–

खूप दिवसांनंतर सुंदर मराठी पुस्तक हाती आले आणि सलगपणे बसून वाचण्याचा योगही आला. जंगल आणि प्राणिसृष्टी वरची पुस्तके हाती आली की आपसूक फडशा पाडला जातोच !
“The Elephant Whisperer” ही लॉरेन्स अँथनी यांची कहाणी म्हणजे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याची विलक्षण साक्ष. लॉरेन्स यांनी प्रत्यक्ष अनुभवलं, जगलं आणि जपलं ते निसर्गाशी असलेलं अतूट नातं. त्यांच्या आफ्रिकेतील ‘थुला थुला’ रिझर्व्हमध्ये आलेला हत्तींचा कळप—जंगली, दुखावलेला, माणसांवर पूर्ण अविश्वास ठेवणारा असतो. या हत्तींच्या भूतकाळात माणसांनीच त्यांना दिलेल्या शारीरिक आणि मानसिक जखमा अत्यंत खोल अशा असतात. अशा या हत्तींचा विश्वास संपादन करणं म्हणजे लॉरेन्ससाठी ‘मॅनेजमेंट स्किल’ नव्हते तर करुणा, शांतता आणि प्राणिमात्रांविषयीची नि:स्वार्थ प्रेमभावना यांचा त्यांनी संयमाने वापर केला. ज्या ठिकाणी गेल्या शतकभरात हत्तीचे पाऊल पडले नव्हते तिथे त्यांनी ही प्रजाती हिमतीने रुजवली. त्यांनी हत्तींचे नैसर्गिक स्वातंत्र्य जपतांना त्यांना अनेक क्लुप्त्या वापरून शांत कसे केले हे वाचणे खूपच रंजक आहे.
लॉरेन्सच्या शांत, स्थिर आणि प्रेमळ वागणुकीने त्या हत्तींच्या मनातील भीती हळूहळू वितळत गेली आणि ते मग रिझर्व्ह मध्ये अनेक वर्षे समृद्ध जीवन जगले, त्यांची संख्याही वाढली. शब्दांशिवाय होणारा संवाद, केवळ नजरेतून आणि हावभावातून वाढत गेलेली परस्परांची ओळख आणि कालांतराने निर्माण झालेला विश्वास — हे अनुभव वाचताना जणू तुम्ही त्या रिझर्व्हमध्ये उभे आहात आणि त्या क्षणांचा साक्षात्कार घेत आहात असं वाटतं. माणूस आणि इतर प्राण्यांमध्येही अशा पातळीवरचा भावनिक संवाद शक्य असतो, हे लॉरेन्सच्या आयुष्याने सिद्ध करून दाखवलं आहे.

इराक युद्धादरम्यान त्यांनी केलेलं प्राणीरक्षण. २००३ साली इराकमध्ये युद्ध पेटलं आणि त्या गोंधळात बगदाद झू अक्षरशः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होता. गोळीबार, बॉम्बस्फोट, लूटमार—या सर्वांच्या फेर्यात प्राणीसंग्रहालयातील अनेक प्राणी मृत्युमुखी पडले, तर उरलेले जिवंत प्राणी भूक, तहान आणि भीतीच्या छायेत झुंजत होते. या परिस्थितीत अतिशय धोकादायक आणि अनिश्चित वातावरणात लॉरेन्स अँथनी स्वतः बगदादमध्ये पोहोचले. त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार न करता, त्यांनी केवळ करुणा आणि कर्तव्यभावनेने या प्राण्यांना वाचवण्याची धडपड केली. त्यावेळी प्राणीसंग्रहालयात ना कर्मचाऱ्यांची उपस्थिती, ना अन्नपाण्याची सोय होती — सर्व काही कोलमडून गेलं होतं. पण लॉरेन्स यांनी हे वास्तव स्वीकारून हार मानली नाही. त्यांनी स्थानिक लोकांचा, अमेरिकन सैन्याचा आणि प्राणीप्रेमींचा सहयोग घेत झू पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न सुरू केला. पिंजर्यातील सिंह, वाघ, अस्वल, शहामृग आणि विविध पक्ष्यांना त्यांनी अन्न व पाणी मिळवून दिलं. गोळीबार अजूनही सुरू असतानाही ते निर्भयपणे झूच्या जागोजागी जात, प्राण्यांची काळजी घेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक प्राणी जिवंत राहिले—जे अन्यथा त्या गोंधळात नष्ट झाले असते.
आपल्या कामात चिकाटीने लढा, प्राण्यांना वाचवण्याची अखंड तळमळ आणि एकाच आयुष्यात अनेक प्राणीमात्रांना दिलेलं जीवदान — हे सर्व वाचताना मन कधी थरारून जातं तर कधी त्यास उमेद मिळते. जीवसृष्टीकडे केवळ अभ्यासाच्या किंवा संवर्धनाच्या दृष्टीने नाही, तर आत्मीयतेने, आपलेपणाने पाहायला त्यांनी शिकवलं आहे. हे पुस्तक एक साधं कथन नाही, हा अनुभव आहे—माणसाने मनापासून आणि निस्वार्थ भावनेने जर निसर्गाला प्रेम दिलं तर निसर्ग त्याच्या हजारपट प्रेमानं त्याला जवळ करतो, याचा पुरावा आणि हाच संदेश पुस्तकाच्या प्रत्येक पानावर उमटलेला आहे.
पुस्तक अप्रतिम आहे. श्री, मंदार गोडबोले यांचे या अनुवादाबद्दल आभार ! अवश्य वाचावे !!

सौ. रुपाली दिपक कुलकर्णी,
टीम अल्पारंभ

Leave a comment