–

जो सुखकर्ता, दुःखहर्ता, लंबोदर,
जो अनंत,सर्वव्यापी,सर्वदूर,
ज्याच्यासाठी वाहतो भक्तीचा पूर,
जो असे आमच्या जगण्याचा सूर !!
अशा श्रीगणेशाचा आनंदमयी सण,
हर्षोल्हासाची सर्वत्र करितो उधळण,
भक्ती- उत्साहाने उजळते जीवन,
आयुष्यातील चिंता जणू विसरते मन !!
गाठीभेटी अन आरती-प्रसाद,
मोरया जयघोषाचा घुमतसे नाद,
परस्परांतील वाढवितो संवाद,
लाडक्या बाप्पाचा जणू हाच आशीर्वाद !!
त्याच्या पावलांनीच होते गौरींचे आगमन,
भक्तिभावाने साजरा होतो तोही सण,
लक्ष्मी सेवेचे मिळते अतीव समाधान,
एकत्र येती कुटुंबीय, हेचि वाटे धन !!
यथावकाश येते अनंत चतुर्दशी,
लळा लावूनी बाप्पा निघतो त्याच्या देशी,
मनात दाटते हळहळ अन उदासी,
विरसर्जनाआधी रूप साठवतो हृदयाशी !!
असा भक्तांच्या मनी अधिष्ठित गजानन,
त्याचे काय संभव होते विसर्जन ?
संकल्प घेतो मग त्यास प्रार्थून,
मीपणा आणि अहंभावाचे, करू विसर्जन !! 🙏🏼
—

सौ. रुपाली दिपक कुलकर्णी

Leave a comment