–
आज अमेरिका,इस्त्रायल – इराण युद्ध असो की रशिया – युक्रेन युद्ध असो, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जिवितहानी, महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि अनेकदा ऊर्जा प्रकल्पाचा नाश, शहरांचा नाश,देशाच्या अर्थव्यवस्थेचा ऱ्हास सोबतच, पर्यावरणीय धोके दिवसेंदिवस वाढतच आहे. हवा व जल प्रदूषण,व मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन निसर्गाला विनाशाकडे नेत आहे.या युद्धांमध्ये दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक एकतर मृत्युमुखी पडले किंवा जायबंदी झालेत. त्याबरोबर युद्धात हजारो नागरिकांचा पण नाहक बळी गेला.
मार्च २०२६ च्या सुरुवातीपर्यंत, युक्रेनमधील युद्धामुळे रशियाला झालेले एकूण आर्थिक नुकसान अंदाजे २.५ ट्रिलियन डॉलर्स असल्याचा अंदाज आहे, ज्याचे मुख्य कारण आर्थिक वाढ, निर्बंध आणि लष्करी खर्च यांचा समावेश आहे. रशियाचा चालू संघर्षाचा दैनिक खर्च ५०० दशलक्ष डॉलर्स ते १ अब्ज डॉलर्स इतका आहे.२०२६ च्या सुरुवातीपर्यंत, युक्रेनसाठी पुनर्बांधणी आणि पुनर्प्राप्तीचा एकूण खर्च पुढील दशकात सुमारे ५८८ अब्ज डॉलर्स असण्याचा अंदाज आहे. केवळ प्रत्यक्ष भौतिक नुकसान १९५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाले आहे, ज्यामध्ये गृहनिर्माण, ऊर्जा आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मार्च २०२६ च्या सुरुवातीपर्यंत, इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, जर संघर्ष सुरूच राहिला तर ५ वर्षांच्या कालावधीत जवळजवळ १ ट्रिलियन डॉलर्स भांडवल आणि अंदाजे ६०० अब्ज डॉलर्सच्या जीडीपीचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मार्च २०२६ च्या सुरुवातीपर्यंत, इस्रायलचा इराणशी असलेल्या लष्करी संघर्षाचा अंदाजे खर्च कामकाजाच्या खर्चाच्या स्वरूपात दर आठवड्याला ३ अब्ज डॉलर्स इतका आहे. फक्त दोन आठवड्यांच्या संघर्षामुळे अंदाजे ५ अब्ज डॉलर्स खर्च झाला, जर संघर्ष वाढला तर खर्च १२ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.
मार्च २०२६ पर्यंत, इराणशी झालेल्या संघर्षामुळे अमेरिकेचे एकूण आर्थिक नुकसान २१० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, त्याचबरोबर या युद्धाचा दररोज अंदाजे १ अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे. या युद्धांमुळे जागतिक तेलाच्या किमती, व्यापार प्रवाह आणि शिपिंग खर्चात लक्षणीय वाढ होईल.
हे तर झाले जीवीत हानी व आर्थिक नुकसानीबाबत. पण पर्यावरणीय नुकसानाचा आघात तर याहून अधिक असणार आहे. एका अभ्यासानुसार,नुसते जागतिक लष्कर जगभरातील उत्सर्जनात सुमारे ५.५ टक्के योगदान देतात,ज्यामध्ये संघर्ष आणि युद्धातून निर्माण होणारे हरितगृह वायू वगळले आहेत, जे नागरी विमान वाहतूक (२ टक्के) आणि जहाज माल वाहतूक,शिपिंग (३ टक्के) यांच्या एकूण योगदानापेक्षा जवळपास दुपटीने जास्त आहे. जर जगातील लष्कर एक देश असता तर ही उत्सर्जनाची टक्केवारी जगातील चौथ्या क्रमांकाची राष्ट्रीय कार्बन फूटप्रिंटची असती.
आत्ताच्या युद्धात विविध प्रकारचे घन व द्रव इंधन युक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात येत आहे. घन आणि द्रव इंधनयुक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वेग व गतिशीलतामध्ये अधिक सरस असले तरी त्यांच्या विल्हेवाटीत पर्यावरणीय सुरक्षिततेचे मोठे आव्हान आहे. दोघांनाही नष्ट करण्यासाठी विशेष महागड्या प्रक्रियांची आवश्यकता असते.तसेच याने विमानतळे, इंधन डेपो, शस्त्रास्त्र साठवणूक आणि उत्पादन स्थळांना लक्ष्य केल्याने ते अधिक धोकादायक ठरत आहेत.क्षेपणास्त्रांमुळे होणाऱ्या विशेषतः धोकादायक प्रदूषकांमध्ये ॲल्युमिनियम ऑक्साईड, ब्लॅक कार्बन (काजळी) कण आणि वायूजन्य प्रतिक्रियाशील नायट्रोजन आणि क्लोरीन यांचा समावेश आहे. हे वायू फुफ्फुसांना जळजळ, श्वसनाचे आजार आणि पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. या पदार्थांमध्ये ओझोन थर कमी करण्याची क्षमता असते.

