।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन


सॅपियन्स – एका विलक्षण प्रवासाची विचारप्रवर्तक सांगड : श्री. बिपीन बाकळे

‘सॅपियन्स’ हे पुस्तक केवळ मानवाच्या इतिहासाचा आलेख मांडत नाही, तर तो आपल्याला अंतर्मुख करणारा आणि अस्वस्थ करणारा प्रवास आहे. युवाल नोआ हरारी यांनी आपल्याला साडेतेरा अब्ज वर्षांचा प्रचंड कालपट समोर ठेवला आहे आणि तो माणसाच्या डोळ्यांसमोर अगदी तपशीलात उलगडतो. पण ही संख्या – साडेतेरा अब्ज वर्षं – सामान्य मनाला समजेल अशी नाही.

साडेतेरा अब्ज वर्षांचा कालपट सांगणं हे फक्त विज्ञान नव्हे, तर एक मोठं आध्यात्मिक झेप घेणं आहे. ही झेप घेताना मला सतत एक प्रश्न छळतो — या प्रवासात ‘माणूस’ म्हणून माझं स्थान नक्की काय आहे?

एखाद्या माणसाचं पूर्ण आयुष्य ८० वर्ष धरलं, तर पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतचा काळ सुमारे १३८ अब्ज वर्षांचा आहे. हे ऐकलं की काळाचा व्यास किती अफाट आहे याची कल्पनाच करवत नाही. साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग झाला. ह्याच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण केवळ १३ हजार वर्षांपूर्वी शेतीची सुरुवात केली, तेव्हा समजतं की माणूस या भव्य कालपटात फक्त एक क्षणभर टिमटिमलेला दीप आहे.

युवालने जेव्हा तीनशे ऐंशी कोटी वर्षांपूर्वीचा कालखंड सांगितला – तेव्हा पृथ्वीवर पहिला जीव निर्माण झाला – तेव्हा मी विचार करत राहिलो की त्या जीवाला गरजा काय असतील? अन्न, थोडं ऊर्जेचं रूप, आणि कदाचित अस्तित्व टिकवण्यासाठी काही मूलभूत प्रक्रिया. त्या जीवामध्ये महत्त्वाकांक्षा नव्हती. होती ती केवळ अस्तित्वाची चाचपणी.

सात लक्ष वर्षांपूर्वी मानवजातीचा खरा प्रवास सुरु झाला. सात लक्ष वर्ष म्हणजे सत्तर कोटी वर्षांची दहावा भाग देखील नाही. पण तरीही, आपल्या मनासाठी ती संकल्पनाच मोठी आहे. आपण जर एका वीस वर्षांच्या माणसाचं आयुष्य धरलं, तर एक लक्ष वर्ष म्हणजे पाच हजार पिढ्या. आणि सात लक्ष वर्ष म्हणजे पस्तीस हजार पिढ्या. एवढ्या काळापासून आपण चालत आलो आहोत आणि तरीही आपण स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतो आहोत, हे मला फार खोलवर जाणवतं आणि विचार करायला भाग पाडते.

युवालने मांडलेला प्रवास अतिशय नेमका आहे. मानवाच्या उत्क्रांतीपासून ते शेतीच्या जन्मापर्यंत, संस्कृतीच्या निर्मितीपासून ते पैशाच्या आविष्कारापर्यंत – हा प्रवास केवळ भौगोलिक किंवा जीवशास्त्रीय नाही, तर मानसिक आणि सामाजिक सुधारणांचा आहे. मला वाटतं, युवाल हे पुस्तक लिहिताना फक्त इतिहास सांगत नव्हते. ते निराश होते, की उत्साही – हे सांगणं कठीण आहे. पण त्यांच्या प्रत्येक परिच्छेदामध्ये एक अंतर्निहित व्याकुळता आहे – मानवाने स्वतःच स्वतःसाठी उभी केलेली साखळी तोडू शकेल का, ह्याची खंत आहे.

संस्कृती म्हणजे मानवाने कल्पना, परंपरा आणि नातेसंबंधांमधून निर्माण केलेला समाजाचा अवकाश. युवालने संस्कृतीच्या जन्मावर खूप स्पष्ट भाष्य केलं आहे. मानवाने जेव्हा कल्पना करू लागला – दैवतं, कथा, श्रद्धा – तेव्हा खरी संस्कृती निर्माण झाली. ती कल्पनांची एकजूट होती, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनोळखी लोक एकत्र राहू लागले. त्याशिवाय आपण कधीही हजारोच्या समाजात राहू शकलो नसतो. मी विचार करतो, की ही बोधात्मक क्रांती म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा प्रारंभ होता की गुलामीची सुरुवात?

कृषीक्रांती – ही बारा हजार वर्षांपूर्वी झाली. हाच तो टप्पा आहे जिथे माणूस स्थिर झाला. पण हे स्थिर होणं खरंच प्रगतीचं चिन्ह होतं का? रामायण काळाकडे पाहिलं तर, निलेश ओक यांच्या संशोधनामुळे समजतं की त्या काळातही कृषी सशक्त होती. राम वनवासाला गेल्यानंतर देखील ‘पर्णकुटीच्या आजूबाजूला शेतं आणि जलाशय’ यांचा उल्लेख सापडतो. म्हणजेच शेती हा केवळ उपजीविकेचा नव्हे तर सांस्कृतिक व्यवहाराचाही भाग होता.

इथेच मला भारतीय संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा मांडावा वाटतो — कृषीक्रांती ही जर सुमारे १२,००० वर्षांपूर्वी झाली असेल, तर त्या आधीही काही सुसंस्कृत समाज अस्तित्वात असावा का? निलेश ओक यांचं संशोधन याच संदर्भात मला विचारात टाकतं. त्यांच्या मते रामायणाचा काळ १४,००० वर्षांपूर्वीचा असू शकतो, आणि तिथल्या वर्णनांमध्ये ‘शेती’, ‘वनराज्यांचे व्यवस्थापन’, ‘धान्य साठवणूक’ अशा गोष्टींचे संदर्भ सापडतात. म्हणजे आपण जो कालपट ‘निअँडरथल’पासून मोजतो आहोत, त्यात भारतीय परंपरेतील काही महत्त्वाचे अध्याय नकळत गाळले गेले आहेत का?

पैशाची निर्मिती हा एक निर्णायक टप्पा होता. हे एक साधन होतं, पैसा आला आणि माणूस ‘समाधान’ सोडून ‘सुखाच्या’ मागे लागला — पण ते सुख नक्की काय आहे, हे ठरवायलाच तो विसरला. आता तर गोष्ट इतकी पुढे गेलीय की सुख मिळालं तरी समाधान नाही आणि दुःख आलं की उत्तरदायित्व नाही. ही परिस्थिती म्हणजे आपल्या उत्क्रांतीच्या वेगाने आपण विनाशाच्या दिशेने कसे चाललो आहोत याचा ठळक पुरावा आहे.

पण माणसाने त्याला अंतिम ध्येय केलं. समाधानाच्या शोधात असलेल्या माणसाने जेव्हा पैसे निवडले, तेव्हा तो त्याच्या आत्मिक शांततेपासून दूर जाऊ लागला. आज आपण पाहतो – माणूस अधिकाधिक विकत घेतोय, पण समाधान हरवत चाललंय. पैसे हे मोजण्याचं साधन असावं, जीवनाचं ध्येय नाही. पण आपण त्यालाच देव मानू लागलो, आणि ह्याचं परिणाम म्हणून आपण विनाशाच्या वाटेवर चाललो आहोत.

‘सॅपियन्स’ वाचताना, आणि त्यावर विचार करताना, मी केवळ एका प्राचीन प्रवासाचा साक्षीदार झालो नाही – तर स्वतःच्या आत झिरपणाऱ्या, खोलवर रुजलेल्या असंख्य प्रश्नांशी आमनेसामने आलो. माणूस कोण होता, काय झाला आणि आता तो कुठे चालला आहे – या प्रवासाचा विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे. आणि त्यावरचं हे माझं चिंतन – एका वाचकाने, माणूस म्हणून स्वतःशी केलेलं एक प्रामाणिक संभाषण आहे.

श्री. बिपीन बाकळे,
९८२२०१७०९१


Discover more from ।।अल्पारंभ: क्षेमकर:।।

Subscribe to get the latest posts sent to your email.



Leave a comment