–
‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वयम् आणि अल्पारंभ फाऊंडेशनच्या विद्यमाने, ‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील २५ गोष्टी बाजूला काढल्या गेल्या. पुढील परीक्षणाचे काम राजीव तांबे आणि शुभदा चौकर यांनी केले. त्यातील विजेत्या / उल्लेखनीय कथा , तुमच्यासाठी !!
रमेश… पाचवीत शिकणारा, वर्गात शेवटच्या बाकावर कोपऱ्यात बसणारा, अतिशय शांत, एकलकोंडा, शरीरयष्टीने हडकुळा मुलगा. अभ्यासातही जेमतेमच. त्यामुळे वर्गातील सारी मुलं त्याला ‘ढ’ विशेषण लावण्यास टपलेलीच असत. शिक्षकांच्याही नजरेआड असणारा असा हा रमेश एकटाच आपल्याच तंद्रीत असायचा. एक विनू नावाचा मित्र सोडला, तर त्याची फारशी कुणाशीही मैत्री नव्हती. आपल्या भित्र्या स्वभावामुळे तो सगळ्यांमध्ये लवकर रमत नसे. त्यातच जन्मापासूनच वाचादोष. मोठा झाला तरीही बोबडे बोलतो, म्हणून त्याच्या बोलण्याला वर्गातील मुलं हसायची. त्याची टिंगल उडवायची. कदाचित यामुळेच तो एकटा राहायचा आणि म्हणूनच सगळ्यांशीच बोलणं टाळायचा.
घरची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नव्हती. धाकटा भाऊ हुशार असल्याने त्याचंच कौतुक जास्त व्हायचं. रमेश समजूतदार असल्याने आई-वडील आपली किती काळजी घेतात, याची जाण त्याला होतीच. मात्र कधी कधी तो निराश व्हायचा. उदासपणे एकटाच बसून असायचा. रमेशचं मन एकाच गोष्टीत रमायचं. काय बरं असेल ती गोष्ट?
रमेशचे वडील कारखान्यात मजुरी करायचे. तिथेच एका खोलीचं त्यांचं घर होतं. घराच्या मागे गेल्यावर थोड्या अंतरावर रेल्वे रूळ होता. दिवसातून तीन-चार वेळा त्यावरून आगगाडी धावायची. बरोब्बर त्या वेळेला रमेश तिची गंमत बघण्यास जायचा. शिवाय तो त्या आगगाडीबरोबर शर्यतीचा खेळही खेळायचा. स्टेशनपासून गाडी सुटली की रमेशही तिच्याबरोबर धावत बऱ्याच अंतरापर्यंत जात असे. ही एकमेव गोष्ट त्याला आनंद देणारी होती. जणू काही तो आगगाडीशी शर्यत लावून आपल्या मनातील सारी धुसफूस काढत असे. रमेशचा एकमेव मित्र विनू त्याला गमतीने म्हणत असे, “तू एक दिवस या आगगडीलाही मागे टाकशील.” आणि त्याच्या या विनोदावर दोघेजण हसत घरी परतत.
एके दिवशी शाळेत असताना जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेची सूचना आली. शाळेतील मुलांनी मग आपापल्या गटाप्रमाणे क्रिकेट, कब्बडी, खोखो खेळांचे संघ तयार केले. रमेश त्यांच्यात नव्हताच. मनातून त्याला खूप वाटत होतं की आपणही भाग घ्यावा. विनूला रमेशच्या या गुणांची चांगलीच कल्पना होती. विनूने आपणहून रमेशचं नाव धावण्याच्या शर्यतीत दिलं. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रथमच शाळा-स्तरावर स्पर्धा घेऊन निवड केली जाणार होती. नियोजनाप्रमाणे निवडचाचणी सुरू झाली. रमेशच्या मनात भीतीचं वादळ उठलं होतं. त्याचे पाय लटपटत होते, पण तरीही तो तिथे उभं राहण्याचा प्रयत्न करत होता.

स्पर्धा सुरू होताच ते अंतर सगळ्यात आधी रमेशने पार केल्यामुळे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. एरवी सर्वांसमोर मान खाली घालून बसणाऱ्या रमेशची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याने वर्गातील सारी मुलं त्याचं अभिनंदन करत होती. तरीही रमेश काहीच न बोलता मान हलवून त्यांचं अभिनंदन स्वीकारत होता. थोडा का होईना, रमेशचा आत्मविश्वास आता वाढला होता. रमेशला खरी चिंता होती ती जिल्हास्तरीय स्पर्धेची.
विनूने धीर दिल्यावर रमेश जोमाने शर्यतीच्या सरावाच्या तयारीसाठी लागला. रोज आगगाडीसोबत धावण्याचा सरावही जोमाने सुरू होता. शाळेतील शिक्षकांनाही रमेशचा हा नवाच पैलू दिसत होता. सारेजण त्याच्या धावण्याचा वेग पाहून त्याचं कौतुक करत होते.
अखेर जिल्हास्तरीय स्पर्धेचा दिवस उजाडला. “अरे, एक दिवस तू या आगगाडीलाही मागे टाकशील…” विनूचे हे वाक्य आठवून रमेशचा तणावही कमी झाला. स्पर्धेला सुरुवात होताच रमेश वाऱ्याच्या वेगाने धावू लागला. त्याचा भरधाव वेग पाहून सारे जण थक्क झाले होते. त्याला या जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम येण्याचा मान मिळाला होता.
शाळेत आल्यावर साऱ्या मुलांनी रमेशला खांद्यावर उचलून विजयाचा जल्लोष केला. दुसऱ्याच दिवशी शाळेतर्फे सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला. कुणाशीही न बोलणाऱ्या रमेशला आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले. रमेशच्या डोळ्यांत आता आनंदाश्रूंचा पूर आला होता. एरवी बोबडे बोलणारा रमेश पहिल्यांदाच आत्मविश्वासाने आणि अस्खलितपणे बोलला, “मला धावपटू व्हायचंय.”
आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. जणू रमेशने नव्या जीवनात प्रवेश केला होता!
-भाग्यश्री कारभारी शिंदे.
प्राथमिक शिक्षिका, धुळे

Leave a comment