युध्दात इंधन डेपोच्या आगींमुळे विषारी पदार्थांचे मिश्रण तयार होतात,ज्यात कण,नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन मोनोऑक्साइडपासून ते फॉर्मल्डिहाइड आणि संभाव्यतः डायऑक्सिन्स आणि हायड्रोकार्बन्स सारखे अस्थिर सेंद्रिय संयुगे असतात.वाऱ्याच्या प्रवाहात, हे माती आणि जलसाठे दूषित करू शकतात. गॅस प्लांटसह गॅस पायाभूत सुविधांना झालेल्या नुकसानामुळे लक्षणीय मिथेन उत्सर्जनाचा धोका देखील निर्माण होतो,जो एक शक्तिशाली,अल्पकालीन हरितगृह वायू आहे.
आताची युद्धे तेलाने समृद्ध असलेल्या देशात होत असल्याने जहाजे व तेल पाइपलाइन फुटल्यास, समुद्रात तेल पसरेल व सागरी जीवांचा,जसे मासे,कासव व दुर्मिळ सागरी जीव सारखे जल प्राणी मृत्युमुखी पडतील. आखाती देशात समुद्राचे पाणी शुद्ध करून ते पिण्यासाठी वापरण्यात येते. तेल गळतीमुळे हे जलशुद्धीकरण प्रकल्प बंद पडू शकतात.पाण्याची भीषण समस्या निर्माण होऊ शकते.अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यास त्यातून निघणारा किरणोत्सर्गी कचरा हवा व पाण्याव्दारे शेकडो किलोमीटर पर्यंत पसरू शकतो. हे मानवी आरोग्यासाठी जसे कॅन्सर, जनुकीय बदल इत्यादी आणि जमिनीच्या सुपीकतासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. हे पदार्थ हजारो वर्षे किरणोत्सर्गी आणि आरोग्यासाठी घातक राहू शकतात.
सध्याच्या युद्धात वापरले जाणाऱ्या टॉक्सिक बॉम्बमध्ये (ग्लायफोसेट) घातक रसायने पिकांचा नाश करतात. यामुळे पाणीही पूर्णपणे दुषित होते. युध्दातील हवाई बॉम्बहल्ला खडक, कॉक्रीट व धातूवर आदळल्याने, जड धातू, संभाव्य किरणोत्सर्गी अवशेष आणि विषारी आम्लयुक्त कण मिसळलेले धुळीचे ढग तयार होतात. नंतर जेव्हा ते जमिनीच्या पृष्ठभागावर जमा होतात,जमीनीची सुपीकता कमी होते व भूजल वापरासाठी असुरक्षित होते. त्यामुळे एकेकाळी शेतीयोग्य किंवा राहण्यायोग्य असलेल्या क्षेत्रांना वर्षानुवर्षे पर्यावरणीय उपाययोजनांची आवश्यकता भासू शकते.
या यूध्दांमुळे होणाऱ्या लाखो टन कार्बन उत्सर्जनामुळे जागतिक तापमान वाढीत भर पडते.यामुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होते. चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, ढगफुटी व उष्णतेच्या लाटांसारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागते.अनेक भागात पाणी टंचाई निर्माण होते. नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्याने प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती लुप्त होतात.हवामान बदलामुळे पिकांचे नुकसान होऊन अन्नधान्याची टंचाई निर्माण होते. मनुष्याच्या आरोग्यावर विपरीत होतात. एकंदरीत, युध्दाचे आर्थिक,शारीरिक, मानसिक व सामाजिक विपरीत परिणाम सद्यपरिस्थितीत सर्वांनाच भोगावे लागतात. येणाऱ्या पिढ्यांना पण त्यांचे दुष्परिणाम भोगावे लागतील,हे कटू सत्य नाकारता येत नाही.

प्रा डॉ संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य,
विदर्भ वैधानिक विकास मंडळ.
मोबाईल क्रमांक:
7276614260

Leave a comment