
स्वागत गणरायाचे…
हे गणराया, गजानना, देवराया, करुणाकरा,
शुभ आगमने नमन तुजला, बाप्पा कृपासागरा !
भक्तीभावाने केली सज्जता, तुझ्या स्वागताची,
तुझ्या आगमने, प्रसन्न दर्शने, मनी आभा चैतन्याची !
शुभ स्वागता मोहक गंध, अन रंगावली नेटकी ,
औक्षण घेऊनी गृही प्रवेशा, देवा विसावा मंचकी !
आरास असे मनमोहक, त्यात दिसे मूर्ती साजिरी,
रूप तुझे दिसे शोभुनी, वस्त्रलंकार भरजरी !
पुष्प सुगंधी, नाजूक दुर्वा, अर्पिल्या चरणी हरितपत्री,
पंचामृत, फलाहार अन मोदक सजले पात्री !
मनोभावे करतो अर्चना, तुझ्या प्राण प्रतिष्ठापणे,
प्रार्थून तुजला, चिंतून तुझे रूप, प्रसन्न होती मने !
गणेशस्तोत्र, अथर्वशीर्ष, अर्पिली मंत्रपुष्पांजली,
स्वीकारावी देवा, आमची सेवा-भावांजली !
वरदहस्त तुझा असावा, सदैव सर्वांवरी,
श्री गणराया, कृपा वर्षवा सदैव भक्तांवरी !
श्री गणराया, कृपा वर्षवा सदैव भक्तांवरी !!
- सौ. रुपाली कुलकर्णी

Leave a reply to Poonam Kulkarni Cancel reply