।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


मी विजेता!

‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील २५ गोष्टी बाजूला काढल्या गेल्या. पुढील परीक्षणाचे काम राजीव तांबे आणि शुभदा चौकर यांनी केले. त्यातील विजेत्या / उल्लेखनीय कथा , तुमच्यासाठी !!

अंकित रिक्षातून उतरला आणि घराकडे धावत सुटला. बॉक्सिंगच्या विजेतेपदाची ट्रॉफी त्याने छातीशी घट्ट धरली होती. कानपूरला झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत, १३ ते १५ वर्षांच्या सब-ज्युनिअर गटात त्यानं नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली होती. स्पर्धेला येऊ न शकलेल्या आईबाबांना ती ट्रॉफी आणि सुवर्णपदक कधी दाखवतो, असं झालं होतं त्याला.

बंगल्याच्या कंपाउंडचा दरवाजा उघडून तो आत गेला. दारावरचं कुलूप त्याच्या स्वागताला हजर होतं. संध्याकाळ टळून गेली होती. घरातल्या बागेतल्या नारळाच्या उंच सावल्या घराच्या भिंतीवर नाचत होत्या. त्या झावळ्यांचा नाच पाहून अंकितच्या पायातलं बळ निघून गेलं. त्याच्या हातांना घाम फुटला. हातातली ट्रॉफी खाली निसटू लागली. खांद्यावरची प्रवासी बॅग छातीवर ओघळली.

मुष्टियुद्धामध्ये अंकित राष्ट्रीय विजेता होता. शेवटच्या सामन्यात त्याने पंजाबच्या धिप्पाड प्रतिस्पर्ध्याला चारच ठोशात नॉकआऊट केलं होतं. शरीरानं दणकट असलेला चॅम्पियन अंकित, अंधाराला मात्र घाबरायचा.

अंकित तीन वर्षांचा असताना, एका संध्याकाळी तो गाढ झोपला होता. त्याला न उठवता, घरात एकट्याला ठेवून, आई भाजी आणायला मंडईत गेली. तिला यायला उशीर झाला. इकडे अंकित जागा झाला, तेव्हा सगळीकडे गच्च अंधार झाला होता. रस्त्यावरच्या गाड्यांच्या दिव्यांनी खिडकीच्या पडद्यांच्या सावल्या भिंतीवर पडल्या होत्या. त्या सावल्या अंकितला राक्षसासारख्या वाटल्या. तो घाबरला आणि मोठमोठ्यानं रडू लागला. त्या दिवसापासून रोज रात्री खोलीतले पडदे हलले, दूरच्या दिव्यांच्या उजेडानं सावल्या हलू लागल्या की, त्याचं सारं अंग थरथरू लागायचं आणि मग डोक्यावर पांघरूण घेऊन तो निपचित पडून राहायचा.

घराच्या पायऱ्यांवर अंकित बसून राहिला, डोळे घट्ट मिटून. थोड्या वेळानं त्याचे आईबाबा आले. हातातली ट्रॉफी आणि सुवर्णपदक त्यांना दाखवताना, डोळ्यांच्या कोपर्‍यातून त्याला झाडांच्या सावल्यांचं नृत्य दिसत होतं. बाबांनी त्याची पाठ थोपटली, आईनं छातीशी धरून त्याचा गालगुच्चा घेतला, तरी त्याच्या हृदयाची धडधड थोडीसुद्धा कमी व्हायचं नाव घेत नव्हती.

रात्री जेवणानंतर अंथरुणावर पडून तो आकाशाकडं पाहात राहिला. आकाशात असंख्य तारे चमकत होते, त्यांच्या मंद प्रकाशाने खोलीतली पदकं आणि चषक उजळून निघाले होते.

“का वाटते मला ही भीती? काय करू मी ही भीती घालवायला?” अंकितच्या मनात विचारचक्र भिरभिरत राहिलं. त्याला स्वतःचाच राग आला. क्षणभर वाटलं, उठावं आणि खोलीतल्या पंचिंग बॅगवर पाच-पन्नास गुद्दे हाणावेत, म्हणजे भीती जाईल. पण बर्फासारखे थंड पडलेले पाय तसूभरही हलायला नकार देत होते.

दोन दिवसांनी अंकितच्या शाळेत पालकसभा होती. मुलांच्या अभ्यासातल्या प्रगतीवर चर्चा झाल्यावर मुख्याध्यापक उभे राहिले. “मुलांच्या सर्वांगीण विकासात मानसिक आरोग्य महत्त्वाचे असते. रोजच आमच्या लक्षात येतंय, की शाळेतल्या मुलांमध्ये मानसिक तणाव वाढतायत. मुलांच्या मनावरील ताणतणाव, चिंता, निराशा आणि भीती दूर करण्यासाठी, आम्ही एका समुपदेशकाची नियुक्ती करत आहोत. कांचन हिरवे या मानसविकार तज्ज्ञ दर सोमवारी कार्यशाळा घेऊन, मुलांचं समुपदेशन करतील. आजची पालकसभा संपल्यावर तुम्ही नावनोंदणी करू शकता.” टाळ्यांच्या गजरात मुख्याध्यापक खाली बसले. अंकितच्या आईने ताबडतोब त्याचं नाव नोंदवलं.

