।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


बाई….. “माणूस” म्हणून: भाग ४४,४५, ४६ डॉ. कल्पना कुलकर्णी

 

भाग ४४: सख्खे शेजारी

 

माझी आणि आजींची ओळख गेली आठ वर्षे आहे. माझी सई तान्ही होती तेव्हा त्यांची नात एक वर्षाची होती. दोन्ही मुलींना बाबागाडीत फिरवताना आम्ही भेटलो, ओळख झाली. त्यांची नात तिच्या गावाला परत गेली तरी आमची ओळख वाढली. “जाणं-येणं असलेला शेजार” या सदरात आमची दोन्ही कुटुंब गणली गेली.

सध्या त्यांच्या ऐसपैस घरात फक्त एक ज्येष्ठ नागरिक संघच राहतो ज्याचे चार सभासद आहेत. दोन आजी आणि दोन आजोबा. माझे चार जिने चढून आजी काही निमित्तांनीच येतात. उदाहरणार्थ सईचा वाढदिवस, गौरीचं हळदी-कुंकू किंवा माझे स्वयंपाकाचे प्रयोग. म्हणजे असं की गॅसवर पातेलं चढलेलं असतं. पदार्थ बिघडत चाललाय याची मला जाणीव होते. मी फोनकडे धाव घेते. “हॅलो आजी, आता काय करू?” हे कळीचं वाक्य. कधी लाडवाचा पाक फसलेला असतो. कधी तिळाच्या वड्यांसाठी तिळकुट कमी आणि पाक जास्त, कधी पराठे लाटतानाच फुटून भाज्या बाहेर येत असतात.

क्वचितच येणार्‍या आजी आपला दुखरा पाय सांभाळत पोहोचतात. त्यांना यावं लागलं याचं ओशाळवाणं हसू माझ्या चेहर्‍यावर आणि त्या मात्र थोड्याशा विवंचनेत. आता काय बरं करावं आणि हिचा पदार्थ दुरुस्त करावा. त्या माझ्या स्वयंपाकघराचा ताबा घेतात आणि माझी लेक आणि नवरा आता तो पदार्थ नक्कीच खाण्याजोगा होणार याची खात्री पटून निवांत बसतात.

याउलट आम्ही मात्र सततच आजींकडे! दुपारी बाई येणार नाहीत, सई एकटी आहे की लगेचच तिचं बिर्‍हाड ती तात्पुरतं तिकडे हलवते. तिच्या सगळ्या नाचांच्या, नाटकांच्या किमान एक एक तालमी आजींच्या हॉलमध्ये, गच्चीमध्ये होतात. दोन्ही आजींच्या स्वयंपाकघरातल्या खाऊंच्या डब्यांची वर्गवारी सईला पाठ असते.

कधीतरी आमची निसर्गाबद्दलची ओढ अनावर होते. वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जातो. आमच्या एक एक फूट उंचीच्या कुंड्या घेऊन आम्ही आजींच्या बागेत डेरेदाखल होतो. माती, खत आणि रोपं सगळंच त्यांच्या बागेतलं. झाडंही त्यांनीच लावून द्यायची. आम्ही आपलं कुंड्या घरी आणून फक्त पाणी घालायचं.

कधीतरी आजीच निरोप देतात, थालीपीठाची भाजणी केली आहे, आमसुलाचं सार केलं आहे, वगैरे…

गोल्डीचा तर आजीचं अंगण आणि बाग यावर पूर्ण मालकी हक्क! रोज सकाळी धावण्याचा व्यायाम, त्यानंतर दोन्ही आजींकडून नित्यनवीन खाऊची वसुली आणि आल्यागेल्यावर थोडंफार भुंकून “मी कशी राखण करतीय”, अशी आमची भलावण हे ती थंडी पावसाला न जुमानता अखंड करते.

