–
दहावीची परीक्षा झाली आणि रेणू मामाकडे सुटीसाठी आली.दहावीचे वर्ष खूप अभ्यासात गेले होते. त्यामुळे नुसती मज्जा-मस्ती- खेळ खेळायचे, असे तिने ठरवले होते. खूप झोपायचे, मस्त जेवण करायचे आणि भरपूर फिरायचे हा तिचा प्लान होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली ती आरतीमुळे. मामी देवाची आरती, पूजा करीत होती. आवाजाच्या दिशेने तीची पावले देव घराकडे वळाली आणि नकळत ती आरती म्हणू लागली.

“मामी ही कसली रांगोळी काढली आहे? मला या रांगोळीचा अर्थ सांग की”, रेणूने मामीला विचारले.
“अग, या रांगोळीला चैत्रांगण म्हणतात. ही चैत्र महिन्यात काढली जाते. या रांगोळीत सर्व शुभचिन्हे वापरली आहेत. मी तुला सांगते”, असे म्हणत मामी तिला समजावू लागली.
घर सजावटीची शुभ चित्रे:
घर: आपले निवास स्थान,
तोरण: मंगलकार्यातव सणासुदीला दारावर लावतात,
भारतीय वंशातील वृक्ष दीर्घायुषी आहेत. आंबा, वड, पिंपळ, चिंच, अवदुम्बर,आवळा इ. म्हणून काढली जातात.
बाकी आपली नेहमीची शुभचिन्हे असतातच.. जसे स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, || श्रीराम प्रसन्न ||, गोपद्म,ओम, तुळशी वृंदावन, बोडणाची रांगोळी, धैर्याचे प्रतीक पणती, कलश मांगल्याचे !
देऊळ / देवी देवता यांची प्रतीक चित्रे रेखाटतात..
देऊळ :आराध्य देवतेसाठी,
समयी: शांततेचे प्रतिक,
विठ्ठल रखुमाई,
सरस्वती: विद्येची देवता,
गणपती : विघ्ननाशक,
मयूरपंख / बासरी (कृष्ण),
गाय.वासरू : वात्सल्याचे प्रतीक,
शिवलिंग अर्थात आदिशंकर भगवान.
आनंददायी प्रतिक चिन्हांचाही समावेश करतात:
गुढी, ध्वज, सनई व चौघडा : मांगल्याचे प्रतीक.
ग्रह नक्षत्रे :
चंद्र.-शीतलतेचे प्रतीक. तारका, सूर्य- तेजाचे प्रतीक.
प्राणी / पक्षी:
कासव: संपत्ती.कुबेराचे वाहन,
गाय–वासरू : वात्सल्याचे प्रतिक,
नाग-नागिन : प्रेम भावनेचे प्रतिक,
हत्ती –अंबारी: वैभव दर्शवते.
गरूड.-विष्णूचे वाहन
शस्त्र आयुधे : शत्रूचा संहार करण्यासाठी.
शंख, चक्र, गदा, खडग, डमरू ,धनुष्य बाण, त्रिशूळ.
गौरी साठी शृंगार:
आरसा, हळदी कुंकू, खण, श्रीफळ, साडीचोळी.
झोपाळा -.विश्रांतीचे स्थान.
फळे/ फुले /वनस्पती:
कमल : लक्ष्मीचे प्रतीक,
तुळस : औषधी वनस्पती,
सहस्त्र कमळ,
फळे (आंबा केळी) : आरोग्यासाठी उत्तम
अशी पंचमहाभूतांची प्रतिकात्मक चिन्ह लिपीद्वारे पूजा केली जाते,” रेणू आश्चर्याने बघत होती.आणि प्रत्येक चिन्हाचा अर्थ समजून घेत होती.न राहून ती म्हणाली. “मामी म्हणजे ही तर पर्यावरणातील चिन्हे झालीत, असे मला वाटते. बरोबर आहे का?”
“अगदी बरोबर. हुशार आहेस बरं का ! ”, मामीने शाब्बासकी दिली.
