बाई….. “माणूस” म्हणून !
विविध भूमिका बजावताना पोळपाट-लाटण्यापासून मायक्रोस्कोप (जो माझ्या व्यवसायाचा अविभाज्य घटक आहे.) पर्यंत वेगवेगळी आयुधं परजवत, घर-संसार, मुलं, नोकरी ही सगळी व्यवधानं लीलया सांभाळली जातात. हे माझ्या एकटीच्याच बाबतीत घडलं, असं नाही. बहुतेक जणींच्या बाबतीत हे असंच घडतं. या सगळ्या घडण्यात काही क्षणच केवळ बाई म्हणून, केवळ आई म्हणून अनुभवले जातात. बाकी सगळे एकत्रच माणूस म्हणून गाठीस जमतात. अर्थात “आई-बाई” हे विश्लेषण त्या अनुभवांनंतरचं असतं. त्यात काही गोड सापडतं, तर काही कडू. असेच हे काही क्षण-काही बाई म्हणून- काही माणूस म्हणून!
ऑडिओ लिंक :
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )
“आई” चं बिरुद
आम्हाला शाळेत केव्हा तरी एक धडा होता, इरावती कर्वेंचा “परिपूर्ती” नावाचा. त्यात इरावती बाईंच्या कर्तृत्वाचा आलेख होता आणि त्याचा शेवट असा होता की त्या रस्त्यानं चालल्यात आणि कुणी अनोळखी मुलगा दुसर्या मुलाला म्हणतो, “ते बघ नंदूची आई चाललीय”, तेव्हा शाळेत त्यावर काय छापील प्रश्नोत्तरं लिहिली-वाचली, ते आता आठवत नाही; पण नावासकट धडा आठवतो.
माझी एक मैत्रीण आणि मी या विषयावर अलीकडेच बोलत होतो. “म्हणजे तुम्ही कोणीही असलात तरी कुणाची तरी आई असणं हीच जीवनाची परिपूर्ती”, असं यातून सूचित होतंय की “आई” असणं हीच जीवनाची परिपूर्ती असं मानणं चुकीचं? वाद बराच रंगला. एकच परिमाण सगळ्यांना लावता येत नाही.
मी “परिपूर्ती” माझ्या परीनं अनुभवली. आई असण्याचा अनुभव हा उत्कट आहेच; पण कस पाहणारा आहे. “आई म्हणून धन्य झाले”, या एखाद्या दुर्मिळ क्षणापेक्षा “कुठून मी ही आई झाले” हीच भावना रोजच्या धकाधकीत जास्त वेळा मनात येते. स्वयंपाक, डबा, कपडे, शाळा, खेळणं, गृहपाठ या सगळ्या आईपणाच्या कामांत जरा उसंतून मला वेगळं “आई” म्हणून अनुभवायला मी “परिपूर्ती” वाचून शिकले. डावं-उजवं न करता मी आता माणूस, बाई, याचबरोबर “आई” हेही बिरुद अभिमानानं मिरवते.
ऑडिओ लिंक :
(आवाज : मृण्मयी माया कुलकर्णी, एडिटिंग: डॉ. अभिजित माळी )


Leave a reply to Anonymous Cancel reply