गोल्डीसकटच्या आमच्या लुडबुडीची आता आजी-आजोबांनाही सवय झालेली आहे. मध्यंतरी पंधरा दिवस आम्ही गावाला गेलो तर दोन्ही आजींना आणि फारसं न बोलणार्‍या आजोबांनादेखील चुकल्यासारखं झालं. आम्हीसुद्धा तिकडे गावाला मिनिटा-मिनिटाला त्यांची आठवण काढीत होतोच की!

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ४५: ..निमित्तांवाचून… केवळ “वाटलं” म्हणून!

 

            मैत्रीचे छोटे-मोठे तुकडे एकमेकांत घट्ट चिकटवून तयार केलेलं एक कोलाज म्हणजे माझं आयुष्य. एकदा कॅलिडोस्कोप फिरवावा आणि निरनिराळ्या नक्षींची जाळी पाहावी, तसं सगळं आठवणीतलं आयुष्य ! त्यात प्रकर्षानं आठवतो तो शाळा-कॉलेजातला मित्र-मैत्रिणींचा मोठ्ठा घोळकाच! संदर्भ बदलत असतानाच कॅलिडोस्कोपमध्ये काचांचे तुकडेही बदलत गेले.

            बालपणीच्या अनोख्या वेडांपासून तरुणाईच्या जोषिल्या खेळांपर्यंत सतत बरोबर असलेली प्रिया, अभ्यास, खेळ, वाचन यांच्या संगतीतच वाढत गेलेल्या मनात हळूहळू गुंतलेला आणि नंतर जीवनसाथीच बनलेला केतन, करियरच्या कैफात झोकून देऊन केलेल्या अभ्यासात, कष्टात बरोबरीने जागलेले सुलभा, ज्योती, विजय हे आणि असेच खूप मित्र, फुरसतीच्या क्षणी बेकर, एडबर्ग आणि स्टेफीचं टेनिस यावर अधिकारानं बोलणारा आनंद, मोरपीस फिरवल्यासारखी माझ्या आयुष्यात आलेली आणि माझं आयुष्यच व्यापलेली माझी छोटी लेक सई….

            हे आणि असे कितीतरी जण माझ्या या मैत्रीच्या प्रदेशातले कायमचे हक्काचे जहागीरदार ! पण तरीही “मैत्र” म्हणून लिहायला मला आठवला तो “तो”च!

            तशी आमची मैत्री व्हावी  असे आम्ही भेटलोच नाही. तो माझ्यापेक्षा कितीतरी मोठा-वयानं, मानानं, वलयांकित परभाषिक! व्यावसायिक कामानिमित्त आम्ही अर्ध्या दिवसासाठी भेटलो. भाषेचा प्रश्‍न असल्यानं सर्वमान्य (?) इंग्रजी भाषेत एकमेकांचा परिचय करून घेऊन आम्ही औपचारिक संभाषण केलं आणि एकमेकांचा निरोप घेतला.

            यजमानपदाची शेवटची जबाबदारी म्हणून मी आभाराचं पत्र त्याला पाठवलं. .. त्याच्या व्यस्त दैनंदिनीला आणि वलयांकित वर्तुळाला मानवणार्‍या “ई-मेल” द्वारे! त्यावर त्याचं पत्राला उत्तर. हळूहळू हा सिलसिला वाढत गेला. तो मोठा, मी लहान; शेकडो मैलांचं अंतर, भाषेचा दुरावा, ही आणि अशी अनेक बंधनं मागे पडली. आम्ही मैत्रीच्या सुंदर प्रदेशात हलकेच पोचलो. रोजचं आयुष्य, व्यवसाय यांचे संदर्भ येतायेताच एकमेकांच्या मनाचे संदर्भ महत्त्वाचे ठरत गेले. आपण जगत असलेलं आयुष्य आणि आपण स्वत: असे दोन वेगवेगळे संदर्भ आपल्या व्यक्तिमत्त्वाला असू शकतात, अशी “एक झाड आणि दोन पक्षी” ही विश्राम बेडेकरांची संकल्पना त्याला ई-मेलमधून भावली. मराठीचा गंधही नसलेल्या  त्याला आशाबाईंच्या आवाजातली “सांज ये गोकुळी” ची हुरहुर आणि शांतता- दोन्ही जवळची वाटली. त्याच्या पेशंटच्या व्यथा, त्यामुळे त्याची होणारी तगमग मला अनुभवता आली. त्याचं “मोठ्ठं” असतानाच माणूस म्हणूनसुद्धा जगणं मला उमजलं. त्याच्या धावपळीच्या आयुष्यातले धागेदोरे माझ्या शांत आयुष्यात चपखल गुंफले गेले.