“वर्षाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून होते. झाडांना नवीन पालवी फुटते. मोहोर येतो. सर्व सृष्टीचे स्वागत नको का करायला? म्हणून अशी रांगोळी काढतात. सृष्टी खूप संवेदनशील आहे. रेणू, अगं तुला माहिती आहे का? पिंडी ते ब्रह्मांडी अशी म्हण आहे.अगं, जे पंचभूतांचे तत्व सृष्टीत आहे ते आपल्या शरीरात आहे. मग सृष्टीचे स्वागत करायला नको का? सृष्टीतील फळे,फुले हे प्रतिकात्मक काढली जातात. तसेच प्राणी, पक्षी हे सुद्धा जीव चेतन आहेत. त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करायला हवी ना ? उत्सवाने वर्षाची सुरुवात केली की संपूर्ण वर्ष चांगले जाते. सृष्टीतील मनुष्यप्राणीच फक्त आपल्या भावना व्यक्त करू शकतो. प्रत्येक चेतना म्हणजे प्राणी, पक्षी, वनस्पती यांना पण आपल्या सारख्याच भावना असतात. तुला संगीत आवडते ना? तसेच झाडांनासुद्धा संगीत आवडते.आणि त्याची वाढ जोमाने होते. ही प्रार्थना सृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी आहे”, मामीने सांगितले.
“मामी, या रांगोळीत देवदेवतांची सुद्धा चित्रे काढली आहेत, ती का?” रेणूने विचारले.
“या संपूर्ण सृष्टीवर त्या परमेश्वराची सत्ता आहे. त्यांच्या आशीर्वादा शिवाय झाडाचे एक पान पण हालत नाही. किंवा कोणतीच गोष्ट होत नाही.सृष्टीच्या संरक्षणासाठी भगवंताला विनंती करायला हवी ना?”, मामी उवाच.
“मामी, मला मराठीतील ‘वसन्त हृदय चैत्र’ हा धडा आठवला.हा धडा दुर्गा भागवत यांनी लिहीला आहे. या धड्यात त्या म्हणतात. प्रत्येक ऋतूला आपापला स्वभाव असतो. निसर्गाच्या विविध रूपांतून तो प्रतिबिंबित होतो. अगं विशेष म्हणजे या पाठातून चैत्राचे मनोहारी दर्शन आपल्याला घडते.” रेणू विचारात मग्न झाली होती.
“वसंत ऋतूची चाहूल. खरोखरच मनोहरी असते. यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे म्हणजे सर्वार्थाने आनंददायी उत्सव असतो. मराठी महिने फाल्गुन, चैत्र आणि वैशाख, हे तीन महिने वसन्त ऋतूचे आहेत. त्यातील चैत्र वसंताचा आत्मा आहे. मधुमास आहे. या ऋतुराजाचे वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा केले आहे. रसाळ फळे व फुलांचे सौंदर्य मनाला मोहवून टाकतात. या ऋतूत भारतीय वंशाचे वृक्ष जसे पिंपळ, वड, चिंच, आंबा, फणस मोहरतात आणि विविध रंगाच्या फुलांनी सृष्टी बहरते. हिरवागार गालिचा सृष्टीवर पसरला आहे असे वाटते. आणि त्यावर रंगीत फुलांची शोभा अधिकच वाढते. सृष्टीतील रूप, रंग, रस, गंधयुक्त अशी शोभा झाडावरील पक्ष्यांच्या बांधलेल्या घरट्यानी पूर्णत्वाला येते. ही घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतील सुंदर विरामचिन्हे वाटतात.”, मामीने तिला समजावले.
“मामी, तू काढलेल्या रांगोळीतील चिन्हाचा अर्थ बोध मला आता लागला. अगं, मी जेव्हा गाणी गाऊन झाडांना पाणी घालते तेव्हा झाडे खूप बहरतात. मी आता नेहमी पर्यावरणाशी मित्रत्वाने वागेल व सृष्टीचे संरक्षण करेल. थॅंक यू मामी, ही वसन्त चित्रलिपी खऱ्या अर्थाने समजली”. एक पूर्ण समाधान रेणूच्या चेहेऱ्यावर दिसत होते.
– सौ. रत्ना कुलकर्णी.


Leave a comment