।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


वानोळा

“घरी चाललाच आहेस तर जातांना वानोळा घेऊन जा…. रिकाम्या हाताने जाऊ नये….!!”, वरिल वाक्य ऐकले आणि

 वानोळा शब्द मनात फिरत राहिला नकळत मन बालपणाच्या आठवणीत गेलं. तेव्हा असली चॉकोलेट, कॅडबरी नाही मिळायची हातावर…, किंवा अशी घसघशीत किमतीची चकचकीत मिठाईची पाकिटं देखील नाही मिळायची पाहुण्यांना निघताना. तेव्हा पाहुण्यांना निरोप मिळायचा तो भुईमूगाच्या शेंगा, मक्याची कणसे, घरी बनवलेल्या पायली दोन पायली दाळी, ओल्या हरभऱ्याची पेंढी, शेतात पिकलेली ताजी हिरवीगार मेथी- कोथंबीरची जुडी. आणि असलंच बागायतदार घर तर टोपलीभर पेरू, पपई सारखी फळं, आणि अजून श्रीमंत घरात गेलं की मिळायचा केळीचा घड, तोही पूर्ण किमान दहा डझनभर केळी लपेटलेला !

 मग घरी येऊन जोवर तो वानोळा पुरायचा, तोवर त्या नातलगांची आठवण रोज निघायची.  तो वानोळा केवळ जिन्नस नसायचा, ती माया असायची.. प्रेम असायचं, हृदयातून पोटापर्यंत जाणारं. वाळवणाचे दिवस असले की, मग तर बघणंच नको. पापड, कुरडई प्रत्येक घरात व्हायची, तरी शेजार पाजारी वानोळा जायचा. ती प्रत्येकाच्या हातची चव चाखण्यात ही वेगळाच आनंद असायचा. सगळ्यात विशेष म्हणजे “कैरीचं लोणचं.” मसाला तोच, कैऱ्या त्याच, पद्धतही तीच. तरी प्रत्येक घरातल्या लोणच्याचा सुगंध ही वेगळा आणि चवही वेगळी !!

थोडक्यात काय तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या वानोळ्या च्या निमित्ताने माणसं आणि घरं परस्परांच्या हृदयात राहायची. एखादयाची गाय किंवा म्हैस व्याली तरी खरवस संपूर्ण गल्ली तरी खायची. आज शेजारच्या घरात बाळ जन्माला येतं तरी आपल्याला बारशाला कळतं. हे वास्तव आहे. अशावेळी खरंच वाटतं, आपण खरंच सुधारतो आहोत की माणसांपासून दुरावतो आहोत. 

जोवर वानोळा होता तोवर माणूस भोळा होता. माणूस शहाणा सुशिक्षित झाला, ‘वानोळ्या’ची लाज वाटायला लागली आणि मनं दुरावत गेली. मग ‘वानोळ्या’ची जागा मिठाईच्या पाकिटांनी आणि कॅडबरी सेलिब्रेशनने घेतली. जितक्या लवकर कॅडबरी विरघळते तितक्या लवकर माणूस माया, स्नेह विसरायला लागला.  सगळं कसं प्रॅक्टिकल होत गेलं आणि इमोशन्स फक्त सिनेमाच्या कथेमध्येच बंद झाल्या.. तिकीट काढून आम्ही डोळ्यात आसवं आणायला लागलो आणि कथा कादंबऱ्यात नाती वाचायला लागलो..

माहेरवाशीण आता केवळ गोष्टींमधेच सापडते, तिच्या  गाठोड्यात वानोळा देणारी माय देखील पडद्याआड जाऊ पाहते. तरी अजूनही तुमच्या माझ्या सारख्यांची आई निघताना पिशवीत काही ना काही टाकते, हाच “वानोळा” असतो.

देत राहणाच्या संस्काराचा, वाटून खाण्याच्या वृत्तीचा, लक्ष्मीची ओटी भरून पाठवणी करण्याचा, दूर असलो तरी स्मरणात राहण्याचा मार्ग असतो… वानोळा.

स्रोत : कायप्पा 


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment