–

बरोबर दोन दशकांपूर्वी घडलेली घटना! २००५साल होते ते. त्या १९वर्षीय टेनिसपटूने नुकतीच पहिल्याच प्रयत्नांत फ्रेंच ओपन जिंकली होती. साहजिकच सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.त्याच्या जवळच्या वर्तुळातील एक व्यक्ती मात्र अगदी तटस्थपणे या साऱ्याकडे बघत होती. त्या युवा टेनिसपटूचा प्रशिक्षक, टोनी, जो त्याचा काकाही होता. त्याने अतिशय थंडपणे त्याला सांगितले की, “मुला,तुझा प्रतिस्पर्धी तुझ्यापेक्षा चांगला खेळला, तुझे नशीब की तू जिंकलास!!” दुसऱ्या दिवशी निघून जाताना त्याने एक हस्तलिखित नोट आपल्या पुतण्यासाठी ठेवली होती ज्यात अजून कोणकोणत्या गोष्टीत आपल्या खेळामध्ये पुतण्याने सुधारणा करणे अपेक्षित आहे त्या गोष्टींची यादी होती! तो खेळाडू होता राफा नदाल!! काकाने एवढे खडतर प्रशिक्षण पुतण्याला दिले की पुढील दोन दशके टेनिस कोर्ट वर खेळताना राफाने मोठे नाव तर कमविलेच पण तब्बल २२ ग्रँड स्लॅम एकेरी अजिंक्यपदे देखील मिळविली. त्यातील १४ अजिंक्यपदे ही फ्रेंचओपन मधील म्हणजेच ‘क्ले’ कोर्टवरील होती. राफाचा ‘क्ले’ कोर्टवरचा खेळ म्हणजे दर्जा आणि दहशत यांचा अनोखा संगम! राफाची दहशत म्हणजे त्याच्या कोर्टवरील रिप्युटेशनची दहशत!! ‘क्ले’ वर त्याच्या समोर खेळायचे आहे, या कल्पनेनेच प्रतिस्पर्धी निवडणुकी पूर्वीच डिपॉझिट गमाविल्याच्या मानसिकतेत जात से!! लाल मातीवर, राफाशी खेळलेला एक टेनिसपटू आपला अनुभव सांगताना म्हणतो, “राफा तुफान आक्रमण करून आधी तुमचे पाय ताब्यात घेतो आणि मग तुमचे मनोबल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळू लागते!!!” जसा एक कालखंड होता की ज्यात अमिताभने फिल्म इंडस्ट्रीवर एक हाती राज्य केले होते अगदी त्याच प्रमाणे फ्रेंच ओपन स्पर्धेवर नदालने एकहाती राज्य प्रस्थापित केले होते! फ्रेंच ओपन मध्ये नदाल ने एकूण जिंकलेले सामने आहेत ११२ आणि गमावलेले आहेत ४(पैकी एक रिटायर्ड हर्ट).

फेडरर ,जोको, मरे या समकालीन ऑल टाइम ग्रेट्स पैकी कोणालाही विशिष्ठ एका सरफेसवर या प्रमाणात अधिराज्य गाजविता आलेले नाही जेवढे की नदालने फ्रेंच ओपनवर गाजविले. मुळात टेनिस मध्ये क्ले अर्थातच मातीचा सरफेस हा खेळायला तुलनात्मक दृष्ट्या अंमळ अवघडच. क्ले कोर्ट वर बॉल काहीसा जास्त बाऊन्स होतो आणि तुलनात्मक दृष्ट्या थोडा स्लो देखील होतो. क्ले कोर्टवर खेळताना खेळाडूचा जास्त कस लागतो, त्याला जास्त थकायला होते. मोठ्या रॅलीज क्ले कोर्टवर अधिक संख्येने होतात. ग्रास कोर्टवर बॉल काहीसा स्कीड होतो व त्याला अन्प्रेडिक्टेबल बाऊन्स असतो. बॉलचा वेग कायम रहातो . ‘सर्व्ह अँड व्हॉली’ पद्धतीचा खेळ ग्रास कोर्टवर अधिक खेळला जातो. फेडरर,सेरेना विल्यम्स,पीट सॅम्प्रस हे टेनिसपटू ग्रास कोर्टवर खेळण्यासाठी निष्णात होते तर नदाल,बोर्ग,क्रिस एव्हर्ट ही दिग्गज मंडळी ‘क्ले’ कोर्टवर खेळताना अधिक प्रभाव पाडीत! थोडक्यात सांगायचे तर क्ले कोर्टवर खेळणे म्हणजे काहीसे, तुलनात्मक दृष्ट्या किंचितश्या अधिक आव्हानात्मक पृष्ठ भागावर खेळणे . खेळाडूची दमछाक ग्रास कोर्टवर क्ले पेक्षा काहीशी कमी होते.

खुपशा दुखापतींना तोंड देऊन देखील राफाच्या अजिंक्यपदांची रफ्तार टेनिस रसिकांना अचंबित करणारी आहे आणि मला वाटते याचे मोठे श्रेय त्याचे काका टोनी नदाल यांना! राफाचे बालपण गेले मॅनाकोर या खेड्यात, मॅलोर्का या स्पॅनिश बेटावर. राफाने संपूर्ण कारकिर्दीत लाल मातीवर अधिराज्य गाजविले, त्याचे मूळ या मॅनाकोर गावातील टेराकोटा लाल मातीच्या कोर्टसवर असणार!येथील मॅनाकोर टेनिस क्लबवर काका टोनी यांच्या कडक देखरेखीखाली राफाचे टेनिस घडले. मॅनाकोर टेनिस क्लब म्हणजे खूप सारी लाल मातीची कोर्ट्स, उंचावर असलेले मध्यम आकाराचे क्लब हाऊस व भरपूर सूर्यप्रकाशात न्हाऊन निघणारे क्लबचे टेरेस !आता साठीच्या उत्तरार्धात असणारा टोनी तेव्हा तिशीतला आणि शिस्तीतला तेजतर्रार प्रशिक्षक होता! एकदा टोनी आणि त्याची वहिनी म्हणजे राफाची आई यांच्यात अगदी जोरदार जुंपणार होती. कारण होते शिस्तप्रिय टोनीने राफाला ‘ममाज बॉय’ म्हणून झापले होते. राफाने येऊन आईला सांगितले आणि आई भडकली. शेवटी राफानेच आईला शांत केले. राफाचे वडील सेबस्टियन यांना आपल्या मुलाबद्दल आपले बंधुराज जरा जास्तच शिस्तप्रिय आहेत असे वाटत होते. राफाची आईदेखील याच विचारांची होती. मात्र हे सारे राफाच्या भल्यासाठीच होत आहे असेही त्यांचे मत होते आणि म्हणूनच स्पेनची राजधानी बार्सिलोना येथे जाणे आवश्यक असलेली प्रोफेशनल स्कॉलरशिप त्यांनी नाकारली कारण राफा व टोनीची ताटातूट त्यांना नको होती. राफाचे सारे करिअर टोनी काकाच्याच देखरेखीखाली जावे असेही त्यांना वाटत होते. राफा बद्दल बोलताना टोनी नदाल सांगतात ,”मी जेव्हा माझ्या प्रशिक्षण वर्गातल्या मुलांकडे टेनिस बॉल टाकायचो तेव्हा ते बॉल त्यांच्याकडे यायची वाट बघायचे पण राफा मात्र बॉलच्या दिशेने झेप घ्यायचा! तेव्हाच मी ओळखले की आपला पुतण्या वेगळा आहे,असाधारण आहे!”. “प्रत्येक पॉईंट हा शेवटचा पॉईंट आहे असे समजून खेळ” असे सांगणाऱ्या टोनीने राफाला अक्षरशः एक हाती घडविले. राफाच्या कारकिर्दीतील २२ग्रँडस्लॅम जेतेपदांपैकी १६जेतेपदे ही टोनी नदाल त्याचा प्रशिक्षक असताना म्हणजेच २०१७ सालापर्यंत मिळविलेली आहेत.याच टोनी काकांचा आणखी एक किस्सा.११ वर्षीय राफाने १२वर्षीय मुलांच्या स्पॅनिश स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले तेव्हाचा हा प्रसंग आहे. राफाचे कौतुक करण्यासाठी एक छोटेखानी समारंभ आयोजित केला होता.काका टोनीने एक पत्रकार म्हणून पत्र लिहून काही विशिष्ट हेतूने या स्पर्धेतील गत २५अजिंक्यवीरांची नावे मागविली होती.समारंभात ही यादी त्याने पूर्ण वाचून दाखविली.राफाला यातील पाचच नावे माहिती होती कारण त्या २५च्या यादीतील पाचच जण पुढे जाऊन व्यावसायिक टेनिसपटू झाले होते. टोनीने हाच मुद्दा त्याच्या भाषणात पकडला आणि लहानग्या राफाला सांगितले, “पोरा,तुला पुढे जाऊन अधिक मोठा पल्ला गाठण्याची संधी किती आहे? पाचास एक एवढी!”.
द आफ्रिकेतील एका सब ज्युनिअर स्पर्धेत अजिंक्यपद मिळवून छोटा राफा स्पेन मध्ये परतला होता तेव्हा त्याच्या आजीने एका छोटेखानी मेजवानीचे आयोजन केले होते. टोनीकाकाने तेथे जाऊन त्याच्या कौतुकाचे बॅनर फाडून टाकले, संबंधितांना झापले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राफाला टेनिस कोर्टवर सरावाला येण्यास फर्मावले! टोनी काका या घटनेवर भाष्य करताना म्हणतात ,”लहान वयात मिळविलेले हे यश फार मोठे नाही हेच मला त्याच्या मनावर बिंबवायचे होते!”. राफाच्या २०११ साली प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रात देखील या घटनेचा उल्लेख आहे.
टोनी नदाल १३ऑक्टोबर २०२४ रोजी Elpais.com च्या वेबसाइट वर लिहिलेल्या आपल्या कॉलम मध्ये म्हणतो, “काही वर्षांपूर्वी एका क्लबमध्ये मी व राफा गप्पा मारत बसलो होतो. त्यावेळी त्याने मला दिलेले एक प्रॉमिस राफाने पूर्ण केल्याचे मला अतीव समाधान आहे.मी त्याला सांगितले होते की एका नामवंत माजी टेनिसपटूने त्याच्या कारकिर्दीबद्दल तो असमाधानी का आहे हे सांगताना मला सांगितले होते की त्याच्या कारकिर्दीबद्दल तो पूर्ण समाधानी नाही याचे कारण त्याने पुरेशी अजिंक्यपदे मिळविली नाहीत हे नसून त्याने कधी सर्वस्व ओतून पुरेसे प्रयत्नच केले नाहीत हे आहे. हाच मुद्दा घेऊन मी राफाकडून वदवून घेतले होते की त्याच्यावर असा विचार करायची वेळच येणार नाही, तो खेळत असेपर्यंत त्याचे सर्वस्व सर्वोत्तम खेळासाठी देईल”. टोनी नदाल पुढे लिहितात, “राफाने माझी विनंती मान्य तर केलीच पण माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त निग्रहाने मला सांगितले की, टोनी मी जेव्हा निवृत्त होईन तेव्हा माझे मन अतिशय शांत असेल कारण मी माझे सर्वस्व शेवटपर्यंत सर्वोत्तम खेळासाठी दिलेले असेल”. मला वाटतं राफा नदालने शेवटपर्यंत सर्वोत्तम खेळ देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. वयाच्या ३८व्या वर्षी शरीर थकू लागले आणि मग एकटे मन किती लढणार? कारकिर्दीतील १३ग्रँडस्लॅम स्पर्धाना तो दुखापतींमुळे मुकला आणि एकूण सुमारे ४ वर्षे याच कारणाने स्पर्धात्मक टेनिस देखील खेळता आले नाही. तरीही त्याच्या नावावर ग्रँडस्लॅम जेते पदे २२आहेत! असे खेळाडू शतकात मोजकेच होतात. टेनिस मध्ये मिळविलेल्या अफाट यशामुळे आज खूप सारे ऐश्वर्य राफाने मिळविले आहे. राफाच्या मॅनाकोर शहरापासून सुमारे १५कि मी अंतरावर मॅलोर्का बेटाच्या पूर्व भागात आज नदालचे पोर्टो क्रिस्टो हार्बर येथे १.७ एकरवर एका कड्याच्या बाजूला समुद्रासमोर आलिशान मॅन्शन आहे. त्यासमोर त्याची ७८.५फूट लांबीची ग्रेट व्हाईट नावाची सुपर याट नौका डौलाने पाण्यात तरंगत असते. माद्रिद तसेच जगात इतरही काही ठिकाणी राफा आलिशान घरांचा मालक आहे. टेनिसला आपले सर्वस्व देणाऱ्या राफाला टेनिसनेही खूप सारे दिले आहे.

(२००८ च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये एकेरीमध्ये आणि २०१६ च्या रिओ ऑलिंपिकमध्ये दुहेरीमध्ये सुवर्णपदका! )
सरतेशेवटी राफा नदालचे एक सुप्रसिद्ध अवतरण उद्गृत करणे समर्पक वाटते. तो म्हणतो,” The glory is being happy. The glory is not winning here or winning there. The glory is enjoying practice, enjoying every day, enjoying working hard, trying to be a better player than before.”
“Success is not the victory but everything you have overcome to win”. आणि जेव्हा फिटनेस प्रॉब्लेम्स त्याचा पाठलाग सोडणार नाहीत असे राफाच्या लक्षात आले तेव्हा त्याने स्पर्धात्मक टेनिस मधून निवृत्ती घेतली! ३जून रोजी वयाची ३९ वर्षे पूर्ण करणाऱ्या राफाने अगदी योग्य वेळी निवृत्ती घेतली आहे. राफा ,तुला लाल मातीचा सलाम. तुझ्या निवृत्तीने टेनिस मधील एक मोठा युगास्त झाला आहे.

श्री. नितीन मुजुमदार

Leave a comment