            याशिवाय त्याच्या भाषेतली बडबडगाणी मी बालवाडीच्या उत्साहानं पाठ केली. जाहिरातींमधलं स्त्रियांचं अस्तित्व, अमिताभचे सिनेमे, सचिनची पाठदुखी, ऐश्‍वर्या राय, युक्ता मुखी या सुंदर्‍यांचे सौंदर्य असे अनेक “वैश्‍विक” वादही आम्ही हिरिरीनं घातले.

            आजची एकमेकांना “भेटण्या” ची एकमेकांशी “बोलण्या” ची ही परंपरा अजूनही तशीच चालू आहे.

            बालपणाची निरागसता आणि तारुण्यातली कोवळीक ओसरल्यावर मनाला एक निबरपणा आला होता. नाती, हितसंबंध गरजेच्या तराजूत तोलण्याइतकं मन व्यवहारी बनलं होतं आणि त्याच्याशी मैत्री झाली!

            कुठल्याही फायद्या-तोट्याव्यतिरिक्तची समीकरणं दृढ झाली. मनावर चढत चाललेली अलिप्ततेची घट्ट कवचं जरा ढळली. कुठल्याही निमित्तांवाचून केवळ “वाटलं म्हणून” काहीतरी करणं, भेटणं, बोलणं हे मनाच्या उभारीचं लक्षण पुन्हा मला माझ्यात दिसलं. म्हणूनच माझ्या आयुष्यातला कुठलाच प्रदेश आंदण मिळालेला नसतानाही माझ्या मनोव्यापारात कडेकडेनं पसरलेल्या या माझ्या मित्राबद्दल लिहावसं वाटलं, त्याला न कळणार्‍या भाषेत ते मी लिहिलं. माझ्या आयुष्यात अखंड पसरलेल्या मैत्रीला साक्षी ठेवून.

ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


भाग ४६: प्रवास

 

मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती ससूनच्या कोपर्‍यावर टोपलीत केळी विकत होती. माझ्या नेहमीच्या केळीवाल्याची गाडी नव्हती; म्हणून मी तिच्याकडून केळी घेतली. असं अधूनमधून घडू लागलं, आमची तोंडओळख झाली.

माझ्या केळीवाल्याचा आणि तिचा चांगलाच परिचय असावा. कधी त्याच्याकडे चांगली केळी नसली की तो आवर्जून तिच्याकडे मला पाठवू लागला. तो नसला की त्याची गाडी सांभाळताना ती दिसत होती. हळूहळू ती माझ्या मुलीला, नवर्‍याला ओळखू लागली. डझनभर केळींवर दोन जास्तीची केळी “बेबीसाठी म्हणून” हक्कानं देऊ लागली. एक दिवस तिनं मला हात दाखवून थांबायची खूण केली. लगबगीनं जवळ येऊन पन्नास रूपये उसने मागितले. माझं मध्यमवर्गीय मन चिंतेत पडलं. भिडस्तपणे मी पैसे दिले. आठवड्यानं तिनं ते परतही केले. मीच आपली पुन्हा ही कटकट नको म्हणून तिला टाळायला लागले. चार पावलं पुढे जाऊन दुसरीकडून केळी घेऊ लागले.

