–

आज आपण एक अशी कथा वाचणार आहोत जी आपल्याला दाखवते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी, मेहनतीने आणि इच्छाशक्तीने आपले स्वप्न पूर्ण करता येऊ शकतात. ही कथा आहे पुण्यातील एका १२ वर्षांच्या मुलीची — अदिती पार्थेची.
अदिती पार्थे पुणे जिल्ह्यातील भोर तालुका, निगुडाघर येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी विद्यार्थिनी आहे. ती दररोज सकाळी सव्वा तीन किलोमीटर चालत शाळेत जाते आणि तशीच संध्याकाळी घरी परतते. तिच्या घरात आधुनिक सुविधा नाहीत — ना तिच्या शाळेत संगणक किंवा स्मार्टफोन. तिचे वडील आणि मामा दोघेही पुण्यात मार्केट यार्डमध्ये काम करतात. तरीही कधी अगदी ट्रेनचा प्रवासही न केलेली आदिती लवकरच जाणार आहे अमेरिकेत नासाला भेट देण्यासाठी !!
जिल्हा परिषद आणि Inter‑University Centre for Astronomy and Astrophysics (IUCAA) यांच्या सहकार्याने, ६वी आणि ७वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांमधून एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. एकूण १३,६७१ विद्यार्थ्यांतून केवळ २५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली ज्यापैकी एक आहे अदिती. तिला आता अमेरिकेतील प्रसिद्ध अंतराळ संस्था NASA चा दौरा करण्याची संधी मिळणार आहे.अदिती ज्या ठिकाणी राहते त्या छोट्या गावात बहुतेक लोक मजुरीसाठी पुणे किंवा मुंबईकडे स्थलांतर करतात. शाळेचे मुख्याध्यापकांनी सांगितले की, “डोंगराळ भागात शाळा चालवणं अवघड असतं. मुसळधार पावसात पूलावरून पाणी वाहतं आणि शाळेचं उपस्थिती कमी होते.” अशा परिस्थितीतून मार्ग काढत अदितीने यश मिळवलं आहे. तिला इंग्रजी समजते, पण ती बोलायला अजून शिकते आहे. नासाच्या या दौऱ्यापूर्वी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जाणार आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितले की, गावांतील विद्यार्थ्यांनाही मोठं स्वप्न पाहता यावं म्हणून आम्ही नासा आणि इस्रोच्या भेटी आयोजित केल्या आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.या दौऱ्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना तातडीचा पासपोर्ट मिळवून देण्यात आला असून अमेरिकन व्हिसासाठी प्रक्रिया सुरू आहे.

अदितीची ही कहाणी आपल्याला प्रेरणा देते की आपल्याकडे काही कमी असेल तरीही, आपली इच्छाशक्ती आणि मेहनत आपल्याला मोठे स्थान मिळवून देऊ शकतात. अशा प्रेरणादायी उदाहरणांमुळे अनेकांना पुढे येण्याची हिंमत मिळते. अदितीच्या पुढील प्रवासासाठी, प्रगतीसाठी टीम अल्पारंभाकडून शुभेच्छा !!
टीम, अल्पारंभ फाउंडेशन


Leave a comment