विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे.
मित्र मैत्रिणींनो व प्रियजनांनो……तुंम्हा सर्वांना कल्पना आहेच की दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मी उत्तराखंडमध्ये औलीच्या सुंदर हिमालयीन पर्वतरांगांच्या उतारांवर कमीतकमी एक आठवडा तरी स्किईंग हा साहसी खेळ खेळावयास जातो. यावर्षी सुध्दा आंम्ही दहा हरहुन्नरी सदस्यांनी २२ ते २८ फेब्रुवारी, २०२५ हा एक आठवड्याचा कालावधी स्किईंग करण्याचा बेत पक्का केला व त्यानुसार २१ फेब्रुवारी, २०२५ ला औली येथे स्कि रिसाॅर्टवर पोहोचलो.
औली येथील स्किईंग या साहसी खेळासाठी नैसर्गिकरीत्या बनलेली सुंदर उताराचा ट्रॅक………

१९ व २० फेब्रुवारी, २०२५ ला जबरदस्त हिमवृष्टी झाल्यामुळे औली येथील स्किबेड या साहसी खेळासाठी छान तयार व सज्ज झाला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. २२ ते २७ फेब्रुवारी, २०२५ या सहा दिवसांत स्नो बिटर मशीननी स्कि ट्रॅक रूंद व तेवढाच स्मूथ बनवल्यामुळे आंम्ही स्किईंग या साहसी खेळाचा पुरेपूर आनंद लुटला. स्किईंग या साहसी खेळासाठी ही भौगोलिक व हवामानाची योग्य स्थिती होती जी मनाला प्रफुल्लित करून त्या खेळाचा पुरेपुर आनंद घ्यायला मदत करीत होती.
उत्तराखंड हिमालयातील औली येथून दिसणारे नंदादेवी शिखराचे लोभसवाणे द्रूष्य……..

परंतु अचानकपणे २७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी (आमचं २७ तारखेला सकाळी स्किईंग झाल्यावर) तुफान हिमवृष्टी सुरू झाली जी १ मार्च, २०२५ सकाळपर्यंत थांबलीच नाही. हा हवामानातील अचानक बदल बद्रीनाथ येथील माना गावाकडून स्वर्गरोहीणी शिखराच्या पायथ्याकडे जाण्याच्या पर्वतीय क्षेत्रात झालेल्या हिमस्खलनामुळे (ॲव्हेलाँज) झाला होता. अती उंचीवरील हिमवृष्टी अत्यंत तीव्र होती ज्यामुळे जोशीमठ औली या १४ किलोमिटर्सच्या रस्त्यावर अनेक झाडे उन्मळून पडली व त्याचबरोबरच त्यांच्या फांद्यांमध्ये विजेच्या तारा अडकून अनेक विजेचे खांब जमिनीपासून उखडले गेले. या कारणांमुळे २७ फेब्रुवारी, २०२५ च्या संध्याकाळपासून औली येथे वीज नव्हती. अती प्रचंड हिमवृष्टीमुळे औलीचा रस्ते, विज व मोबाईल तसेच इतर नेटवर्क पासून संपर्क पुर्णपणे तुटला.
औली पासून जोशीमठकडे जाणासाठी पर्यटन खात्याची जीप सज्ज होतांना……..या महाकाय बर्फाच्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे सोपे नाही…….

या अशा कठीण परिस्थितीमुळे आंम्ही २८ फेब्रुवारी, २०२५ च्या रात्री निर्णय घेतला की १ मार्च, २०२५ रोजी सकाळी, जशी हिमवृष्टी थांबेल तसं लगेचच आपापल्या सामानासकट औंली सोडायचं व जोशीमठकडे उतरणाऱ्या डोंगर रांगेवरून गुढघ्याएव्हड्या व काही ठिकाणी मांड्यांएव्हड्या बर्फातून कठीण मार्गक्रमण करीत जोशीमठ गाठायचंच्.
औली येथे २७ व २८ फेब्रुवारी, २०२५ ला सतत दोन दिवस – रात्र जबरदस्त झालेली बर्फवृष्टी असं न म्हणता मी त्याला झालेला हिमपात असं म्हणेन.

ही रक्त गोठवणाऱ्या थंडीतील बर्फामधील निसरड्या पायवाटेने खाली उतरण्याची व तेवढीच क्लेशदायक प्रक्रिया खरंच आमची कसोटी पहाणारी होतीच् परंतु त्याबरोबरच प्रतिकूल हवामानाशी खंबीरपणे कसा सामना करायचा व त्यातून मार्ग कसा काढायचा याचा एक जबरदस्त अनुभव आमच्या गाठीशी बांधला जाणार होता. नाहीतर, स्किईंगसाठी औलीला जातांना आपण नेहमी जोशीमठ – औली – जोशीमठ असा दोन्ही बाजूंनी रस्त्यानी जिपमधूनच् प्रवास करतो परंतु यावेळी परमेश्वरानी हवामानात बदल घडवून औली – जोशीमठ या क्षेत्रात हिवाळ्यातील डोंगर भटकंती करण्याची संधी प्राप्त करून दिली ही तर नक्कीच आपल्या डोंगरभटक्या साहसी मित्रमैत्रिणींना मिळालेली नामी संधीच नाही कां ?
या संपूर्ण साहसी व चित्तथरारक अनुभवाच्या छायाचित्रणातील काही आठवणी (फोटो/व्हिडिओ) माझ्या सर्व प्रिय मित्र मैत्रिणी व आप्तेष्टांसाठी शेअर करतोय्. (https://www.facebook.com/share/p/18ccKYwNsk/) मला खात्री आहे की हे छायाचित्रण पहातांना तुंम्हा सर्वांना या पराकोटीच्या हिवाळी हवामान व त्यातील साहसी भटकंतीच्या थराराचा अनुभव नक्कीच मिळेल.

विश्राम (संजू) व शुभांगी कुलकर्णी, पुणे.

Leave a comment