विद्येसह वित्त येते…

विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली,
निती विना गती गेली, गती विना वित्त गेले
इतके सर्व अनर्थ, एका अविद्येने केले !!
हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार, शिक्षण घेण्याच्या बाबतीत जितके खरे आहे तितकेच खरे ते आर्थिक शिक्षणाच्या बाबतीतही लागू पडतात.ज्योतिबा म्हणत “एक स्त्री साक्षर झाली तर पूर्ण कुटुंब शिक्षित होते”. याच विचारांना आजकालच्या सुशिक्षित असणाऱ्या स्त्रियांच्या कुटुंबाच्या बाबतीत , “एक स्त्री जर अर्थसाक्षर झाली तर पूर्ण कुटुंबाचे भवितव्य उज्वल होते” असे कालानुरूप मांडता येईल.
असे वाटण्याचे कारण म्हणजे स्त्रियांची घरातील आर्थिक बाबतीत दिसून येणारी उदासीनता ! मैत्रिणींनो, तुमच्या आजी किंवा आईची किंबहुना तुमचीही घरासाठी आर्थिक निर्णय घेण्याच्या बाबतीतली परिस्थिती जरा पडताळून पहा. अविवाहित स्त्रियांच्या बाबतीत कुटुंबातील सर्व आर्थिक निर्णय हे घरातील ज्येष्ठ वडीलधारी पुरुष मंडळी जसे वडील, काका इत्यादी घेताना दिसतात तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत हे निर्णय सर्रासपणे नवरे मंडळी घेताना दिसतात. यामागचे कारण म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीचा पगडा असेल किंवा स्त्रीची आर्थिक बाबतीतील अनास्थाही !! घरासाठी आर्थिक निर्णय घेतांना, संबंधित आर्थिक संकल्पना जसे बचत , विमा , करभरणा, कर्जे, गुंतवणुकीची माध्यमे इ बाबतीत स्वतःहून काहीतरी नवीन शिकून, अभ्यास करून, वाचून पाहून, पडताळून पाहण्याची अनिच्छा बहुतांश स्त्रियांमध्ये असते ! ही बाब स्त्रियांच्या आणि पर्यायाने पूर्णच कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीसाठी अडसर ठरू शकते.
पुष्कळ सधन स्त्री वर्गाच्या बाबतीत थोडे कटू सत्य तर असेही मांडावेसे वाटते की जो स्त्रीवर्ग इंटरनेट आणि सोशल मीडियावर फॅशन, पाककला, भटकंती, सिनेमे इ. वर रील्स. मिम्स, स्टोरी, पोस्ट्सच्या विळख्यात सापडलेला दिसतो तो स्त्री वर्ग अर्थजगतात मात्र अस्तित्वशून्य आढळतो ! म्हणजे आर्थिक संकल्पना शिकायची, जाणून घेण्याची, वाचायची इच्छा असेलच तर एरवी हातात सतत असणाऱ्या मोबाईलचा वापर यासाठीही करता येईलच की ! पण आर्थिक विषय येताच बहुंतांश स्त्री वर्ग काय प्रतिक्रिया देतो ? “मला नाही बाई त्यातले काही कळत”, “आमचे हे बघतात ना, मग मी कशाला त्यात डोके घालू?”, “माझा ह्यांच्यावर विश्वास आहे, कुटुंबासाठी योग्य असे ते करतीलंच की” ,”तो माझा विषय नाही” !! पण असे म्हणून स्त्री वर्ग आपली याबाबतीतली अनिच्छा, अज्ञान झाकू पाहत असतो.
मैत्रिणींनो, “आर्थिक सल्ला आणि सेवा” या क्षेत्रामध्ये आम्ही गेले तीन दशके कार्यरत आहोत ! हजारो ग्राहक कुटूंबांना ओळखत आहोत. कोविडच्या काळात जेव्हा अनेक घरातील कर्ते पुरुष काळाने ओढून नेले, तेव्हा आर्थिक बाबतीत डोळ्यावर/ विचारांवर अनिच्छेचा पडदा ओढून बसलेल्या अनेक स्त्रिया, अचानक आलेल्या आर्थिक जबाबदारीने हडबडून गेलेल्या आम्ही जवळून पहिल्या आहेत. अशीही उदाहरणे पाहण्यात आहेत जिथे अशा अर्थ निक्षरतेमुळे चांगल्या सधन कुटुंबांची वाताहत झालेली आहे ! याउलट ज्या घरातील स्त्रियांना आर्थिक जगताचे चांगले ज्ञान असते, ज्या स्त्रिया या क्षेत्रात अभ्यासू वृत्ती दाखवितात त्या मात्र आपल्या मुलांसाठी, इतर कुटुंबियांसाठी उत्तम आर्थिक निर्णय घेताना दिसतात. घरातील संपत्तीचे, आर्थिक कागदपत्रांचे, माहितीचे उत्तम व्यवस्थापन करताना दिसतात. त्या अधिक आत्मविश्वासू असतात. अशा स्त्रिया घरातील मुलांवरही, मुलांना आर्थिक निर्णयाच्या प्रक्रियेत सामावून घेवून चांगले अर्थसंस्कार घडविताना दिसतात. तिथे मुलांना अर्थभानही लवकर येते आणि म्हणून अर्थ साक्षर स्त्री एका आर्थिक दृष्ट्या जबाबदार, जागरूक आणि सक्षम पिढीच्या निर्मितीस कारणीभूत होते असे वाटते !!

तेव्हा आपल्याच मुलांसाठी, घरासाठी, कुटुंबासाठी झटकून टाका या आर्थिक निरक्षरतेचा पडदा. बदला थोड्या सवयी ! मोबाईल हातात घेतल्यावर सोशल मीडिया साईट्सबरोबरच अर्थ ज्ञान पुरविणाऱ्या आवृत्ती, ब्लॉग ही वाचा ! वर्तमानपत्रातील अर्थसदरे वाचा. घरातील निर्णय बचत किंवा गुंतवणुकीच्या प्रक्रियेत सामील व्हा. संकोच न बाळगता प्रश्न विचारा. खाचखळगे, टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्या. हे तुमच्यासाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि पर्यायाने समाजाच्या, देशाच्याही हिताचेच ठरणार आहे ! तेव्हा “आर्थिक गती विना वित्त गेले” हे होण्यापासून टाळूयात, ‘ विद्येसह वित्त येते’ हे खरे करूयात !! अर्थ साक्षर होऊयात !!
– डॉ. रुपाली कुलकर्णी,
अर्थ साक्षरता कार्यकर्ती,
अल्पारंभ फौंडेशन
टीप : सदर लिखाण वैयक्तिक अनुभवातून केलेले आहे. अपवादात्मक उदाहरणे मान्य !!

Leave a comment