अल्पारंभा फाऊंडेशनचे नवीन ध्येय !
नवीन आर्थिक वर्ष सुरु झाल्यानंतर, अल्पारंभा फाउंडेशनचा हा पहिला ब्लॉग. आपण शिक्षण, तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असलो तरीही भारतात वित्तीय साक्षरता ही अजूनही एक मोठी आव्हानात्मक बाब आहे. ‘वित्तीय साक्षरता:प्रचार आणि प्रसार’ हे फाउंडेशनचे सुरुवातीपासूनचे एक ध्येय आहेच. त्या अनुषंगाने, संस्थेमार्फत विविध उपक्रम चालविले जातात. परंतु नवीन आर्थिक वर्ष सुरु होतांना आतापर्यंत घेतलेले प्रयत्न आणि आलेले अनुभव यांची सांगड घालून नवीन वर्षासाठी आता ‘वित्तीय साक्षरता – प्रत्येकासाठी’, या ब्रीदवाक्याची निश्चिती केली आहे. या अंतर्गत समाजातील प्रत्येक घटकापर्यन्त आर्थिक साक्षरता पोहोचवण्याचा मानस आहे. यामागील कारणे समजावून घेण्यासाठी पुढे सविस्तर मुद्दे मांडले आहेत.

वित्तीय साक्षरता म्हणजे काय: आपल्या उत्पन्न, खर्च, बचत, गुंतवणूक आणि जोखमींचे योग्य ज्ञान आणि ते प्रत्यक्षात योग्य रीतीने उपयोगात आणण्याची क्षमता. म्हणजेच, आपल्या पैशावर नियोजनपूर्वक नियंत्रण ठेवणे.
भारतातील आर्थिक साक्षरतेची स्थिती :
जागतिक स्तरावर तुलना केली असता, भारताची केवळ २७% लोकसंख्या आर्थिकदृष्ट्या साक्षर आहे. ग्रामीण भारतात ही टक्केवारी आणखी कमी आहे – सुमारे १८ ते २०% !! महिलांमध्ये आर्थिक साक्षरतेचा दर पुरुषांपेक्षा १०-१२% नी कमी आहे.
ही साक्षरता प्रत्येकासाठी का आवश्यक आहे?
उत्तम, फायदेशीर आर्थिक निर्णय घेण्यासाठी – बजेटींग, बचत, गुंतवणूक, विमा, कर आणि कर्जे यांचे नियोजन चांगल्या प्रकारे करण्यासाठी.
बचत आणि गुंतवणुकीसाठी – आयुष्याच्या विविध टप्प्यांसाठी / ध्येयांसाठी योग्य निधी उभा करण्यासाठी.
कर्ज व्यवस्थापनासाठी – योग्य वेळेस, योग्य माध्यमातून. योग्य रकमेचे, योग्य दराने कर्ज घेणे आणि परतफेड करणे.
पेन्शन व रिटायरमेंट नियोजनासाठी – वृद्धापकाळात स्वावलंबनासाठी.
आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी – कोणतीही आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी (बनावट योजना, सायबर फ्रॉड यांपासून सुरक्षित राहण्यासाठी)
वित्तीय स्वातंत्र्यासाठी – विशेषतः महिलांसाठी.
RBI आणि SEBI सारख्या संस्थांनी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम सुरू केले आहेत. PM Jan Dhan Yojana, Atal Pension Yojana, Sukanya Samriddhi Yojana सारख्या योजनांचा मुख्य हेतूही वित्तीय साक्षरतेला चालना देणे हा आहे. NCFE (National Centre for Financial Education) हे वित्तीय साक्षरता वाढवण्यासाठी विशेष कार्यरत आहे. विविध NGOs, शाळा, महाविद्यालये, आणि वित्तीय संस्था स्थानिक पातळीवर प्रशिक्षण सत्रं घेत आहेत.
‘वित्तीय साक्षरता – प्रत्येकासाठी’ या अंतर्गत आपण काय करू शकतो?
आपण वेगवेगळे घटकांसाठी विशेष कार्यक्रम राबवू शकतो. जसे की
१) विद्यार्थ्यांसाठी वित्तीय साक्षरता कार्यक्रम: तरुण पिढीला आर्थिक संज्ञा समजावून सांगणे, त्यांचा वापर आणि वापरातील आडाखे समजावून देणे इ.
२) महिलांसाठी वित्तीय साक्षरता अभियान: गृहिणींना घरगुती बजेट नियोजन, बचत आणि गुंतवणूक संधी समजावून देणारा उपक्रम, लघुउद्योग करणाऱ्या महिलांसाठी बँकिंग, कर्ज, स्टार्टअप्स आणि निधी व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन, महिला कर्मचारी व उद्योजिकांसाठी पीपीएफ, विमा, पेन्शन योजना आणि गुंतवणूक पर्यायांची माहिती इ.
३) शेतकऱ्यांसाठी वित्तीय साक्षरता उपक्रम: पीक विमा, कृषी कर्ज, सरकारी योजना आणि सबसिडी यांची माहिती देणारी कार्यशाळा, शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात संधी यांची माहिती इ.
४) कामगार आणि लघुउद्योजकांसाठी वित्तीय साक्षरता अभियान: कष्टकरी, असंघटित कामगारांसाठी बचत योजना, विमा आणि पेन्शन योजना याविषयी माहिती, स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी व्यवसाय सुरू करताना आणि वाढवताना होणाऱ्या आर्थिक नियोजनावर कार्यशाळा, लघुउद्योजकांना कर प्रणाली, सबसिडी आणि इतर फायदे समजावून सांगणारा कार्यक्रम इ.
५) निवृत्त व्यक्तींसाठी वित्तीय साक्षरता उपक्रम: संपत्तीचे योग्य नियोजन आणि वारसाहक्क/ इच्छापत्र नियोजन , ऑनलाइन बँकिंग, यूपीआय आणि सायबर सुरक्षिततेवरील माहितीपर सत्र, पेन्शन, विमा, फिक्स्ड डिपॉझिट आणि सुरक्षित गुंतवणूक याविषयी मार्गदर्शन इ.
थोडक्यात: ‘वित्तीय साक्षरता – प्रत्येकासाठी’ हा दृष्टीकोन ठेवून आपण अल्पारंभा फाउंडेशन मार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध गटांसाठी वित्तीय साक्षरतेचे उपक्रम राबवू जेणेकरून अधिकाधिक समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, स्वतःचे आणि देशाचे आर्थिक भविष्य उज्ज्वल करू शकेल.यामागे हीच प्रेरणा आहे की वित्तीय साक्षरता ही केवळ संपत्ती मिळवण्यासाठी नाही, तर ती प्रत्येकाला आर्थिक सुरक्षितता आणि आत्मनिर्भरता मिळवण्यासाठी गरजेची आहे आणि म्हणून तिचा प्रसार आणि प्रचार गरजेचा आहे.
वरील आणि संबधित इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी आपल्याला आवाहन ! तुमच्या सूचना, मोलाची मदत यामुळे हे कार्य पुढे नेण्यास बळ मिळेल.

श्री. रघुवीर अधिकारी,
संस्थापक सदस्य , अल्पारंभा फाउंडेशन
संपर्क : 98220 00883


Leave a comment