–

गेली अनेक वर्षे ओंकारजींच्या लयदार ठेक्यातून, रसिक श्रोते ओंकाराच्या नादाची अनुभूती घेत आलेले आहेत. प्रथमतः त्यांच्या ८० च्या वाढदिवसानिमित्त त्यांना चरणस्पर्श आणि त्यांच्या दिर्घायुष्यासाठी संगीतातील अनाहताला विनम्र प्रार्थना!
काही वर्षांपूर्वी अहमदनगरमधील (सध्याचे अहिल्यानगर) आमच्या बंदिश या संस्थेसाठी विदुषी पद्माताई तळवलकर यांची मैफल सुरु होती. ओंकारजी, तबल्याच्या साथीसाठी होते. विलंबित झुमरा सुरू होता. ओंकारजींचा लयदार, आसदार, बौजदार ठेका. त्यांच्या विशिष्ट शैलीत, लयीचा डौल सांभाळत, कुठल्याही अभिनिवेशाशिवाय. जसा काही सुस्पष्ट नादमय अक्षरांचा तानपुराच सुरु होता. काही वेळानंतर पद्माताईंनी एक आवर्तन साथसंगत साथीदारांसाठी सोडले. हल्ली आवर्तन सोडल्यानंतर गायकाच्या उजवी – डावीकडून काय होते हे जाणकारांना सांगणे न लगे. अक्षरशः हात धुऊन घेतले जातात. (सन्माननीय अपवाद वगळता.) परंतु ओंकारजींनी ते पूर्ण आवर्तन कुठलाही भरणा न करता केवळ शुध्द ठेक्याचे गुंजन केले. त्या नादमय आवर्तनाचे संमोहन इतके जबरदस्त होते की सर्व श्रोत्यांच्या-वाहवा आणि टाळ्यांनी सभागृह भारावून गेले. ओंकारजींची खरी शक्ती ही आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठेक्याविषयीचे पं. शंख चटर्जी यांचे विचार उधृत केले होते. “ठेक्यामधले ‘धीं’ हे असर म्हणजे वैश्विक नाद आहे. ठेका खुला तरी मृदु, असावा. सांगीतिक स्वरविश्वाला आईच्या मायेने सांभाळणारा असावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, कायदा-रेला – गत इ. तबल्यातील साधनसामग्रीचे अध्ययन रियाज केल्यावर शेवटी ठेक्याचे अध्ययन – आकलन – रियाज करावा.”
ही सर्व तत्वे ओंकारजींनी त्यांच्या सांगीतिक जीवनात अत्यंत निष्ठेने पाळलेली दिसतात. घरातून मिळालेले स्वर लयीचे संस्कार, फरुखाबाद घराण्याची उत्तम तालीम, आयुष्यात लाभलेले सशक्त गुरुबळ यांच्या आधारावर त्यांची सांगीतिक प्रगल्भता बेतलेली दिसते. सुरांवर असलेले प्रेम, घरात असलेली कीर्तनाची आध्यात्मिक परंपरा, मुळातलाच मृदु-विनम्र स्वभाव हा त्यांच्या मुलायम-नादमय ठेक्याचा पाया आहेच. परंतु यासंबंधी पं. चिदानंद नगरकर, पं. देवेंद्र मुडेश्वर इ. गुरुंना ते, आपल्या कुशलतेचे श्रेय देतात. तसेच उस्ताद समशुद्दीन खान साहेबांच्या तबल्याचे ऋणही ते मान्य करतात. माता पित्यांच्या स्वरसंस्कारांबरोबरच पं. तारानाथ हट्टंगडी, पं. तारानाथ राव यांच्याकडून त्यांना तबल्याची विधिवत तालीम मिळाली आहे. पं. रवी आणि पं. शशी बेल्हारे तसेच पं. अरविंद मुळगावकर यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले आहे.

ओंकारजी आकाशवाणीचे सर्वोच्च श्रेणीप्राप्त तबलावादक आहेत. पं. मल्लिकार्जुन मन्सूर पं. कुमार गंधर्व, पं भीमसेन जोशी, पंडिता किशोरीताई, मालिनीताई, गिरीजादेवी, पद्माताई तळवलकर इ. उच्चकोटीचे गायक कलाकार, अनेक वादक, सध्या प्रकाशात असलेले अनेक कलाकार यांना ओंकारजींनी संगत केलेली आहे. साथसंगतीच्या क्षेत्रात केलेले विपुल कार्य ही ओकारजींची औपचारिक ओळख आहे . परंतु ही ओळख रसिकांना आहेच. ती करून देणे हा या लेखाचा उद्देश्य नाही. कलाकाराचे यश, त्याचे परदेश दौरे, त्याच्या मैफलींची संख्या, त्याला मिळणाऱ्या बिदागीचे आकडे इ. संबंधी जनमानसात चर्चा होतच असते. परंतु माणूस म्हणून तो कसा आहे, स्टेजवरून उतरल्यावर त्याचे वागणे कसे आहे यासंबंधी भाष्य करणे आवश्यक आहे. पं. कुमार गंधर्व म्हणत की स्टेजवरून् उतरल्यावर मी एक सामान्य माणूस आहे. उतरताना आपला मुकुट काढून ठेवावा आणि सामान्य जीवन जगावे. नुकतेच दिवंगत झालेले उ. झाकीर हुसेन म्हणत की, मी कलाकार दोन तासांपुरता असतो. उरलेले बावीस तास, मी सामान्य माणूस असतो. गर्व कशाचा करायचा ? बुजुर्गांसमोर तुम्ही झुकलेच पाहिजे. किती कलाकार, कलेची झूल उतरवून सामान्य जीवनाला सामोरे जातात हे रसिकांनी पडताळून पहावे. ओंकारजींनी उच्च यशानंतरही माणुसपणाची ज्योती तेवती ठेवली आहे. याला कारणीभूत आहे त्यांचा मोठेपणा. त्यांची बैठक, लाभलेले गुरुबळ. ‘विद्या विनयेन शोभते’, हे वचन आपण नेहमी ऐकतो. परंतु ते अंगिकारलेले ओंकारजींसारखे कलाकार विरळाच. यशाची चढण चढताना खाली झुकुन विनम्रपणेच शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा असं पं. शिवकुमार शर्मा म्हणत. ओंकारजींनी या तत्वाचे तंतोतंत पालन केल्याचे दिसते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की तबल्याच्या क्षेत्रातल्या माझ्या अल्पशा योगदानाला ओंकारजींचा आशीर्वाद लाभतो. ते मला गुरुस्थानी आहेत.
गुरुजींचा सत्संग, त्यांच्या शिष्यांना, रसिक श्रोत्यांना दीर्घकाळ लाभावा हीच नाददेवतेच्या चरणी प्रार्थना. पं. सुरेश तळवलकरांच्या शब्दांत सांगायचं तर त्यांच्या तबल्यातून झंकारणारा लयीचा तानपुरा असाच झंकारत राहो.

श्री. धनंजय खरवंडीकर,
A-११०७, सुदत्त संकुल, दामोदर नगरच्या मागे,
हिंगणे खुर्द, पुणे ४११०५१.
फोन- 9822294488, 8830593079.

Leave a comment