पुढच्या सोमवारी अंकित शाळेच्या ऍक्टिव्हिटी रूममध्ये होता. त्याच्यासोबत इतरही काही  मुलं होती. स्तब्ध बसलेल्या त्या साऱ्यांच्या चेहर्‍यावर कुतूहल, चिंता आणि भीतीचं एक अजब मिश्रण विखुरलं होतं.

तिशीच्या आत दिसणाऱ्या कांचन मॅडम, एकेका मुलाकडे बघून मान हलवत स्मितहास्य करत होत्या. “गुडमॉर्निंग. तुम्हां सर्वांचं स्वागत! तुम्हांला रोज जे त्रास होतात ना, त्यांच्यावर  नियंत्रण ठेवण्याचे मार्ग आपण शोधणार आहोत.”

 एकेकाला बोलवून त्या प्रत्येक मुलाशी काही बोलत होत्या. त्यांना कागद आणि रंगीत पेन्सिली देऊन काही सूचना देत होत्या. अंकितशी बोलून झाल्यावर त्याला कागद आणि पेन्सिली देत, त्याच्या डोळ्यांत खोलवर बघत त्यांनी सांगितलं, “तुझ्या भीतीचं चित्र काढून दाखव.”

 अंकित संकोचला. पण कागद समोर ठेवल्यावर त्याला जाणवलं की, त्याचा हात आपोआपच हालचाल करतोय. रोज रात्री खोलीत त्रास देणाऱ्या सावल्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या काळ्या रेषांची एक मालिका त्यानं रेखाटली. चित्र काढताना त्याला खूप छान वाटत होतं. खळबळणाऱ्या मनात एक अनोखी शांतता पसरल्याचं जाणवलं. कागदावर सावल्या उतरवताना त्याच्या लक्षात आलं की, त्या रोजसारख्या प्रबळ नाहीत. त्या शक्तिहीन होत चालल्या आहेत.

अंकितचं चित्र पाहिल्यावर कांचन मॅडमने त्याला सांगितलं, “आता असं काहीतरी काढ, की जे पाहिल्यावर तुला सुरक्षित वाटतं.”

काही क्षण अंकित विचारमग्न झाला आणि चित्र रेखाटू लागला. कानपूरच्या स्पर्धेमध्ये फायनल सामन्याच्या आदल्या रात्री सर्व स्पर्धकांनी पेटवलेला कॅम्पफायर त्याच्या कागदावर उमटला. त्या ज्वाळांनी त्याला उबदार वाटू लागलं. छातीची धडधड कमी झाली. त्या धगधगत्या आगीला दोन्ही बाजूंनी प्रहार करणारे बॉक्सिंग ग्लोव्हज त्याने चितारले.

कार्यशाळेतून घरी येताना आपल्या नकारात्मक विचारांच्या सावल्यांना, लालबुंद कॅम्पफायरने भस्म करून टाकल्याची जाणीव त्याला झाली. त्या संध्याकाळी त्याने खोलीच्या छतावर अंधारात चमकणारे तारे आणून लावले. त्याच्या बिछान्याच्या वरती एक छोटी आकाशगंगाच तयार झाली. त्या तारकांना एक सौम्य उबदार प्रकाश होता- कॅम्पफायरसारखा. समुपदेशनाच्या वेळी काढलेलं कॅम्पफायरचं चित्र खिडकीला लटकवलं.

दर सोमवारी अंकित कार्यशाळेत जात राहिला. त्याच्यातला बदल पाहून कांचन मॅडम त्याचं कौतुक करायच्या. त्याला नवनव्या कल्पना सुचवायच्या. अंकितच्या इतर मित्रांवरही समुपदेशन कार्यशाळेचे परिणाम दिसू लागले. परीक्षेची चिंता, आई-वडिलांच्या अपेक्षापूर्तीचे दडपण, मित्रांच्या बोलण्यातून आणि चिडवण्यातून मनाला झालेल्या वेदना… सारं कुठच्या कुठे पळून गेलं. दहावीत नापास झालेल्या एका मुलानं स्वतःला संपवण्याच्या प्रयत्न केला होता. तोही नव्या उमेदीनं अभ्यासाला लागला.

कांचन मॅडम मुलांना म्हणायच्या, “जीवन खूप सुंदर आहे. आयुष्यात चिंता, मनस्ताप, दुःख कुणालाच चुकलेलं नाही. समोर उभ्या ठाकलेल्या समस्यांना सामोरं जा. त्यांना घाबरून पळून जाऊ नका…त्यांच्याशी दोन हात करा. मगच तुम्हांला आत्मविश्वास येईल की तुम्ही त्यांच्यावर मात करू शकता. तुम्ही जिंकू शकता.” 

अंकित आता झोपायला जातो, तेव्हा सावल्या भिंतींवर नाचत असतात. पंचिंग बॅगवर तो एकच ठोसा मारतो आणि त्या सावल्यांना चारी मुंड्या चीत करून टाकतो. त्याला आजही जाणवतं की, भीतीची भावना कधीही पूर्ण नाहीशी होऊ शकत नाही, पण आता त्या सावल्याच त्याला विनवतात, “आम्ही हरलो. तू जिंकलास.”


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment

अल्पारंभाविषयी अधिक माहिती:

Our Officlal Website

 ई-मेल:alparambha@gmail.com

दुरध्वनी: ९०११८९६६८१