करून सायबर गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी अनेक उपक्रम केले जातात. Bombay Stock Exchange मार्फत नुकत्याच झालेल्या ‘सायबर सुरक्षा जिंगल कॉम्पिटिशन’ साठी पुढील व्हिडिओ तयार करण्यात आला होता. या लहानश्या व्हिडीओ मार्फत ‘सायबर सुरक्षा मंत्र’ समजावून घेऊयात ! व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
डॉ. रुपाली कुलकर्णी,
Head: IT , Contents & Training
SWS Financial Solutions Pvt. Ltd.

Leave a comment