पुन्हा एकदा ती अशीच ठरवून माझ्याकडेच आली. मी आपली पैसे द्यावेत की देऊ नयेत या विचारात; पण माझा अंदाज तिनं साफ चुकवला. ती म्हणाली, “तुमचे केळीवाले काका परवाच वारले. तुम्हाला माहिती आहे की नाही म्हणून सांगायला आले.” मला धक्काच बसला. दहा मिनिटं मी तिच्याशी बोलले. काकांचं इथे कोणीच नव्हतं. तीही एकटीच होती. इथलीच ओळख म्हणून पोलिसांनी तिला त्याच्याबद्दल विचारलं होतं; पण तिला काहीच माहिती देता आली नव्हती. केळीची गाडी मागे टाकून काका गेले होते. बेवारस म्हणून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. तिनं काकांची केळीची गाडी ताब्यात घेतली.

बहुतेक टोपलीपेक्षा विक्री वाढली असावी. तिनं परत कधी पैसे मागितले नाहीत. तिची भीड मात्र चेपली होती. हक्कानं ती तिची गाडी रात्री आमच्या गेटच्या आत लावत होती. पाच मिनिटं उसंत काढून आजूबाजूचं सांगत होती. दिवस जात होते. मार्केट यार्डमधून गाडी भरून केळी आणणं, ती हलवणं तिला एकटीला झेपत नव्हतं. नवनवीन फळविक्रेते आमचा फूटपाथ व्यापत होते. तिचा धंदा बसत चालला होता. एक दिवस ती एकटीच दिसली. केळीची गाडी दिसली नाही. “लायसन नव्हतं ना माझ्याकडे, म्हणून पोलिसांनी नेली गाडी” ती खंतावली.

आता तिच्याकडे केळीच नव्हती. त्यामुळे आमच्या भेटीगाठी बंद झाल्या. मला तिचा हळूहळू विसर पडला आणि अचानक ती मला एका वडापावच्या गाडीजवळ दिसली. खाली बसून भांड्यांचा ढीग साफ करीत होती. तिची आशाळभूत नजर तळल्या जाणार्‍या वड्यांवर होती. बहुतेक भांडी घासण्याच्या बदल्यात तिचा पोटापाण्याचा प्रश्‍न सुटत असावा.

मध्यंतरी भूछत्रांप्रमाणे उगवलेल्या या खाद्यपदार्थांच्या अनेक गाड्या हटविल्या गेल्या. “ती” कुठे गेली असेल, असा एक चुटपुटता विचार माझ्या मनात आला आणि लगेचच विरला.

परवा सुटी होती म्हणून कॅम्पातून रमतगमत फिरत होते आणि ती मला रस्त्यावर भीक मागताना दिसली. तिनं मला पाहिलं आणि तोंड चुकवून घाईघाईनं ती त्या गर्दीतून वाट काढत दिसेनाशी झाली. राबणार्‍या हातांचे प्रयत्न कमी पडले होते. कष्टांपासून सुरू झालेला प्रवास भिकेच्या वळणावर आला होता. माझ्या नकळत मी या वळणापर्यंतची साक्षीदार बनले होते.



ऑडिओ लिंक :

 
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )

Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



4 responses to “बाई….. “माणूस” म्हणून: भाग ४४,४५, ४६ डॉ. कल्पना कुलकर्णी”

  1. Very touching , keep writing

    Like

  2. व्यक्तिचित्रण लेखन हा एक प्रभावी साहित्य प्रकार आहे. व्यक्तिचित्रण म्हणजे त्या व्यक्तीचे चरित्र नसून ते त्याचे चित्र असते. हा साहित्य प्रकार म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी असा प्रवास आणि तो तुला छान जमतो कल्पना!

    Like

  3. खूप छान लिहीलय मॅडम !डोळ्यासमोर ती व्यक्तिच उभी रहाते.अस्मिता फडके, पुणे.

    Like

  4. 👌👌👌👌👌👌👌👌

    Like

Leave a reply to Anonymous Cancel reply