–
‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील २५ गोष्टी बाजूला काढल्या गेल्या. पुढील परीक्षणाचे काम राजीव तांबे आणि शुभदा चौकर यांनी केले. त्यातील विजेत्या / उल्लेखनीय कथा , तुमच्यासाठी !!

अमृता धावत घरी आली. खूप चिडलेली दिसत होती. पाय आपटत ती तिच्या खोलीत गेली. नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी मी मागे गेले, तर अमृता पायांमध्ये डोकं खुपसून बसली होती.
“अमृता, अगं काय झालं? खेळायला गेली होतीस ना?”
“आता मी जाणार नाही खेळायला.”
“का गं, काय झालं?”
“अगं, श्रेया व तिच्या त्या दोन आगाऊ मैत्रिणी आहेत ना….”
“अगं, पण तुझ्या पण मैत्रिणी आहेत ना? असं बोलायचं का ?”
“हो आहेत ना, पण त्या मला चिडवतात. ‘चपट्या नाकाची, चपट्या नाकाची’ असं सारख म्हणत असतात.”
“असं होय … (हा..हा …)”
“तू पण हसतेस, जा मी बोलणारच नाही तुझ्याशी.”
“माझ्या बाळा, मी तुला नाही हसले. ज्या कारणावरून तू चिडलीस ना, त्याला हसले. मला सांग नाकाचा उपयोग काय आहे?”
“श्वास घेण्यासाठी.”
“बरोबर, मग मला सांग तुझ्या दादाचं नाक चिरेदार आहे व तुझं चपटं आहे, तर त्याला श्वास घेता येतो आणि तुला घेता येत नाही असं काही आहे का?”
“नाही आई.”
“नाही ना? मग का चिडतेस? नाक लहान असो, चपटं असो, चिरेदार असो, की धारदार असो, अगदी पोपटासारखं नाक असेल तरी त्याचं काम ते करतंच ना? मग आपण का चिडायचं बाळा? तुला माहीत आहे, मी जेव्हा लग्न करून या घरी आले तेव्हा तुझी आजी सारखं म्हणायची ‘माझ्या मुलाचं नाक एकदम सरळ आहे बरं अगदी माझ्यासारखं! पण सुनेचं नाक नाही तसं.’ मला सुरुवातीला वाईट वाटायचं. पण आता नाक तर काही बदलून मिळणार नाही ना! मग सारखं उदास होण्यापेक्षा मी त्यांच्या बोलण्याकडे कानाडोळा केला. नंतर तुझा दादा झाला. तुझ्या दादाचं नाक एकदम चिरेदार. त्याच्या नाकाचं सर्वजण कौतुक करायचे. तुझी आजी म्हणायची, ‘माझ्या नातवाने माझ्यासारखंच चिरेदार नाक घेतलं. बरं झालं बाई.’ तेव्हा मला त्यांचा राग यायचा. पण त्या मोठ्या असल्यामुळे मी काही बोलायचे नाही. मग तू आलीस छोटीशी परी. पण तू माझ्यासारखंच चपटं नाक घेऊन आलीस. तेव्हा आजी म्हणाली, ‘माझ्या नातवासारखं नाक नाही हिचं.’ ती कधीकधी तुला ‘चपट्या नाकाची’ म्हणायची. मी एक-दोनदा ऐकलं आणि आजीला म्हटलं, “आई, नाकाचं काम हे श्वास घेण्याचं आहे, आणि माझ्या मुलीला व मला ते उत्तम करता येतं. त्यामुळे ते चपटं काय किंवा चिरेदार काय! उगाच कशाला त्याचा अट्टहास करायचा?”
“अगं, आपण कसे दिसतो त्यापेक्षा आपण कसे वागतो यावर भर द्यायचा बरं. शारीरिक सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य महत्त्वाचं आहे.” तशी अमृता आईला बिलगली.
“अमृता आपण एक गंमत करू या. आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे. मराठी भाषेत नाकाला महत्त्व आहे. नाकावर जितके वाक्प्रचार आहेत ते आपण आठवूया. तू तुला येत असतील ते वाक्प्रचार सांग आणि मी तुला सांगते. आपण या आताच्या प्रसंगाला धरून बोलू या. अमृता आजही तुला कारल्याची भाजी दिली की तू नाक मुरडतेस.’’
“हो आई, मला नाही आवडत कारल्याची भाजी.”
“तुला मैत्रिणीनीं चिडवलं तर तुझ्या नाकाला मिरच्या झोंबल्या. आणि तू तरातरा घरी आलीस. आमच्या लाडोबाच्या नाकावर राग आहे.”
“आई, मी काय करू त्या सारख्या चिडवतात. मग माझ्या नाकीनऊ येतात.”
“पण त्या जरी तुला चिडवत असतील तरी आपण नाही बरं लक्ष द्यायचं. उलट त्यांना समजवायचं की असं कोणाला चिडवायचं नाही. ”
“हो आई, मी सांगेन त्यांना आणि हे सुद्धा सांगेन की माझं नाक मला प्रिय आहे. आणि आता येऊ दे नाक घासत, प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी माझी मदत मागायला.’’
“अमृता असं नाही बोलायचं आणि तू प्रकल्प छान करतेस. तुझ्याकडे छान छान कल्पना असतात. त्यामुळे तुझ्याकडे येतात त्या. आपल्या हुशारीचा वापर दुसऱ्यांना देखील व्हायला हवा ना.”
“हो आई, पण त्या मला चिडवतात ना.”
“अमृता, आपण आपल्या वागण्याने सर्वांना जिंकायचं.”
“बाळा, नेहमी लक्षात ठेवायचं, दुसऱ्यांना चिडवायचं म्हणजे कसं असतं बघ- ‘जो हसे लोकांना शेंबूड त्याच्या नाकाला’ असं त्या लोकांचं होतं.”
तेवढ्यात दादा आला.
“काय चालू आहे दोघींचं?”
“दादा, आमच्या बोलण्यात नाक खुपसू नकोस.”
“असं, नाक खुपसू नको काय?”
“अरे दादा, आमचं नाकावर कोणकोणते वाक्प्रचार आहेत, त्यावर बोलणं चालू आहे.”
“अच्छा, चालू द्या तुमचं.”
“अमृता, तुलासुद्धा नाकावरचे बरेच वाक्प्रचार येतात. आता मला एक सांग, त्या वाक्प्रचारांमध्ये चपट्या नाकाचा उल्लेख आहे का?”
“नाही.”
“म्हणजे तुला कळलं का नाक महत्त्वाचं आहे. ते चपटं आहे की चिरेदार, हे महत्त्वाचं नाही.”
“हो आई, मी आता नाक वर करून मैत्रिणींना सांगेन की मला माझ्या नाकाचा अभिमान आहे.”
शाब्बास बेटा!
-सारिका नि. चौधरी

Leave a comment