डाॅ. सौ.मृणालिनी दोडके
माणुस हा सामाजिक प्राणी आहे आणि तो सामाजिक रचनेमधे आपले कर्तृत्व, वक्तृत्व,सर्जनशीलता, बौद्धिक उर्जा ह्याचे देवाण-घेवाण करत असतो. समाज रचनेमधे तो स्वतःला निश्चिंत आणि सुरक्षित ठेवू शकतो. ह्या समाजरचनेत शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, लग्न व्यवस्था, उद्योग-नोकरी हे घटक माणसाला प्रगत बनवायला अनेक व्यवस्था वर्षानुवर्ष कार्यरत आहे.

साधारण १९७०-१९७५ दरम्यान एखाद्या कुटुंबात ३ किंवा ४ मुले असणे अगदी सामान्य बाब होती. हे दृश्य अगदी शहरात सुद्धा होते. पण नंतर जसा जसा माणूस शिक्षित होत गेला आणि मुख्यतः स्त्रीवर्ग अर्थार्जनासाठी बाहेर पडला तसे तसे कुटूंब चौकोनी होत गेले. चौकोनी कुटुंब, दुप्पट उत्पन्न, जागतिकीकरण ह्या सर्व विस्तरावादाने मुलांना शिक्षित करणे हे पालकांचे ध्येय बनले आणि शहरांमधे मुलींचे लग्नाचे वय जे २४-२५ होते ते २०२५ मधे २८-२९ झाले. आज अनेक शिक्षित मुली नोकरी करून आपल्या पायावर उभ्या आहेत. आज दुप्पट उत्पन्न आणि लग्नानंतर एकच पाल्य हा समाजासाठी दंडक बनलेला आपण पाहतो आहे. महानगरातच नव्हे तर नंबर दोन शहरात सुद्धा हेच दृष्य आहे. ह्यात आणखी एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे आता मुलांना लग्नाची घाई नसते. ह्यात काही मुले आणि मुली परदेशात उच्चशिक्षणासाठी जातात आणी आपले करीयर करण्यास प्राधान्य देतात. एकदा उच्चशिक्षण, चांगली नोकरी म्हटलं की मुलांच्या अपेक्षा सहाजिकच वाढतात आणि योग्य जोडीदार मिळणे ह्यात वेळ निघून जातो. भल्या मोठ्या पगाराची नोकरी, हाती पैसा आणि पाहिजे ती सेवा घेण्याचे कुवत ह्यामुळे पहिले काही वर्ष नवलाईचे आणि कौतुकाचे जातात. ह्यात आईवडीलांचा पाठींबा असतो. कालांतराने मुलामुलींचे वय वाढतेआणि लग्न ह्या समाज संस्थेपासून ते दुर जातात. तेंव्हाच सुरू होतो तो काठावरची प्रवास. मुख्य प्रवाहापासनू दूर रहाणे. ह्याच उच्चशिक्षित मुलांबरोबर असलेले काही समवयस्क मुली आणि मुले लग्नबंधन स्वीकारून आपला पुढला प्रवास एकमेकांच्या सहवासात सुरू करतात आणि उच्चशिक्षित मुले समाजरचनेचा परिपाठ न स्विकारता काठावर उभे रहातात. वय वाढते तसे त्यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलत जातो आणी नकळत लग्नबंधन एक न पेलणारा धोका म्हणून पाहिले जाते. नोकरीतले ताण आणि लग्नाचे आव्हाने ह्यात लग्न करणे राहून जाते आणि त्यांचे जीवन एकसुरी बनण्यास सुरवात होते. सहाजिकच लग्नाबद्दल त्यांचे आकर्षण कमी होवून, शारिरीक गरजांवर डोळेझाक केली जाते आणी मग ही मुले जास्तीत जास्त कामामधे स्वतःला झोकून देतात. हळुहळू ह्या मुलांना घरगुती कार्यक्रम, समारंभ तसेच सामाजिक व्यवस्था ह्याविषयी एक अलिप्तपणा येतो आणि समाज सुद्धा त्यांना आता वेगळा समजू लागतो. ह्या सगळ्यामधे सारे भौतिक सुखे असून सुद्धा मनमुराद आनंद किंवा जीवनातल्या छोट्या छोट्या आनंद देणाऱ्या गोष्टी सुटत जातात.

काही विधायक कार्यासाठी लग्नसंस्थेत न अडकणे वेगळे आणि तडजोड न करता एकांगी आयुष्य जगणे हे नंतर फार आव्हानात्मक बनू शकते. आपण पहातोच की समाजात कितीतरी असे उदाहरणे आहेत की आई वडील असेपर्यंत काठावरची मुले शाश्वत असतात पण एकदा की वरची फळी संपली की समवयस्क लोक सुद्धा काठावरच्या लोकांना आपल्यात घेत नाही. आता हा एकाकी प्रवास आणखीनच त्रासदायक होतो जेंव्हा ही मंडळी परदेशी वास्तव्यास असतात. आपल्या देशात, आपल्या माणसात कधीतरी स्पर्श,भावना, प्रेम वाट्याला येवू शकते पण परदेशात हे दुरापास्त असते आणि सहाजिकच ह्याचा ताण मनावर येतो. ‘मला कोणी नाही’, ही भावना जेंव्हा डोके वर काढायला लागते, तेंव्हा मग तो प्रवास आणखी खडतर होवू लागतो. आता स्वतःसाठीच जगणे हा पगडा इतका घट्ट होतो की मन फक्त एकाच गोष्टी भोवती फिरायला लागते आणि ते म्हणजे आपले स्वतःचे शरीर. मग पैसा कामी येत नाही किंवा तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायासाठी केलेले योगदान सुद्धा. नोकरी किंवा व्यवसायात एकल म्हणून सोशल कार्यक्रमात सुद्धा काठावरच्या लोकांना समरस होवून भाग घेता येत नाही. आज हा लेख लिहीण्याचे औचित्य म्हणजे असे कितीतरी कुटुंबे आहेत की त्यांची तरूण उच्चशिक्षण मुले देशात आणि परदेशात आहे पण लग्नबंधन स्वीकारायला तयार नाहीत. सगळचं चकाकणारे सोने नसते किंवा लग्न म्हणजे फक्त जबाबदारीच नसते ही जाणीव मुलांना होणे गरजेचे आहे. शेवटी आयुष्य ही एक मिळालेली संधी आहे. त्याचा सगळ्या बाजूने विचार करून एक संपन्न आयुष्य जगावे एवढेच सांगणे.

डाॅ. सौ.मृणालिनी दोडके
७०२८०१८८१५

Leave a comment